Sunday, April 2, 2017

काउंट डाउन बिगिन्स !

काउंट डाउन बिगिन्स !

अमुक वेळेला कार्यक्रम करायचा अस ठरल कि मग तो कार्यक्रम सुरु होण्याआधी घडाळ्याची उलटी गिनती सुरु होते.

एखादी धावण्याची शर्यत, रेस सुरु होण्यापूर्वी स्टाॅप वाॅचचे काउंट डाउन सुरु होते.

खुप जाहिरातबाजी करुन झाल्यावर एखादी नविन मालिका सुरु होण्यापूर्वी टीव्हीच्या  चॅनलवर डाव्या कोपऱ्यात घड्याळाची उलटी गिनती सुरु झालेली दिसते.

अशा काउंट डाउनचा कालावधी पाच मिनिटापासून ते चोवीस तासांपर्यंतचा असतो.

१० वी १२ परिक्षेच्या बाबतीत तर हा काउंट डाउन महिना ते तीन महिने आधी सुरु होतो.

घरात मुला़च किंवा मुलीच लग्न ठरल कि "आल कि महिन्यावर लग्न" अस म्हणत काउंट डाउन सुरु होतो.

या विविध प्रकारच्या काउंट डाउनमधे एक प्रकारचे मानसिक दडपण, टेंशन, धडधड, उत्सुकता, आनंद अशा वेगवेगळ्या भावना प्रसंगानुरुप दाटून येत असतात.

पण एक काउंट डाउन असेही आहे कि ज्यामधे आनंद आहे, परिपूर्णता आहे, समाधान, मानसिक शांतता आहे आणि त्याचबरोबरीने  यासगळ्याला कुठेतरी विरक्तिपोटी आलेली दुःखाच्या भावनेची किनारही आहे.

हे काउंट डाउन असते सेवा निवृत्तीचे ! ३०-३५ हून अधिक वर्षे म्हणजे अर्ध्याहून जास्त आयुष्य माणूस नोकरीच्या ठिकाणी असतो. या सेवाकालावधीत कळत नकळत या संस्थेशी इथल्या सहकाऱ्यांशी त्याच एक भावनिक नात तयार होत जात. या नात्यातल प्रेम, भावनिक ओलावा त्याला  सेवाकाळात जाणवत नाही, कळूनही येत नाही.

पण हे काउंट डाउन जस सुरु होते तस मानसिक संतुलनाचा प्रवाह चंचलतेकडे नकळत सुरु होतो. नव्या जाणीवा मनात प्रवेश करु लागतात अन् वाटू लागत कि या नोकरीच्या ठिकाणी आपण किती समरसून गेलो होतो. एक दिवस आपण येथे परके होणार, उपरे होणार ! आता हे सगळे सोडून जायचय ते सुद्धा एका रात्रीतून.

शेवटच्या दिवशी संस्थेची चौकट ओलांडून बाहेर पडायच. मागे आपल्या पाउलखुणा ठेवून व सोबत अनंत आठवणी घेउन ! पण उगाच मागे वळून पहायच नाही कि कोणी चालतय का आपल्या पाउलखुणांवरुन ! कारण  "माजी" नावाची एक उपाधी आपली इच्छा असो नसो, आपल्याला येउन चिकटते अन् नविन पिढी ... तिने का बर चालाव आपल्याच पाउलखुणांवरुन ? आपणही स्वीकारुया कि त्यांची वेगळी वाट, वेगळी पद्धती !

३०-३५ वर्ष असलेल, जोपासलेल नात्याच लेबल एका रात्रीत बदलत अन् आपण "माजी" होतो, पण भावनांच काय ? त्याची दृढता विरळ व्हायला, ती वीण सैल व्हायला वेळ लागतोच ... नव्हे तो प्रयत्नपूर्वक द्यावाच लागतो. यालाच "इमोशनल डिस्कनेक्ट" अस म्हणाव का ?

"निवृत्तिपूर्व रजा" अनेक मंडळी घेतात, पाहणाऱ्याला वाटत कि रजा संपवतोय. पण खरच अस असत ? संस्थेशी "भावनिक नात" आपणच जोडतो आणि त्या नात्यापासून दूर जातांना मन कठोर करुन हे नात आता "व्यावहारिक पातळीवर" आणण्याच कामही आपल्यालाच करायच असत. "निवृत्तिपूर्व रजा" हा काळ मग अशा "इमोशनल डिसकनेक्ट" साठी वापरता येतो व वापरला जातो.

आयुष्यातल मनाला चटका लावणार अस हे  काउंट डाउन ! या काउंट डाउनला प्रत्येकाला सामोरे जावच लागत. माझही तेच सुरु आहे, शेवटचे २८ दिवस आणि मग ३० एप्रिलला .. मीही चेहेरा हसरा ठेवत म्हणेन बाय बाय "बँक आॅफ बरोडा !"

या बँकेमुळेच आज मी आहे अन्यथा माझ्या आयुष्यातून "बँकेच नाव" वजा केल तर काय उरणार ? एक मोठ्ठ शून्यच ना ?

बिंदुमाधव भुरे
बँक आॅफ बरोड़ा
पौड रोड, पुणे

No comments:

Post a Comment