Wednesday, May 3, 2017

आठवणीतला अविस्मरणीय सेवानिवृत्तिदिवस

२९ एप्रिल २०१७, बँकेतील सेवेचा शेवटचा दिवस संस्मरणीय ठरला. सकाळी अंचल कार्यालयात सपत्नीक नियोजित वेळेला पोहोचलो. नैमित्तिक प्रार्थनेनंतर प्रथेनुसार एप्रिल महिन्यात निवृत्त होणाऱ्या मंडळींचा निरोप समारंभ कार्यक्रमास सुरुवात झाली.

पुणे क्षेत्राचे उपमहाप्रबंधक श्री गुप्ता साहेब तसेच अंचलप्रमुख श्री परुळकरसाहेब यांची गौरवोद्गार करणारी भाषणे झाली. श्री परुळकर साहेबांबरोबर आम्ही दोघांनीही (मी व पत्नी सौ शुभदा) काम केल असल्यामुळे त्यांचे भाषण आमची मुक्तकंठाने स्तुती करणारे होते. या दोघांच्याही भाषणानंतर परंपरागत शाल, श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला.

बँकेत रुजू होतो तेव्हा जन्मतारखेची नोंद असल्यामुळे वयाची साठी आणि निवृत्तिची तारीख दोन्ही निश्चित असते. माझ्याबाबतीत जन्मतारीख २४ एप्रिल १९५७ असल्यामुळे  निवृत्तिची तारीख ३० एप्रिल २०१७ निश्चित होती ! परंतु हा दिवस रविवार येत असल्यामुळे सेवानिवृत्ति शनिवार, २९ एप्रिल २०१७ रोजी पार पडली.

सत्कारानंतर मनोगत व्यक्त करतांना मी या ३९ वर्ष ९ महिने २६ दिवसांच्या सेवेला "एक संस्मरणीय, चैतन्यदायी व आनंददायी असा दीर्घ प्रवास" अशी उपमा दिली. खरच हा एक दीर्घ प्रवासच असतो. बँकेत रुजू झालेल्या शाखेपासून ते निवृत्त झालेली शाखा अशा या प्रवासात ज्या विविध शाखात काम केल ते "प्रवासातील महत्वाचे थांबे" व ज्यांच्यासोबत काम करायला मिळाले ज्या ग्राहकांबरोबर रुणानुबंध जुळले ते सगळे "सहप्रवासी" ! आपण बँकर्स म्हणजे सेवा क्षेत्रात काम करणारी मंडळी, "ग्राहकसेवेच्या माध्यमातून सर्वोच्च आनंद देण्याचा प्रयत्न" हा दृष्टिकोन सदैव बाळगला तर व्यवसाय आपोआप मिळतो हा माझा अनुभव !

अर्थात, सत्काराला उत्तर देतांना किती बोलायच ? समोर उपस्थितात बहुतांश तरुण असलेल्या मंडळींना आपले बोलणे कितपत रुचेल, आवडेल ? यासारख्या प्रश्नांबरोबरच आपल्याला या सत्कारप्रसंगी आज भावनाविवशतेमुळे बोलता तरी येईल का ? यासारख्या प्रश्नांच दडपण जाणवत होते. त्यात श्री परुळकर साहेबांनी त्यांच्या भाषणात "श्री भुरे हे अतिशय मॅच्युअर्ड ट्रेड युनियन लिडर व त्याचबरोबर खुप चांगले काम करणारेही आहेत. ते खूप चांगले लिहितात व तितकेच छान बोलतात" अशी स्तुती केल्यामुळे उपस्थित ५०-६० व्यक्तिंच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या असाव्यात असा माझा समज झाला व दडपण वाढण्याचे तेही एक प्रमुख कारण होते. तसेच उपस्थितांमधे बहुतांश मंडळी अमराठी, त्यामुळे मराठी ऐवजी हिंदीत बोलले तरच उपयोग, या विचाराने दडपणाची पातळी आणखीनच वाढली होती.

सकाळी उठल्यापासून "आज बँकेतला शेवटचा दिवस, आजवर ४० वर्ष उराशी कवटाळून ठेवलेल्या सगळ्याचा मनात विरक्तिची भावना आणून त्याग करायचा दिवस वगैरे" अस सारख मनातल्या मनात घोकत होतो. पण ही "विरक्तिची भावना" मनात आणायची कशी अन् कोठून ? बँकेवर वर्षानुवर्ष केलेले जिवापाड प्रेम अशा ओढूनताणून आणलेल्या विरक्तिच्या भावनेने कसे पुसुन टाकता येईल ? सत्काराच उत्तर देतांना मनावर आलेल्या दडपणाला ही पण एक भावनिक किनार होती.

श्री परुळकर साहेबांच भाषण सुरु असतांना मनात या सगळ्या विचारांची गर्दी झाली होती. सत्कारातला "तो क्षण" म्हणजे साहेबांनी माझ्या खांद्यावर सत्काराची शाल घातली आणि प्रसन्नपणे हसून माझ्याकडे बघितले, मोठ्या धीराने मी नजरेला नजर दिली. ह्रदयात खोलवर झालेली कालवाकालव, डोळ्यातून अश्रु बाहेर पडू नयेत म्हणुन जे काही प्रयत्न करावे लागतात त्यामुळे घशात दाटलेला आवंढा ! हे केवळ ती शाल अंगावर पडली तसे एक सेकंदात घडून आले, कोठेतरी त्यांच्याही डोळ्यात मला विषण्णतेची झाकली दिसली. कदाचित् माझ्या पापण्याच्या आत लपलेले अश्रु त्यांच्या नजरेने टिपले असावेत. मागे थाळीत श्रीफल घेऊन उभ्या असलेल्या व्यक्तिकडून श्रीफल घेण्यासाठी ते वळाले तसे मीही उपस्थितांकडे चेहेऱ्यावर उसने हास्य आणत एक कटाक्ष टाकला पण आत खोलवर "काहीतरी तुटल्याचा" भास होत होता !

आता बोलायच, सत्काराला उत्तर द्यायच. श्री परुळकर साहेबांनी एवढ गुणगान केल्यावर बोलणे क्रमप्राप्त होते. पुणे अंचलके महाप्रबंधक ... अशी हिंदीत सुरुवात केली खरी पण पुढे काय ? एकदम ब्लँक होणार का ? आवंढ्यामुळे दाटलेला गळा अजून मोकळा होत नव्हता. काय बोलायच कि फक्त थँक्स म्हणत रुमालाने डोळ्यांच्या ओलसर कडा पुसत, हात जोडून कोरड हसायच ? या विचारात असतांना क्षणार्धात वीज चमकावी तसा एक विचार मनात चमकून गेला. बँकिंग जीवनाची सुरुवात केली त्यावेळचे पहिले शाखा प्रबंधक कै. ओकसाहेब, आयुष्याभर ज्यांच्या शिकवणीचा संपूर्ण प्रभाव आहे असे माझे आई-वडिल या सगळ्यांचे पुण्यस्मरण करुन त्यांचेप्रती आदर व्यक्त करावा व हेच भाषणाचे सूत्र ठेवावे असे मनोमन वाटले.

विचारांच्या अंधारात चाचपडत असतांना अचानक हा धागा मिळाला तस मनावरच दडपण कमी होऊ लागल, गळ्याशी दाटलेला आवंढाही मोकळा झाला व भाषणासाठी, तेही हिंदी, अचानक शब्द ओठावर येऊ लागले जणू देवी सरस्वती कृपावंत झाली होती. १० ते १२ मिनिटांच छोटस मनोगत व्यक्त करुन संपल तस हुश्श झाल, हायस वाटल.

"गेल्या वर्षभरात अनेकजणांनी निरोप समारंभाच्यावेळी मनोगत व्यक्त केले पण इतक सुंदर बोलणे खुप दिवसांनी ऐकल" अशा प्रतिक्रिया देत अनेकजणांनी मला निवृत्तिच्या शुभेच्छा दिल्या. श्री परुळकर साहेबांकडे चहापान झाल व सगळ्यांचा निरोप घेऊन अंचल कार्यालयास मनोमन नमस्कार करत बाहेर पडलो.

ब्रँचला येईपर्यंत ११.४५ झाले होते. संजय कान्हेरे, घोले, जहागिरदार इत्यादिंची मोठी गँग वाट पहात होती. त्यानंतर कदम साहेब दुपारी वळामे, शिरिष कुळकर्णी काही कस्टमर्स अस कोणी ना कोणी दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी येतच होते. ब्रँचमधला निरोप समारंभ कार्यक्रम संध्याकाळी ५ नंतर सुरु झाला. या कार्यक्रमाला माझें संपूर्ण कुटूंबच उपस्थित रहाण्याचा योग जुळून आला. पण ब्रँचमधल्या  सगळ्या मंडळींना पडलेला एक मोठा प्रश्न -  भाषण कोणी करायच ?

हा प्रश्नही मग चुटकीसरशी आम्ही सगळ्यांनी मिळून सोडवला. नेहमीसारखी खुर्च्यांची मांडणी न करता आम्ही गोलाकारात खुर्च्या मांडून बसलो. दंडक एकच कि कोणीही उभ राहून भाषण करायच नाही कि बोलायच नाही, बसून मनसोक्त, भरपूर गप्पा मारायच्या. स्काॅन प्रोजेक्टचा अशोक रोज बँकेत येणारा जणू आमच्या स्टाफपैकी एक तोही हजर होता. आणि मग सातपुतेसाहेबांनी ट्वेन्टी २० च्या ओपनिंग बॅट्स्मनसारखी जोरदार सुरवात करुन वातावरणात रंग भरतांना संपूर्ण वातावरण खेळीमेळीच करुन टाकल. जवळजवळ ७ वाजेपर्यंत या गप्पा रंगल्या. यादरम्यान मला शाल, श्रीफल व शाखेतर्फे कायमस्वरुपी लक्षात राहिल अशी भेटवस्तू म्हणुन एक अप्रतिम वाॅलक्लाॅक, सौ शुभदाला साडी व मुलांना गिफ्ट असा कार्यक्रम पार पडला.

गप्पा मारत, हसतखेळत सगळेचजण बाहेर पडलो. सकाळचा अंचल कार्यालयातील एक "कार्पोरेट सेंड आॅफ" व संध्याकाळी ब्रँचमधला एक "ह्रद्य घरगुती कार्यक्रम" हे दोन्ही अप्रतिम ! श्रेयसमधल जेवण जितके आवडायच तितकीच बेडेकरची मिसळही ! दोन्हीची अप्रतिम चव, स्वाद आणि लज्जत आपल्या जागी, तुलना कशाला करा ? लक्षात तर दोन्ही आयुष्यभर रहाणारच. असो.

पदवी परिक्षेत उत्तीर्ण झाल कि नावापुढे पदवी चिकटते पण आज मी घरी परतलो ते नावाच्या अलिकडे कायमस्वरुपी चिकटलेली  ex staff नामक उपाधी घेऊन !

बिंदुमाधव भुरे
बँक आॅफ बडोदा, पौड रोड शाखा, पुणे.

No comments:

Post a Comment