Wednesday, March 8, 2017

भाजपची घोडदौड ? वेध ११ मार्चचे !

*भाजपची घोडदौड ?*
*वेध ११ मार्चचे*

निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपून *एक्झिट पोलचे निकाल व त्यावरील टाईमपास चर्चा रंगण्यास सुरुवात होईल.* प्रचारादरम्यान प्रत्येक पक्ष आम्हालाच का मते द्यायची हे तावातावाने ओरडून सांगत होता, सांगतांना अनेकदा विकास कामांचे मुद्दे सोडून गाडी भलतीकडेच वळाल्याचे अनेक प्रसंग घडले. *सत्ताधारी पक्ष त्यांची सत्ता टिकावी म्हणुन तर विरोधी पक्ष सत्ता मिळावी म्हणुन प्रयत्नांची शिकस्त करतांना दिसत होते.*

पंजाबमधे अॅन्टी एन्कंबसीमुळे सत्ता टिकावी म्हणुन अकाली व भाजप हे पक्ष तर लोकसभेतील "आप"च यश हे फ्लुक नव्हते हे दाखविण्याचा व दिल्लीबाहेर पक्षविस्तारण्याची संधी म्हणून आप पक्ष तसेच नवसंजीवनीच्या शोधात पक्षाला उभारी मिळावी म्हणुन काँग्रेस पक्ष असे सगळेच पक्ष धडपड करत आहेत.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी भाषा मुद्द्यावरुन भाजपला बसलेले हादरे यामुळे गोव्यात सत्ता टिकावी म्हणुन भाजप प्रयत्नशील आहे तर युपीने लोकसभेला ७०+ खासदार दिले त्यामुळे येथे सत्ता न मिळाल्यास मोदी व भाजप दोघानाही टीकेचे धनी व्हावे लागणार म्हणुन युपी सगळ्यात  महत्वाची.

२०१४च्या लोकसभेतील अभूतपूर्व विजयानंतर दिल्ली, बिहार येथील अपयशाची पार्श्वभूमि या प्रचाराच्या रणधुमाळीत अधिक ठळक करण्याचा विरोधकांचा प्रयत्न काही वेळी प्रचारादरम्यान राहिला किंबहुना भाजपा विरोधात एकत्र लढलो तर विजय मिळतो हे बिहारने दाखविल्यामुळे युपीत सपा व काँग्रेस एकत्र आले. अर्थात, बहन मायावतीच्या हत्तीची धीमी वाटचाल दुर्लक्षिता येणार नाही कारण तो सपा+काँग्रेसचे आणि भाजपचेही गणित बिघडवू शकतो. *एकंदरीत विचार करता पंजाब, गोवा, युपी या तिन्ही राज्यात भाजपसमोर कडव आव्हान आहे.*

२०१४ पूर्वी भाजपला अनुभव होता तो विरोधी पक्ष म्हणुन काम करण्याचा तर काँग्रेसला सत्ताधारी म्हणुन ! परंतु २०१४ नंतर या भूमिका बदलल्या. *सत्ताधारी पक्ष म्हणुन काम करतांना लागणारा धूर्तपणाचा भाजपमधे मूळ धरु पहातोय तर आपण विरोधी पक्ष आहोत हे काँग्रेसने अद्यापही मनाने स्वीकारलेले नाही असे दिसते आहे.*

२०१४ मधील लोकसभेत पूर्ण बहुमत मिळण्याची अपेक्षा भाजपलाही नसावी, पण ते मिळाले त्यामुळे शहा, मोदी म्हणजे यश असे समीकरण जनमानसात रुजण्यास सुरुवात झाली व तसा जाणीवपुर्वक प्रयत्नही सुरु होता. एक लक्षात घेतल  पाहिजे २०१४ पूर्वी भाजपच्या यशाचा आलेख हा चढ उतारांचाच होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या सुमारे एक वर्ष आधीपासून मोदींची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्नास सुरुवात झाली होती. *ही प्रतिमा विशाल करतांना युपीए सरकारमधील भ्रष्टाचारांची असंख्य प्रकरणे व काँग्रेसचे कमकुवत नेतृत्व याचा वापर भाजपने अत्यंत खुबीने केला.*

२०१४ च्या विजयानंतर जनमानसात पक्षाची एक आश्वासक प्रतिमा रुजविण्यासाठी या जोडीने अफाट परिश्रम घेतले हे वास्तव आहे. *परंतु एखाद्या निवडणुकीत पराभव झाला तर संपूर्ण भाजपची ध्येय धोरणे कशी चुकीची आहेत हे घसा फाटेपर्यंत सगळे विरोधी पक्ष सांगत असतात तर विविध चॅनलवालेही त्यात आपला सूर मिसळत असतात हे दिल्ली व बिहारच्या निकालादरम्यान दिसून आले.*

त्यामुळे आज असे म्हणाव लागते आहे कि विविध मिडियांनी व स्वतः मोदींनी *स्वतःची व भाजपची अशी काही प्रतिमा निर्माण करुन ठेवली आहे कि त्यात ते कैद झाले आहेत.* निवडणुका जिंकल्या नाहीत किंवा जिंकून दिल्या नाहीत तर व्यक्ति म्हणुन मोदी व पक्ष म्हणुन भाजप याच्या लोकप्रियतेस ओहोटी लागण्यास सुरुवात झाली असा निष्कर्ष तावातावाने काढण्यास सुरुवात होते व *कदाचित् ११ मार्चला जेव्हा निकाल जाहीर होतील तेव्हा अपेक्षित यश पदरात न पडल्यास याच निष्कर्षाला ठळकपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न होईल.* प्रश्न आहे कि अशा वातावरणाचा लाभ घेण्याइतपत विरोधी पक्ष सक्षम आहेत का ?

अर्थात, पुढची २ ते २॥ वर्ष आता कोणत्याही निवडणुका नाहीत. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वी पक्षप्रतिमा व पंतप्रधान म्हणुन मोदीजींना स्वतःची प्रतिमा पुर्वीपेक्षा अधिक भक्कम करण्यास पुरेसा अवधी असेल. *सत्ता कालावधीच्या पहिली २ ते २॥ वर्ष ही धोरणात्मक निर्णय घेणे व त्याच्या  अंमलबजावणीचे नियोजन यांची असायला पाहिजे व ती तशी होती असे म्हणता येईल. आता येणारी २ ते २॥ वर्ष या धोरणांच्या अंमलबजावणीचे परिणाम सर्वसामान्यांना स्पष्ट दिसणारे, जाणवणारे असले पाहिजे.*

असे झाल्यास २०१९ मधे भाजपला यशाची पुनरावृत्ति करणे जड जाणार नाही. परंतु *त्यासाठी पक्ष म्हणुन कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन व सतत परिश्रम आवश्यक आहेत. केवळ मोदीजींच्या करिष्म्यावर अवलंबून वाटचाल करत राहणे फार काळजी फलदायी ठरु शकणार नाही.*

यादृष्टीने विचार करता ११ मार्चला निवडणुक निकालात *भाजपास संमिश्र यश मिळाव कारण संपूर्ण यश मिळाल्यास येणारा अतिआत्मविश्वास २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, पक्षासाठी तसेच पक्षातील नेते मंडळींसाठी  धोकादायक ठरु शकतो*.

बघूया ११ मार्चला काय होत ते !

बिंदुमाधव भुरे, पुणे.

No comments:

Post a Comment