स्व. श्रीपादराव देशपांडे - २५ वा स्मृती दिन
६ ऑक्टोबरचा दिवस, साधारण रात्री ८ ची वेळ... घरी यायला नेहमीपेक्षा थोडा उशीर झाला होता. रात्री आमची जेवणाची वेळ ९ - ९।। दरम्यानची.. मात्र त्यादिवशी जेवायला लवकर वाढले होते.. मनाला हे थोड विचित्र वाटत होत.. पण त्यांचे स्वरुप सांगता येत नव्हत. जेवण झाल्यावर पत्नीने बातमी सांगितली.."श्रीपादराव गेले".. मनातल्या उमटत असलेल्या त्या विचित्र भावनांचा उलगडा झाला होता..
१८५, शनिवार पेठेतील संघटनेचे कार्यालय, निळ्या रंगाचे बॅक कव्हर असलेली लाकडी खुर्ची, डाव्या हाताला टायपिंग मशीन, उजव्या हाताला कागदपत्रांचे भेंडोळे, समोर बसलेले अनेक कार्यकर्ते... मी १९८४ ला पुण्यात आल्यावर कार्यालयात पहिल्यांदा पाय ठेवला तेव्हाचे हे चित्र ! आजही ते तसेच आहे.. मनावर कोरलेले आहे...श्रीपादरावांच एकिकडे डिक्टेशन सुरु असायच.. मधूनच फोन वाजायचा, समोर कार्यकर्त्यांच्या चर्चेत त्यांच्या खास शैलीत हुंकार भरत दाद देत तर कधी मान डोलावून दिलखुलासपणे हसून कोतुक करत... अष्टावधानी म्हणजे काय याचा वस्तुपाठ देत... त्यांचे काम अखंडपणे सुरू असायचे..
श्रीपादरावांशी पुण्यात एन ओ बी डब्ल्यू च्या अधिवेशनादरम्यान परिचय झाला होता. नंतर १९८४ ला मी पुण्यात बदली घेऊन आल्यावर या परिचयाचे पुढे एका दृढ नात्यात रुपांतर होणार आहे याची मला तेव्हा कल्पना नव्हती. एक कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या असंख्य मंडळींवर त्यांचे बारीक लक्ष असावे... परिपक्व नेतृत्वाचा हा एक गुण... कार्यकर्त्यांमधील गुणांची पारख करणारा हा माणूस मला तेव्हा प्रथमदर्शनी मनापासून भावला.
परिचयातून भेटीगाठी अन् मग सहवासाची वारंवारिता वाढते आणि त्यातून मग संवाद सुरु होतो... त्यामुळे पुणे बॅंक वर्कर्स, महाराष्ट्र प्रदेश बॅंक वर्कर्सच्या कामात त्यांच्यामुळे मी नकळत ओढला गेलो होतो. वरचेवर होणाऱ्या भेटीमध्ये निवांत क्षणी अनेकविध विषयांवर आमच्या चर्चा व्हायच्या.
अशा चर्चांना शेवटी एक निर्णायक वळण किंवा आकार यावा म्हणून ते चर्चेचा समारोप करताना शेवटी म्हणायचे कि
"बिंदूजी, आजचा हा सगळा विषय जरा संपूर्ण लिहून काढाल का ?"
लिहून झालेले कागद त्यांच्या हाती सुपूर्द केले कि मग त्यांना त्यांच्या कागदपत्रांच्या भेंडोळ्यात मानाचे स्थान मिळायचे...(आम्ही त्या भेंडोळ्याचे "चोंबाळं" असे नामकरण केलं होतं.) त्यांनी तेव्हा लावलेल्या लिखाणाच्या सवयीचा फायदा मला आजही जाणवतोय.
मी रहायला तेव्हा दत्तवाडीतच होतो. श्रीपादरावांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर ! हे त्यांना एकदा कळाले.. मग काय .. रात्री कधी कधी १० वाजता फोन यायचा आणि मग कधी त्यांच्या घराच्या अंगणात तर कधी सारस बागेजवळ वीर सावरकरांच्या पुतळ्याखाली चर्चासत्र रंगात येत असत.. कधी बॅंक सुटल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीन मध्ये स्पेशल ऑमलेटचा आस्वाद घेत तर कधी एखाद्या हाॅटेलमध्ये वडा सांबार खात खात चर्चा व्हायच्या !
प्रसंगानुरूप विशेष भाषण त्यांना जेव्हा करायचे असेल तर त्या भाषणाचा लिखित ड्राफ्ट त्यांच्याकडे तयार असायचा.. तो वाचून मी त्यावर मत प्रदर्शित करावे असा त्यांचा आग्रह असायचा. आपला परफाॅरमन्स हा सदैव सर्वोत्तम असायला हवा हा त्यांचा अट्टाहास असायचा. यासाठी आपले भाषण एका सामान्य बॅंक कर्मीला कसे वाटेल ? हे जाणून घेण्यासाठीचा हा त्यांचा अनोखा प्रयोग होता !!
अर्थात, त्यांना सूचना देणे किंवा काही बदल करायला सांगणे म्हणजे काजव्याने सूर्याला उजेड दाखवण्याचा प्रयत्न ! त्यामुळे मी या फंदात सहसा पडत नसे.. मात्र कधी काही सुचवलेच तर ते मनापासून कौतुक करायचे.. श्रद्धेय पंताची एखाद्या नविन कार्कर्त्याच्या पाठीवर "शाबासकीची थाप" पडली तर त्याचा जो "अर्थ" असायचा ना तोच "अर्थ" या कौतुकात दडलेला असायचा हे कालांतराने मला उमगले.. परिपक्व नेतृत्वाचा हा पण एक गुण !!
