Sunday, June 7, 2020

खरे सोने

खरे सोने !

 

लहानपणी लाकूडतोड्याची ऐकलेली गोष्ट आठवत असेल. बबलू रोज जंगलात जायचा, लाकूड तोडून त्याच्या विक्रीतून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवायचा ! गरीबीत जगणारा बबलू अतिशय स्वाभिमानी व हुशार होता. एकदात जंगलातून परत येताना एका विहिरीजवळ तो पाणी पिण्यासाठी थांबला असता त्याची कुऱ्हाड चुकून विहीरीत पडते. बिचारा रडकुंडीला येतो कारण या कुऱ्हाडीवरच त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ अवलंबून होता. आता सगळ्यांना उपाशी राहावे लागणार या काळजीने तो दु:खी होतो. 

 

 

तो परमेश्वराची मनोमन प्रार्थना करतो. त्याची आर्त हाक ऐकून विहिरीतून देवी प्रकट होते व बबलूला प्रश्न करते कि बाबा रे का रडतो आहेस ? काय हवय तुला ? पाणी पिताना कुऱ्हाड चुकून विहिरीत कशी पडली याची कहाणी सांगत तो देवीला प्रार्थना करतो कि या कुऱ्हाडीवरच माझ्या कुटूंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे तेव्हा मला माझी कुऱ्हाड परत आणून दे बाकी मला काही नको. 

 

 

देवीला वाटले कि या लाकूडतोड्याची परीक्षा घ्यावी. ती विहिरीतून एक सोन्याची कुऱ्हाड काढते व लाकूडतोड्याला देते. ती सोन्यानी चमकणारी कुऱ्हाड पाहिल्यावर देवीला वाटते कि लाकूडतोड्या खुश होईल, त्याला मोह होईल कि आता आयुष्यभर कष्ट करायची गरज नाही. परंतु, बबलूने हात जोडून देवीला सांगितले कि ही माझी कुऱ्हाड नाही. मग देवी त्याला चांदीची कुऱ्हाड काढून देते पण बबलू ती कुऱ्हाडही स्वीकारण्यास नकार देतो. 

 

 

मग त्याची खरी लोखंडी कुऱ्हाड काढून देवी त्याला दाखवते व विचारते कि ही तरी आहे का ? आपली हरवलेली कुऱ्हाड पाहून बबलूला परमानंद होतो व त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती कुऱ्हाड स्वीकारत तो देवीला नमस्कार करतो.  देवी त्याच्या प्रामाणिकपणावर खुश होत त्याला लोखंडी कुऱ्हाडी बरोबरच त्या दोन्ही कुऱ्हाडी बक्षीस देते. जीवनात मेहनत करत राहिलास तर तुझी उन्नती होईल पण ज्या दिवशी या सोन्याचांदीचा मोह तुला होईल तुझ्या अधोगतीस सुरवात होईल असे बोलून देवी अंतर्धान पावली.

 

आता नंतर काय होत ?

 

बबलू घरी परत येतो व सोन्या चांदीच्या कुऱ्हाडीना एका पेटीत बंदिस्त करून ठेऊन देतो. गावात ही बातमी सगळ्यांना कळाली तशी त्याची किर्ती चहुकडे पसरु लागली. परमेश्वरावर श्रद्धा असलेला, प्रामाणिक, कष्टाळू व सच्च्या मनाचा हा लाकूडतोड्या वेळप्रसंगी मग पदरमोड करुन अडल्या नडलेल्यांना मदतीचा हात देऊ लागला. लोखंडी कुऱ्हाड ही मेहनतीचे प्रतीक होती. ती त्याच्या जवळ सदैव असल्यामुळे त्याला काही कमी पडत नसे. हळूहळू त्याच्याकडे येणाऱ्या मंडळींचा ओघ वाढू लागला. अंत्या, मन्या, दिव्या, नारू वगैरे त्याचा जिवलग मित्रपरिवार होता. त्याच्या माणसे जोडण्याच्या स्वभावामुळे ही जिवलग मित्रमंडळी त्याच्या सांगण्या बरहुकूम समाजकार्यात सहभागी होऊ लागली. समाजामध्ये त्याच्या नावाला वलय प्राप्त होऊ लागले, गरीबांच्या हृदयातला तो ताईत बनला आणि समाजसेवक म्हणून नवी ओळख त्याला मिळाली.

