Thursday, April 18, 2019

लोण्याचा गोळा, बोके आणि माकड

*गोष्ट मोठ्या माणसांसाठी*
*गोष्ट लोण्याचा गोळा, बोके आणि माकडाची*
😊😊
"दोघांच भांडण तिसऱ्याचा लाभ" .... मराठीतली एक म्हण !  लहानपणी या म्हणीचा अर्थ समजावून सांगण्यासाठी शाळेत सांगितलेली लोण्याच्या गोळ्यासाठी भांडणाऱ्या दोन बोक्यांची गोष्ट आठवते का ? त्या दोन बोक्यांच्या भांडणाचा फायदा घेत एक चतूर माकड सगळे लोणी फस्त करुन पळून जात आणि दोन्ही बोके हताश होऊन हात चोळत बसतात. पण ती गोष्ट छोट्यांसाठी होती. खूप वर्ष झाली त्या गोष्टीला ! ही गोष्ट मोठ्यांसाठी आहे कारण आता दोन्ही बोके हुषार झाले आहेत. आपण एकत्र आलो तर माकडाला संधी कशाला मिळेल ? असा विचार करुन ते दोघे एकत्र येतात आणि आपसात लोणी वाटून खायच ठरवतात. थोडाफार वाद अधूनमधून झाला तरी आपसात ते मिटवत असत. अशा प्रकारे एकंदरीत ८-१० वर्ष बरी गेली होती त्यांची !

पण एक दिवस "एक शहाणा" आला आणि त्याने लोणी वाटून खाण्याऱ्यांवर टीका करायला सुरुवात केली. सुरवातीला बोक्यांनी दुर्लक्ष केल. त्याच म्हणणे होते कि लोक प्रामाणिकपणे दूध जमा करतात म्हणूनच त्यातून तयार झालेल्या या लोण्यावर आपला नाही तर जनतेचा हक्क आहे. आपण त्याचा उपयोग स्वतःसाठी न करता जनतेसाठी केला पाहिजे, आपली भुमिका ही रखवालदाराची असली पाहिजे. हळूहळू त्याच्या बोलण्याकडे लोक लक्ष देऊ लागले, लोकांना त्याचे म्हणणे पटूही लागले. तुमच्या हक्काचे लोणी हे बोके स्वतः फस्त करतायत हे योग्य नाही, आपण ही चोरी थांबवून त्याचे इमानदारीत योग्य वाटप केले पाहिजे.

या प्रचारामुळे गेल्या ३-४ वर्षांपासून बोक्यांची उपासमार सुरु होती. हे असेच सुरु राहिले तर आपल्या अस्तित्वाला  धोका असल्याचे त्यांनी ओळखल होत. चोरावर मोर असणारा आणि आपल्याला गंडवून लोणी फस्त करणाऱ्या माकडाची त्यांना संकटसमयी आठवण झाली. माकडाची हुषारी व धूर्तपणा दोघे ओळखून होते. या शहाण्याला पळवून लावण्यासाठी त्यांनी माकडाशी वाटाघाटी सुरु केल्या. बोक्यांच्या आपसातील दोस्तीमुळे माकडाची उपासमार सुरु होतीच. या बोक्यांनी आपल्याला लोणी मिळू न दिल्याचा राग त्याच्या मनात होताच. माकड हुषार होत, त्याने वरकरणी बोक्यांशी जुळवून घेतल. कारण त्या शहाण्याला धडा शिकवण्यासाठी का होईना आज त्याला आत घुसायला मिळणार होत. एकदा आत शिरकाव झाला कि मग त्यालाही त्या गोळ्याचे दर्शन लाभणार होते.

मग बोक्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन माकडाने फैरी झाडण्यास सुरवात केली. तो सांगू लागला कि "हा शहाणा" एक नंबरचा लबाड आहे, याचे काही ऐकू नका. जनतेला लोण्याचे वाटप करायच्या नावाखाली लोण्याचा मोठा गोळा आपल्या खास मित्रांना देत असतो वगैरे वगैरे अनेक गोष्टी तो प्रचारात सांगू लागला. लोकांना त्याच्या लीला, त्याचे बोलणे, नकला नेहमीच आवडायच्या.  जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहून माकडाचा हुरुप वाढत होता आणि बोकेही मनोमन खुष होत होते. बोक्यांच्या हिश्श्यातून आपल्यालाही थोडे तरी लोणी मिळेल व किमान आपला दुष्काळ संपून स्वतःपुरतेका होईना अच्छे दिन येतील या कल्पनेनेच तो खुषीत होता.

आणि इकडे बोकेही खुष होते कारण त्या शहाण्याच्या हातून लोण्याचा गोळा हिसकावून द्यायला माकड आयतच गळाला लागल होत. पुढे जाऊन दोन्ही बोके काय लबाडी करतील याची माकडाला कल्पना नव्हती. मात्र तमाम जनता बोक्यांची जोडगोळी आणि माकड दोघांनाही ओळखून होती. त्या तिघांच्या एकत्र येण्यातून या माकडाचा पोपट / मामा होत असतांना जनता पहात होती.

लहानपणी शाळेत जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला ही म्हण पण ऐकली होती. या गोष्टीत बोके माकडावर अन् माकड बोक्यांवर विसंबून होते. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणालाच लोणी मिळणार नव्हत कारण "तो शहाणा" रखवालदार ते लोणी जनतेपर्यंत पोहोचविणार होता याची जनतेला खात्री होती.

ता.क. वरील गोष्टीत कोणीही मोदी, दोन्ही काँग्रेसप्रमुख व राज ठाकरे यांना शोधू नये ही नम्र विनंती ! वाचतांना तसा आभास झाल्यास क्षमस्व !
😊😊

© बिंदूमाधव भुरे, पुणे.

2 comments: