Wednesday, April 26, 2017

मी कोण ?

एकट असतांनाच्या स्थितीत मनात नेहमी निर्माण होणारा एक प्रश्न !

"मी कोण आहे ?"

लोकोपयोगी समाजसेवक कि समाजसेवेच्या बुरख्याआड दडलेला एक भ्रष्टाचारी ?

यंत्र चालविणारा एक कामगार कि माणुसकी विसरुन यंत्रवत झालेल्या या समाजाचा एक घटक ?

रात्री पोटाच खळग भरण्यासाठी दिवसभर राबणारा मजूर कि मजूरांची पिळवणूक करणारा एक निर्दयी मालक ?

प्रत्येकाला खायला मिळाव म्हणुन शेत फुलविणारा शेतकरी कि त्याच मालाला कवडीमोल भाव देणारा बाजारातील दलाल ?

संकटे येऊ नयेत म्हणुन किंवा संकटाशी लढण्याच आत्मबल मिळाव म्हणुन देवाची करुणा भाकणारा भाविक कि पुजाऱ्याच वस्त्र धारण करुन त्यांच्या देवभोळेपणाचा आणि श्रद्धेचा गैरफायदा घेणारा एक धार्मिक दलाल ?

नविन पिढी घडविणारा एक व्रतस्थ शिक्षक कि शिक्षणाचा बाजार मांडलेला एक कमिशन एजंट ?

प्राणाहून प्रिय अशा मातृभूमिचे संरक्षणासाठी जीवावर उदार होऊन लढणारा सैनिक कि अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली आजादीच्या घोषणा देणारा एक देशद्रोही ?

मानवतेच्या कल्याणासाठी या ब्रम्हांडाच रहस्य उलगडण्यात मग्न असलेला एक शास्त्रज्ञ कि याच शोधांचा विनाशकारी उपयोग करणारा एक माथेफिरु, विकृत आतंकवादी ?

आपसी प्रेम व सद्भावना यांची शिकवण देणारा संत-महंत कि जाती-धर्माच्या भिंती मजबूत करण्यासाठी विखारी संदेश देणारा धर्मगुरु ?

समाजाची बौद्धिक भूक भागविण्यासाठी विपुल ग्रंथसंपदा निर्माण करणारा साहित्यिक कि त्या साहित्यावर मनापासून प्रेम करणारा एक वाचक ?

विक्रेता कि ग्राहक, संयोजक कि खेळाडू , शिक्षक कि विद्यार्थी ? वगैरे वगैरे .....

मी नेमका कोण आहे ? विविध स्तर असणाऱ्या या सामाजिक रचनेत माझ नेमक स्थान काय आहे ? चारचौघांसारखे विवंचनेत जीवन जगणारा मी जेव्हा या प्रश्नाच उत्तर शोधण्यासाठी अवती भवती नजर टाकतो तेव्हा मला माझ अस्तित्व अशा अनेक स्तरात असल्याच दिसून येत.

काही वेळा असही वाटत कि मी एक रंगकर्मी आहे, कलाकार आहे. लेखकाची संहिता आणि दिग्दर्शकाचे निर्देश यानुसार मी त्याने "दिलेल्या भूमिकेत" रंग भरण्याच काम करतो आहे. लोकांना माझे काम आवडल तर मग प्रयोग सुरुच रहातात. पण कारण काहीही असेल, केव्हा तरी कायमचा पडदा पडून प्रयोग, खेळ कायमचा बंद होणार हे नशिबी असतेच.

तस बघितल तर जन्माला आल्यानंतर विद्यार्थी, मुलगा/मुलगी, पती/पत्नी, आई/बाबा, मालक/नोकर, कर्मचारी, व्यावसायिक, विक्रेता वगैरे अशा वेगवेगळ्या भूमिकाच तर आपण वठवत असतो. रोजच रंगीत तालीम अन् रोजच प्रयोग. रोज नव्याने उद्भवणारी आव्हाने व प्रसंग लक्षात घेऊन अभिनयात नविन रंग भरत रहायच, ऐन वेळच्या जागा सुचतील त्या घेत अभिनय खुलवत रहायच आणि एक दिवस एक्झिट घ्यायची कि पडदा आपोआप पडतो.

कल्पनेतला हा रंगकर्मी रंगवतांना एक क्षणभर "आनंद" मधील शेवटच दृष्य डोळ्यापुढे उभ रहात ! राजेश खन्ना सांगतोय बाबू मोशायला "हम सब तो रंगमंचकी कठपुतलियां है !" खरच आहे ते ! तो नाचवेल तस नाचायच अन् त्याने दोरी ओढून घेतली कि खेळ खलास !

त्याच्या इच्छेनुसार मी या ग्रहावर भ्रमण करण्यासाठी पाठविलेला एक प्रवासी तर नाही ना ? हल्ली पानभर जाहिरात नाही का वाचत आपण "चलो, बॅग भरो, निकल पडो"! या जाहिरातीतली प्रवास कंपनी तुम्हाला फिरवून आणते. ही टूर कधी ७ तर कधी १४ तर कधी २१ दिवसांची असते. टूर संपली कि आपण "घरी परत !"

तस माझ्या कल्पनेत या पृथ्वीतलावर मी पर्यटनासाठी आलेला (कि पाठविलेला) एक प्रवासीच आहे. ही टूर ४० वर्षांची आहे कि ६० कि ८० ? हे कोणालाच माहिती नसत इतकाच काय तो फरक. इथला कार्यभाग आटोपला कि "घरी परत !" परतीच तिकिट मात्र नक्की असत.

प्रत्येकाने "मी कोण" याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न मात्र नक्की करावा. आपण सगळेच रंगकर्मी असल्यामुळे आपला रोल कसा चांगला होईल व तो सगळ्यांना कसा आवडेल याकडे लक्ष द्यावे. पडदा पडल्यावर लोकांनी नाव ठेवू नये याची काळजी सदैव घ्यावी. तसेच मी येथे एक प्रवासी, टूरिस्ट आहे असे मानून हा प्रवास आपल्याबरोबरच इतर सहप्रवाशांनाही आनंद देणारा राहील याचा आपल्या परीने प्रयत्न करत रहावा !

अगदी "मी कोण" या प्रश्नाच उत्तर (सुरवातीला उल्लेखिलेल्यापैकी) काहीही असल तरी !

बिंदुमाधव भुरे, पुणे.

No comments:

Post a Comment