 

त्याची वाढती लोकप्रियता पाहून शंकऱ्या, सुश्या, वश्या, शर्या, अंत्या वगैरे अनेक   राजकारणी मंडळी सावध झाली. बबलूच्या विरोधामध्ये कट-कारवाया, कारस्थाने करून तो बदनाम कसा होईल हे पाहू लागली. परंतु, आपल्या जिवलग सवंगड्यांच्या मदतीने या विरोधी कारवायांचा मुकाबला बबलू सहजपणे करू लागला. समाजकार्य करत असतांना अनेक क्षण मोहाचे आले तरी बबलूने चांदीच्या, सोन्याच्या कुऱ्हाडीला कधी स्पर्श केला नाही. त्याच्यासाठी ती मोहाची प्रतीके होती अर्थात लोखंडी कुऱ्हाडीवरील आपली पकडही त्याने कधीच सैल होऊ दिली नाही.

 

 

समाजसेवेतून सुरु झालेला हा प्रवास आता बबलूला राजकारणाकडे खुणाऊ लागला. अधिक चांगल्या प्रकारे समाजकार्य करायचे तर हातात काही निर्णय घेण्याचे अधिकार हवे, अन अधिकार हवे असतील तर सत्ता हवी ! या विचाराने त्याने आपल्या सहकार्यांच्या मदतीने राजकारणात प्रवेश केला. जीवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर त्याचे समाजकार्य अधिक जोमाने  सुरु झाले. त्याच्या कार्याला आदर्श मानणारी मंडळी प्रत्येक गावात तयार होत होती, तसे फलक ठिकठिकाणी झळकू लागले होते. २०% राजकारणाच्या बळावर केलेले ८०% राजकारणाचे हे सूत्र जनतेला भावले होते. 

 

यशाची चढत्या कमानीसोबत विरोधकही आक्रमक होत होते. बलाढ्य शत्रूला थोपवायच होत, मात्र त्याला मात द्यायला आता स्वबळ कमी पडू लागल. मग शत्रूचा शत्रू तो मित्र नात्याने अन्य समविचारी मंडळी सपोर्टला पुढे आली. प्रम्या, गोप्या, नाथा वगैरे अनेक मंडळी हे त्याचे जुने मित्र होते. त्यांच्या साथीने लढा यशस्वी झाला, खुर्ची मिळाली. सत्ता आली तसा समाजकारण मधील काही प्रसंगी पुसट होऊ लागला होता. सत्तेबरोबर अहंकार, गुर्मी डोकावू लागली. सत्तेच्या राजकारणाची लागण घरातही झाली आणि सत्तासोपानाची स्पर्धा सुरु झाली. परिणाम व्हायचा तोच झाला, सत्ता गेली, खुर्ची गेली. 

 

 

अनेक वर्षे उलटली, बबलू आता थकला होता. आपल्या मुलगा उदय याने हे समाजकारण पुढे न्याव अस त्याला मनोमन वाटत होत. मुलाची इच्छा काहीही असली तरी लाकुडतोड्यावर जनमानसात असलेला एक प्रचंड विश्वास व राजकारणात त्याने बसवलेली घडी यांच्या रेट्यामुळे उदयला ही गादी पुढे चालवण भाग पडल. पण लोखंडी कुऱ्हाडीने करावी लागणारी मेहनत व कष्ट यासाठी त्याची मनापासून तयारी होती का ?

 

 

काळ बदलला होता, कार्यकर्ते बदलले होते, अन् त्यांचे विचारही !  कष्ट करायचे पण कंफरटेबली करायचे अन् कंफर्ट हवा म्हणजे साधने हवीत आणि साधन म्हणजे नगद नारायण ! अल्पावधीतच उदयला चांदीची कुऱ्हाड खुणावू लागली. त्याच्या मते ८०% समाजकारण म्हणजे लष्करच्या भाकऱ्या ! त्याच्या जोरावर २०% राजकारण करणे परवडणारे नव्हते. मग राजकारण व समाजकारण यांचे प्रमाण बदलले, फिफ्टी फिफ्टी झाले. लोखंडी कुऱ्हाडीचा वापर कमी झाला अन् चांदीची कुऱ्हाड आता चमकू लागली.

