Friday, June 26, 2020

खंडित वारीचे वारकरी











खंडित वारीचे वारकरी

 

दिवे घाट ... पुण्याहून पंढरपुरच्या दिशेने जाणारा माऊलींच्या पालखीचा मार्ग ! पुणे सासवड या सुमारे ३० किमी मधल्या टप्प्यात दिवेघाटाच्या चढाची सुरवात करण्यापूर्वी मस्त वाफाळलेल्या चहाचा कार्यक्रम पार पडतो. टाळमृदंगाच्या ठेका धरायला लावणाऱ्या व ग्यानबा तुकारामच्या जयघोषात आमचीही पाऊले चालू लागतात.  हजारो वारकऱ्यांचे जथ्थे तहान भूक विसरुन माऊलींच्या ओढीने नामगजरात तल्लीन होऊन चालत असतात.  घाटात ठराविक अंतरांवर असणाऱ्या विविध वाहिन्यांच्या ओबी व्हँन्सपाण्याचे टँकर्स व वैद्यकीय पथके ! उजव्या हाताला घाटडोंगर तर डाव्या बाजूला घाटातून दिसणारे भव्य विस्तारलेल पुणे. मान्सूनची कृपा असेल तर वातावरण प्रसन्न आल्हाददायक असणार. दूरवर डोंगरावर उतरलेले ढग जणू माऊलींच्या स्वागताला आले असावेत. चढण चढतांना थकलेल्या जीवाला पावसाचा एखादा शिडकावाथंडगार वाऱ्याची झुळूक पुनः प्रसन्न व ताजेतवान करुन जाते.

        

आज आम्ही सहा वारकरी जेव्हा दिवेघाटाकडे पाहत होतो तेव्हा माझ्या  मनातल्या झरोक्यातून आठवणीचा कवडसा हलकेच डोकावत होता व या सगळ्या आठवणी पुनः ताज्या करत होता. कोरोनाने यंदा वारी रद्द झाली होती. त्यामुळे वारीच्या मार्गावर आपला पदस्पर्श यावर्षी होऊ शकणार नाही ही भावना मन अस्वस्थ करत होती. वारीचा दिवस उलटून गेला तसतशी अस्वस्थता वाढत होती आणि whatsapp वर ती प्रकटही होत होती. आणि अचानक काही मोजक्या समुद्रियन वारकऱ्यांंच्या सोबतीने एक प्रातिनिधिक स्वरूपात वारी चालण्याचा योग जुळून आला.

 

दिवे घाटमाथ्यावर श्री विठ्ठलाच्या भव्य पाषाणमूर्तीचे दर्शन घेऊन परत यायचे असा कार्यक्रम ठरवून आम्ही सहा मंडळीनी दिवे घाटातील सुरुवातीची माऊलींच्या पालखीची स्वागत कमान ओलांडली. पालखीच्या दिवसात वाहनांसाठी बंद असलेल्या या रस्त्यावर अखंड वहातुक आज सुरु होती. एखाद उत्साही तरुण जोडपे निसर्गाच्या रम्य वातावरणात सेल्फी घेत होते तर कुठे तरुण मुलांचा घोळका ग्रुप फोटो घेण्यात मश्गुल होता. लाँकडाऊन मधून मिळालेली सूट किती आनंद देऊन जाते हे त्यांच्या चेहेर्यावरील ओसंडून वाहणारा आनंद सागत होता.

 

पाय घाट चढत होते पण त्याला दर वर्षी असणारी हजारो वारकर्यांची सोबत नव्हती, ना टाळ-मृदंग अन झांजांच्या साथीत भक्तीरसात भिजलेले अभंग ! त्यामुळे कि काय जेमतेम २-३ कि.मी. अंतर पार होत नाहीत तोच पाय बोलू लागल्याचा भास व्हावा ? घाटाच्या कठड्याआडून काही अनोखी झाडांची पाने डोकावत होती. सभोवताली असणाऱ्या हिरव्या गार पानाची सोबत असूनही काही पाने वाळून गेलेली दिसली. ती पाने म्हणजे वारी रद्द झाल्याची रुखरुख लागून गेलेला वारकरी असल्याची उपमा उगाचच मनाला स्पर्शून गेली.

 

या विचारात चालता चालता श्री विठुरायाच्या भव्य मूर्तीचे लांबूनच दर्शन झाले. ढगाळ वातावरण व काळ्या मेघांची दाटी दूर सारण्याचा प्रयत्न करणारी सूर्य किरणे यामुळे मूर्ती अस्पष्ट दिसत होती. वर जाऊन चरणस्पर्श करायची सगळ्यांचीच इच्छा होती पण उत्साह अमाप असला तरी पावसाळ्यामुळे निसरड्या झालेल्या वाटेने चढून वर जाऊ नये याची प्रत्येकाचे वय आठवण करून देत होते. एका खाजगी मालमता असलेल्या जागेतून रस्ता होता. आज विठूरायाची विशेष कृपा म्हणायची ! तिथल्या वाँचमनने आम्हाला आत येण्याची परवानगी दिली. त्या भव्य मूर्तीच्या पायावर आम्ही माथा टेकला आणि मन भरून पावले. एका निवांत ठिकाणी पोटपूजा आटोपून आम्ही परतीचा रस्ता धरला तो वारीत खंड न पडल्याचे मनात एक समाधान घेऊन !  

 

श्री बिंदुमाधव भुरे

९४२३००७७६१ / ८६९८७४९९९०

bnbhure@rediffmail.com

 

9 comments:

  1. सगळ्यां बरोबर चालत असल्यासारखं वाटलं.माऊलीचे चरण स्पर्श करणाऱ्या सर्व वारकर्यांना दंडवत.वारी खंडित झाली पण परंपरा कायम ठेवलीत आणी उर्जापण!👍
    शिरीष दामले

    ReplyDelete
  2. Sundar te varnan vsriche....pratakshyst sahbhsgi asslyacha Anand Anand milala.

    ReplyDelete
  3. Very well wewritt.Felt as if I am with you in the वारी!

    ReplyDelete
  4. सुरेख वर्णन

    ReplyDelete
  5. उत्तम भावनाविष्कार

    ReplyDelete
  6. Hats to your devotion,dedication and commitment of your team. No doubt you are a talented writer.

    ReplyDelete
  7. खुपच मनाला स्पर्शून जाणारा लेख.

    ReplyDelete