Saturday, March 11, 2017

रामायण - रामराज्य

*रामायण - रामराज्य*

लिहिता वाचता येत नसतांना चित्रकथेच्या माध्यमातून आजी आजोबांनी सांगितलेले व पुस्तकात पाहिलेले सचित्र रामायण जस कळाल तस ते कल्पनेने त्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेसह मनाच्या एका कप्प्यात लहान असतांना साठवुन ठेवलेले होेत.

गाण्यांची आवड केव्हा व कशी निर्माण झाली हे आठवत नाही. पण बाबूजींच्या गीतरामायणाचा लाइव्ह कार्यक्रम अनेकदा ऐकण्याच भाग्य लाभल. प्रत्येक गीत सादरीकरणापूर्वी गीताची पार्श्वभूमि व रामायणातील तो प्रसंग मोजक्या शब्दात व अत्यंत भावप्रगल्भतेने वर्णन करण्याची त्यांची शैली केवळ अप्रतिम होती. डोळ्यांपुढे तो प्रसंग साक्षात उभी करण्याची किमया त्यात असायची. ही सारी गीते रेकाॅर्डप्लेयर, कॅसेट व नंतर सीडीच्या माध्यमातून कितीही वेळा ऐकली तरी आजही मन तृप्त होत नाही. त्यामुळे कि काय सांगता येणार नाही पण मनाच्या त्या कप्प्यात कल्पनेने आकारलेली ही सगळी पात्रे, व्यक्तिरेखा काळाच्या ओघात नंतर अधिकाधिक ठळक होत गेल्या.

यथावकाश दूरदर्शनचा जमाना आला आणि रंगीत दूरचित्रवाणी संचावर रामायण मेगा सिरियल दर रविवारी दिसू लागली. सकाळचा तो एक तासभर जणू अघोषित कर्फ्यू लागू केला असावा असे वाटण्याइतपत रस्त्यांवर शांतता असायची. घराघरात दूरदर्शन समोर घोळका करुन मंडळी बसलेली असत.

राम, लक्ष्मण सीता व सगळीच पात्रे, व्यक्तिरेखा मनाच्या त्या कप्प्यातून रामायणाच्या या मेगा सिरियलद्वारे छोट्या पडद्यावर अलगदपणे अवतरत होत्या. लहानपणी पाहिलेल्या चित्रकथेतील रामायणाच्या पुस्तकाचे जणू एक एक पान दर रविवारी ऊलटले जात होत. संपूर्ण कथानक कितीही माहिती असल तरी पुढच्या रविवारी काय घडणार याची उत्सुकता सगळ्याच वयोगटातील मंडळींना असे.

राम म्हणजे पितृप्रेमी, एकवचनी, सत्यवचनी, आज्ञाधारक वगैरे वगैरे अस एक आदर्शवादी व्यक्तिमत्व. त्याला लक्ष्मणासारखा पाठिराखा बंधू लाभला तर रामाच्या पादुका सिंहासनावर विराजमान करुन रामाच्या नावाने राज्य करणारा भरतासारखा दुसरा बंधू लाभला होता ! पतिव्रता सीता, रामभक्त हनुमान, पुत्रप्रेमापोटी रामाला वनवास घडविणारी कैकेयी, लंकापती रावण ... अशी असंख्य पात्रे त्या रंगीत पडद्यावर प्रसंगानुसार अवतरत होती.

रामायण कथेत श्रीरामाचे बालपण, अध्ययन व शस्त्रास्त्र चालविण्याचे शिक्षण नंतर विवाह, राज्याभिषेक व पुत्रप्रेमापोटी भरताला राज्य व रामाला वनवास असा वर मागणारी माता कैकेयी व नंतरच्या टप्प्यात श्रीरामांचा वनवास, सीतेचे अपहरण व लंकेश्वर रावणाशी युद्ध व शेवटी श्रीरामांचे अयोध्येत परतणे व त्यांचा राज्याभिषेक अशा विविध भागात किंवा खंडात रामायणाचे कथानक सुत्रबद्ध पद्धतीने गुंफण्यात आलेल आहे.

आज हे सगळे मांडण्याचे कारण म्हणजे माझ्या मनात एक प्रश्न अनेक वर्षांपासून घर करुन आहे आणि त्याचे समाधानकारक उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरुच आहे. सोशल मिडियामुळे विविध क्षेत्रातील जाणकार व तज्ञ मंडळी एकमेकांशी विविध ग्रुपच्या माध्यमातून जोडली गेली आहेत त्यामुळे या शंकेचे निरसन होऊ शकेल असे हल्ली वाटू लागल आहे.

युद्धानंतर श्रीराम अयोध्येला परततात, त्याचा यथावकाश राज्याभिषेक होऊन "राम-राज्य" खऱ्या अर्थाने सुरु होते. या नंतरच्या कालावधीतील म्हणजे रामराज्यातील कथानक किंवा किस्से फारसे प्रचलित नाही. नाही म्हणायला एका परिटाने घेतलेला संशय व त्यामुळे सीतेचा पुनः वियोग व नंतर लवकुश यांचे कथानक याबद्दल थोडफार गोष्टीरुपाने वाचण्यात आले तेव्हढच.

परंतु अयोध्येचा राजा म्हणुन राज्य करतांना श्रीरामांनी एक आदर्श राजा म्हणुन न्यायाने कसे राज्य केले, जनतेला कसे सुखी केले, सारी प्रजा कशी आनंदात व गुण्यागोविंदाने नांदत होती ..... असे हजारो प्रसंग घडले असतील कि ज्यामुळे "रामराज्य" हा शब्दप्रयोग प्रचलित झाला. पण त्याविषयी रामायण म्हणुन वर वर्णन केलेल्या कथेव्यतिरिक्त वेगळ अस कथारुप साहित्य वाचण्यात नाही.

आजही अगदी निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही आम्ही "रामराज्य" आणू असे आश्वासन दिल जात तेव्हा संभ्रम हा पडतो कि "रामराज्य" म्हणजे नेमक काय ? आश्वासन देणारा व ते ऐकणारा दोघांनाही माझ्याप्रमाणेच "रामराज्य" या शब्दाचा नेमका अर्थ माहिती नसला, ते कशा पद्धतीने चालविले जाणार हे माहिती नसल तरी "रामराज्य" या शब्दाची जनमानसावर अशी काही मोहिनी आहे, या शब्दावर मनोमन इतकी प्रचंड श्रद्धा व विश्वास आहे कि या एका शब्दाने आजही मनाला दिलासा मिळतो.

पण जेव्हा रामायणाचा विषय निघतो तेव्हा "रामराज्य" हा शब्दही आठवतो अन् या शब्दाचा अर्थ शोधण्याचे विचार पुनः मनात रुंजी घालतात.

बिंदुमाधव भुरे, पुणे.

No comments:

Post a Comment