 

 

एकदा सत्तेची चटक लागली कि ती नशा उतरल्याचे उदाहरण अपवादानेच दिसते. सत्तेत वाटा प्रत्येकाला हवासा वाटत असतो. समाजकार्य सत्तेविना करता येत या वडिलांच्या कर्तृत्वाचा त्याला विसर पडला असला तरी त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या वलयाचा वापर तो धूर्तपणे करून घेत होता. आता लोखंडी कुऱ्हाड अडगळीत पडली होती. मनात विचार आला कि चांदीच्या कुऱ्हाडीने किती दिवस राजकारण करणार सोन्याची चमक काही वेगळीच. आणि ती संधी अखेर मिळाली. शत्रूला थोपविण्यासाठी म्हणून ज्यांचा सपोर्ट घेतला त्या मित्रांना अंधारात ठेवत त्याने सत्तेसाठी थेट शत्रूशी संधान बांधले. कावेबाज शत्रूही मित्र बनायला तयार झाला कारण सत्ता सगळी गणिते उलटवून टाकत असते.  

 

 

सोन्याची कुऱ्हाड त्याला मिळाली पण आपल्या वडिलांना ज्या लोखंडी कुऱ्हाडीने नावलौकिक दिला, समाजात मान दिला, पत दिली, समाजकार्य करतांना अनेक जिवाभावाचे मित्र दिले दुर्दैवाने त्याच कुऱ्हाडीचा विसर त्याला पडला. आज त्याला सत्ता मिळाली पण कमावलेली प्रतिष्ठा आणि समाजातील स्थान याला धक्का लागला होता. देवीने परीक्षा बघण्यासाठी म्हणून वडिलांना दिलेली सोन्याची कुऱ्हाड ही मोहापासून चार हात दूर रहाण्याचे प्रतीक होती हेच तो विसरला. सोन्याच्या कुऱ्हाडीने मेहनत करता येत नाही तर ती विलास आणि भोगवादाला आकर्षित करते व परिणामी लोखंडी कुऱ्हाडीवरील पकड सैल होत जाते. २०% राजकारणाचा वाढत गेलेल्या या टक्क्याने ८०% समाजकारण संपवून टाकले होते, त्याच्या सत्तेचा पाया डळमळीत झाला होता.

 

उद्या सोन्याची चमक जाईल, सत्तेच्या खुर्चीवर दावा करायला कावेबाज धूर्त मित्र पुढे येतील. तेव्हा लोखंडी कुऱ्हाडीचे वैभव हेच खरे सोने आहे हे कळेल पण तोपर्यंत उशीर झालेला असेल का ? याचे उत्तर काळाच्या पोटात दडलेले आहे हे मात्र खरे.

 

बिंदुमाधव भुरे, पुणे

९४२३००७७६१ / ८६९८७४९९९०

bnbhure@rediffmail.com

 

 


13 comments:

  1. सारांश काय तर गोष्टीतला लाकूडतोड्या हा खरंच शहाणा होता कारण त्याने फक्त लोखंडी कुरर्‍हाडच घरी आणली.

    ReplyDelete
    Replies
    1. होय. मोह टाळणे हे अवघड काम असते. जीवनाच्या वाटचालीत अशी अनेक निसरडी वळणे येत असतात तेव्हा आपला तोल सांभाळावा लागतो. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

      Delete
  2. सुंदर
    कथेचे सार छान वाटला. साध्य परिस्थीथी

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

      Delete
  3. The journey,rather deterioration of a grassroot worker into a political leader nicely described, congratulations... keep it up.

    ReplyDelete
    Replies
    1. Your comments always give me strength & encouragement. Thanks !

      Delete
  4. सुंदर। पुढे गोस्ट एवढी विचारातून वाढू शकते हे कल्पना करू शकत नाही।

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

      Delete
  5. लाकूडतोड्या आपली सचोटी कधीच विसरला होता. त्याने सहकारी मित्रांतर्फे खूप संपत्ती जमा केली. मुलाने त्याला परिपूर्णता आणली इतकेच.

    ReplyDelete
    Replies
    1. हा दृष्टीकोनही योग्यच आहे. बापाने कष्ट तरी केले होते, मुलगा त्यांची पुण्याई encash करतोय.

      Delete
  6. अगदी सद्य राजकीय परिस्थिती ला अनुसरून

    ReplyDelete
  7. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

    ReplyDelete
  8. आता मात्र सर्वाना सोन्याची कुऱ्हाडच पाहिजे. त्याचे पाणी जाऊ नये म्हणून प्रयत्नशील !

    ReplyDelete