Saturday, February 4, 2017

25 वर्षांच्या युतिची इतिश्री

"२५ वर्षांच्या युतीमधे आम्ही सडलो" भाषणा दरम्यान ऊद्धवजींच वाक्य ऐकून एक क्षणभर अनेकांना धक्का बसला असेल. वास्तविक ऊद्धवजींच बोलणे अतिशय संयमीसमतोल असते. शब्दांची योग्य निवड करुन सौम्य भाषेत चपखलपणे चिमटे काढत हवा तो संदेश जनतेत पोहोचविण्याची त्यांची खुबी आहे. भाषणात वेळप्रसंगी आक्रमकता आणतांना भाषणाची पातळी क्वचितच केव्हातरी खालावली असेल पण ती हीन दर्जाची होणार नाही याची काळजी ते घेत असतात. त्यामुळेच परवा भाषणातल हे वाक्य अनेकांना खटकले.

जशा निवडणूका जाहिर झाल्या तसे चर्चेच गुऱ्हाळ नेहमीप्रमाणे सुरु झाल. विधानसभेच्यावेळी असणारे तणावपूर्ण व उत्कंठा वाढविणारे वातावरण पुनः एकदा निर्माण होते कि काय अस वाटत होते. पण या चर्चेतून काय निष्पन्न होणार हे तमाम जनतेला माहिती होत. फक्त ते प्रत्यक्षात कसे येणार याचीच उत्सुकता होती. सस्पेंस आहे असे वाटणारा पण प्रत्यक्षात सगळ्यांनाच शेवट माहिती असलेल्या एखाद्या चित्रपटासारख हे चालू होत.

चर्चेसाठी घेतलेले मुद्दे पाहिले दोन्ही पक्षांना युती नकोच होती हे लक्षात येते. त्यामुळे  चर्चेच्या फेऱ्या म्हणजे निव्वळ दिखावा होता आणि हे उद्धवजींच्या भाषणानंतर स्पष्ट झाले. युती संपुष्टात येण्याच्या निमित्ताने काही प्रश्न मनात निर्माण होतात. (१) २५ वर्षांपूर्वी युती करायच मुळात कारण काय होत (२) ज्या कारणांसाठी युती केली व ती २५ वर्ष टिकली म्हणजे इतकी वर्ष ते कारण अस्तित्वात होत का (३) शिवसेनाप्रमुख व प्रमोदजी महाजन यांच्या पुढाकाराने झालेल्या युतीला मान द्यायचा म्हणुन ती शिवसेनाप्रमुख हयात असे पर्यंतच ती खर्या अर्थाने टिकली का ? (कि टिकवली गेली)

युती होण्यापूर्वी अनेक वर्ष राजकीय पटलावर काँग्रेस हा एकमेव बलाढ्य पक्ष होता.
काँग्रेसची मतपेढी हमखास व एकगठ्ठा मतांची तर विरोधकांची विविध राजकीय पक्षात विभागलेली. तेव्हा वेगवेगळे लढण्यामुळे मतविभाजन होते व परिणामी काँग्रेस जिंकते हा निष्कर्ष निकालाची चिरफाड केल्यानंतर नेहमीच निघायचा. एकास एक एक अशी रचना करुन मतविभाजन टाळले तर काँग्रेस पराभूत होते हे आणिबाणीनंतरच्या लोकसभा निवडणुकीत सिद्ध झाले होतेअर्थात तेव्हाच्या निवडणुकीलाप्रचारालामतदानाला अन्य कंगोरेही तेव्हढेच महत्वाचे होते.

एखादी संघटना किंवा राजकीय पक्ष जेव्हा कार्यक्रम हाती घेतात व त्यामाध्यमातून संघटन व कार्यकर्ते यांना बांधून ठेवतात ते कधी न कधी सत्ता मिळेल या आशेवर ! अन्यथा सत्तेविना कार्यकर्ते किती काळ सोबत राहु शकतील ? जरी त्यावेळी २०% राजकारण व ८०% समाजकारण हे ब्रीदवाक्य असले तरी एक प्रबळ प्रादेशिक पक्ष म्हणुन नुसत्या आंदोलनात्मक कार्यक्रम घेऊन  किती वर्ष शिवसेना वाटचाल करत रहाणार होती ?  तेव्हा कसेही करुन सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसला हरवायचे हाच एकमेव अजेंडा बनला. पण एकट्याच्या बळावर सत्ताप्राप्ती अशक्य आहे हे स्पष्ट दिसत होते.

त्यामुळे शिवसेनाप्रमुख व प्रमोदजी महाजन यांच्या पुढाकारातून चर्चेतूनविचारातून युतीचा निर्णय झाला व तशी घोषणा झाली. राज्यभर पसरलेले शाखांचे जाळेकार्यकर्ते व सोबत भाजपाचा जनाधार याबरोबर  सेनाप्रमुख व प्रमोदजींच्या आक्रमक भाषणाची साथ असा आराखडा निश्चित झाला. हिंदुत्ववादी विचारांची एकी अशा आकर्षक वैचारिक कोंदणात या युतीला बसविले गेले. दोन पक्षांच्या युतीमागे कोणाला तरी पराभूत करायच हा उद्देश्य होता ही बाब अधोरेखित करावी लागेल. आपआपला पक्ष स्थापन करतांना त्यात सर्वंकश विकास व समाजकल्याण यासाठी सत्ता मिळविणे,  मराठी माणसाचे हित जोपासणे,  हिंदू हिताचे रक्षण करणे यासारखी उद्दिष्ट्ये काँग्रेसला पराभूत केल्यावर सत्तेच्या माध्यमातून कशी साध्य करायची यावर युती करतांना विचार झालाच नाही.  म्हणजेच आपआपल्या पक्षाची ध्येयधोरणेउद्दिष्ट्य यांना शीत पेटीत बंदिस्त करून टाकले गेले.


राष्ट्रीय पातळीवर युतीच्या व आघाडीच्या राजकारणाची गेल्या अडीच दशकाची वाटचाल पाहिली की धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सत्तेच्या साठमारीत सगळेच पक्ष आपल्या मूल्यांनामूळ तत्वांना तिलांजली देतांना दिसत आहेत हेच खर. २५ वर्षापूर्वी व आजही भाजपकाँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष होते व आहेत तर जनता दल व त्यांचे विविध तुकडेसपाबसपाअकाली दलतृणमुलद्रमुकअण्णा द्रमुकअसाम गण परिषदतेलंगणा यासारखे अनेक प्रादेशिक पक्ष होते व आजही आहेत. राष्ट्रीय पातळीवर निवडणूका लढवितांना त्या त्या ठिकाणी प्रादेशिक पक्षांचे उमेदवार जिंकतांना दिसत होते. लोकसभा निवडणुकीत कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी सगळ्यात मोठ्या ठरलेल्या राष्ट्रीय पक्षाला प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबुन रहाणे अपरिहार्य ठरत होते. 

या कालावधीत अटलजींनी असे सरकार (एनडीए) २० हून अधिक पक्षांचा पाठिंबा घेत यशस्वीपणे चालविले. तर नंतर काँग्रेसने (युपीए) ! ज्या प्रादेशिक पक्षांनी भाजपला सहयोग दिला त्या पक्षांचे अस्तित्व (भाजपामुळे) संपुष्टात आले असे विधान उद्धवजींनी भाषणात केले किंबहुना ज्यांनी भाजपची साथ सोडली ते पक्ष अधिक मजबूत झाले असा त्यांचा दावा होता. पण वरकरणी हा मुद्दा पटणारा वाटला तरी बारकाइने विचार केल्यास त्यातील फोलपणा ध्यानात येईल. आजही सगळे प्रादेशिक पक्ष आपले अस्तित्व टिकवून आहेत किंबहुना काही ठिकाणी तर ते अधिक मजबूत होऊन राज्यात सत्तेवरही आले आहेत.
प बंगालमधे तृणमूल काँग्रेस कधीकाळी केंद्रात भाजपला पाठिंबा देतांना दिसत होता व आज सत्तेत आहे तो डाव्यांचा पराभव करुन. ममताने तेथे जवळजवळ एक दशक कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधात केलेला संघर्ष व लाखो कार्यकर्त्यांचे पाठबळ याचा तो विजय होता. बिहारमधे नितिशकुमारांच्या जेडीयुने भाजपपासून फारकत घेतली व सत्ता मिळवली. येथे भाजपच्या विरोधात लालू व नितिश यांनी एकत्र येत निवडणुक जिंकली पण भाजपच्या मतांची टक्केवारी घटली नाही तर टिकून राहिली. या विजयामुळे बिहारमध्ये काँग्रेस मात्र अस्तित्वहीन झाला. तामिळनाडूत द्रमुक व अण्णाद्रमुक यांच्याकडे आलटून पालटून सत्ता राहिली आहेतेथे भाजपचा दुरान्वयेही संबंध नव्हता. पंजाबात अकाली दल प्रमुख तर भाजप दुय्यम भूमिकेत पण अकालीचे वर्चस्व आजही टिकून आहे. (येत्या निवडणुकीत काय होईल ते सांगता येणार नाही)  

तर मुद्दा हा कि प्रादेशिक पक्षांनी भाजपची संगत सोडली म्हणुन ते मजबूत झाले हे विधान खरे नाही.  पक्ष संघटना व बांधणी तसेच नेत्याचा व्यक्तिगत करिष्मा उदा. ममतांचा व्यक्तिगत करिष्मा व संघटननितिशलालूजयललिता यांचा व्यक्तिगत करिष्मा यामुळे त्यांच्या राज्यात कमकुवत झालेल्या सत्ताधारी पक्षांना मतदारांनी झिडकारले व प्रादेशिक पक्षांना संधी दिली. महाराष्ट्रात मात्र हे घडू शकले नाही कारण महाराष्ट्रात काँग्रेस वा राष्ट्रवादी दोघांनीही सहकार चळवळीच्या माध्यमातून सत्तेवर अनेक वर्ष मजबूत मंद ठोकली होती. सेनेचा विस्तार हा शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर झाला तर भाजप हा शहरी भागात प्रभाव टिकवून होता. काँग्रेसचे काही प्रमाणात पक्ष संघटन व राष्ट्रवादीमधे शरद पवार यांचा व्यक्तिगत करिष्मा यामुळे हे दोन्ही पक्ष तुल्यबळ ठरले व एक दशक राज्य करते झाले. यांना शह देण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून युती संघर्ष करत होती.

मराठी भाषिक ते हिंदुत्व या प्रवासात काँग्रेसवर प्रहार करतांना सेनेची काही धोरणे अनाकलनीय ठरत होती. उदा. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रतिभाताई पाटील यांना दिलेला पाठिंबा. मराठी व महाराष्ट्रीयन म्हणुन पाठिंबा असा तात्विक मुलामा या धोरणाला जरी दिला तरी शेवटीं तो पाठिंबा काँग्रेसलाच मिळाला. “शिवसेनाप्रमुखांची शिवसेना” व “शिवसेना पक्षप्रमुखांची शिवसेना” यातील फरक, अंतर कार्यकर्त्यांना समजुन घ्यायलाकळायला व स्वीकारायला बराच काळ गेला. याच दरम्यान सेनेतून बाहेर पडून झालेल्या नव्या पक्षाच्या स्थापनेमुळे नव्या नेतृत्वाच्या शिवसेनेची ताकद विभाजित झाली. 

या कालावधीत एक राष्ट्रीय पक्ष म्हणुन भाजपा देशभर आपली ताकद वाढवत होता तर राष्ट्रीय पक्ष म्हणुन काँग्रेसची ताकद प्रभावी व दमदार नेतृत्वाअभावी क्षीण होत चालली होती. सुमारे दीड दशक आघाडीच्या राजकारणातील तीन पायांची शर्यत जनतेने अनुभवली होती. याच दरम्यान मतदारांची तरुण पिढीही पुढे आली होती. या तरुणाईच्या अपेक्षा वेगळ्या असल्याचे भान राजकीय पक्षांनी ठेवणे गरजेचे होते. तरुण नेतृत्व व कणखर नेतृत्व यातील निवड करतांना जनमानसाने कणखर नेतृत्वाला पसंती दिली. संघटन व क्रियाशील कार्यकर्ते यांच्या बळावर देशभर असलेल्या अनुकूल वातावरणाचा लाभ भाजप मिळवत गेला. 

हे बदलते वातावरण समजून घेण्यात व आपला पक्षआपली ताकद कशी वाढवायची याविषयीचे धोरण आखण्यात कोठेतरी सेना नेतृत्व कमी पडले. भाजप महाराष्ट्रात वाढला व शिवसेनेपेक्षा मोठा झाला तो काँग्रेस व राष्ट्रवादी यांना पराभूत करुन. शिवसेनेची मतपेढी बव्हंशी शाबूत होती हे विधानसभा निवडणुकीत दिसून आले होते. मराठी माणूसहिंदुत्व हाच पाया दोन्ही पक्षांचा आहे. काल पर्यंत युती असल्यामुळे मतदार संभ्रमित नव्हता पण आज जेव्हा दोन्हीपैकी एकाची निवड करण्याची वेळ आली तेव्हा मतदार काय विचार करेल हा खरा प्रश्न आहे.

मराठी माणसाच्या व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती झाली ती काँग्रेसला हरवून सत्ता मिळवायची म्हणुन ! पण आज सत्ता मिळाली व ज्याला हरवायचे ती काँग्रेस अस्तित्वासाठी झगड़ते आहे त्यामुळे मराठीचाहिंदुत्वाचा खरा वारसदाररक्षणकर्ता मीच यासाठी या दोन पक्षांची रस्सीखेच सुरु आहे. भाजपच्या उधळलेल्या बैलाला वेसण घालण्याचे आव्हान सैनिकांना करतांना भाजपला बैलाची उपमा दिली म्हणुन भाजपप्रेमींनी नाक मुरडली असली तरी हा बैल उधळला आहे हे सेनेने मान्य केले आहे हे लक्षात घ्यावे लागेल. भगवा फडकविण्याचे भावनिक आव्हान करुन सैनिकांमधे नवचेतना निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमी होतच असतो पण आज गरज आहे त्या भावनिक आव्हानाला नाविन्याची व विकासात्मक आर्थिक कार्यक्रमाची जोड देण्याची ! मतदारात मोठी संख्या तरुणाईची आहे व तरुणाई हवेवर भाळणारी नाही तर हवेचा प्रवाह अचूक ओळखणारी आहे हे लक्षात घ्यावे लागेल.

बिंदुमाघव भुरेपुणे.

No comments:

Post a Comment