आमच्या बॅंक ऑफ बरोडातील एक अतिशय हुशार व बुध्दिमान नेते स्व. अशोक भिडे यांना लोकल प्रवासात अपघात झाला असता त्यांचे वापी येथे होणाऱ्या अभ्यास वर्गात येणे रद्द झाले. ऐनवेळी हक्काचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी मला सोबत नेले इतकेच नव्हे तर प्रश्नोत्तरांचे एक सत्र मी सांभाळावे असा त्यांनी आदेश दिला. अर्थात, पाठीशी मी आहे, काळजी करु नका हे एव्हाना सांगण्याचीही आवश्यकता राहिलेली नव्हती इतका त्यांचा माझ्यावर विश्वास एव्हाना बसला असावा...
अशा अनेक आठवणी श्रीपादराव हे नाव घेताच मनाच्या हळूवार कप्प्यातून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करत असतात.. आणि... या आठवणी जेव्हा केव्हा बाहेर डोकावताना तेव्हा डोळ्यांच्या पापण्या नकळत ओलावत असतात.
एकंदरीतच श्रीपादरावांचे व्यक्तिमत्त्व हे मला मनमिळाऊ, कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणारे, कार्यकर्त्यांमधील नेतृत्व गुणांना वाव देत त्यांना फुलवणारे भासले. आणखी काही वर्षे ते आपल्यात हवे होते ही हळहळ कायमच मनात घर करुन आहे. शेवटचा श्वास त्यांनी संघटनेच्या कार्यालयात घेतला ही नियतीची योजना किती विलक्षण होती ना ?
असो !! काळ कोणासाठी थांबत नाही.. कालचक्राचा हा प्रवास अव्याहतपणे सुरु असतो.. या प्रवासात सामील कधी अन् कुठे व्हायचे आणि या प्रवासात नेमके कुठे थांबायचे हे आपल्या हातात नसते..
काही मंडळींचा हा प्रवास प्रदीर्घ असतो तर काहींचा अल्प !! या प्रवासात आपल्याला अनेक सहप्रवासी भेटतात कारण ती एक स्वाभाविक क्रिया असते.. मात्र या प्रवासात "आपण स्वतःहून किती जणांना भेटतो ?" हे माझ्या मते जास्त महत्वाचे आहे.
अशा भेटण्यामागे माणसे जोडण्याची प्रेरणा असते. या प्रेरणेमागे काही विशिष्ट हेतू अर्थातच असतो त्याशिवाय हे घडत नाही.. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत संस्कारित झालेल्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात या हेतू विषयी सुस्पष्टता ही कायमच असते.
चारित्र्यवान व्यक्ती घडविण्याच्या सातत्यपूर्ण अन् निस्वार्थ साधनेतून व्यक्तींमध्ये "राष्ट्र प्रथम" ही भावना आकाराला येत असते. अशा घडलेल्या व्यक्तींच्या समुहातून तयार होणारा समाज हा राष्ट्राला पुनर्वैभव मिळावे यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातील काही वेळ समाजकार्यासाठी देत असतो..
संघाने संस्कारित केलेल्या अशा असंख्य स्वयंसेवकांचे, व्यक्तींचे कार्य समाजाच्या विविध क्षेत्रात अव्याहतपणे सुरु आहे. अशा व्यक्तींमध्ये स्व. श्रीपादराव देशपांडे यांचे नाव हे आम्हा भारतीय मजदूर संघ आणि बॅंकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या एन ओ बी डब्ल्यू संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या मनात कायमस्वरूपी कोरलेले आहे.
एन ओ बी डब्ल्यू च्या कार्याचा पाया बॅंक ऑफ महाराष्ट्रमधे रचल्या नंतर ते पुढे अधिक जोमाने वाढविण्यासाठी ज्यांनी अपरंपार कष्ट घेतले त्यात श्रीपादरावांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.... वर उल्लेख केल्याप्रमाणे "आपण स्वतःहून प्रवासात किती जणांना भेटतो" हे महत्त्वाचे असते. श्रीपादरावांना याची नक्की जाण होती कारण आपल्या संघटन कार्यातील या प्रवासात त्यांनी असंख्य लोकांच्या गाठीभेटी घेतल्या.
माणूस ओळखण्याची कला त्यांना अवगत होती म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. संघटनेत सभासद जोडून घेणे.. त्यांच्याशी वारंवार संपर्क ठेवणे.. त्यांच्यातील गुणांची पारख करुन त्यांना कार्यकर्ता म्हणून घडविणे यात त्यांचा हातखंडा होता. श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्या "कार्यकर्ता" या पुस्तकात कार्यकर्ता म्हणून आवश्यक असलेल्या साऱ्या गुणांच्या वर्णनांचा उल्लेख आहे.. श्रीपादरावांमध्ये ते सारे गुण सहजसुलभ होते.
अशा गुणवान कार्यकर्त्यातून अनेक चांगले नेते बॅंकिंग क्षेत्रात काम करताना संघटनेला देण्याचे काम श्रीपादरावांनी केले. बॅंकिंग क्षेत्रात मजदूर संघाच्या कामाचा विस्तार होत होता. श्रीपादरावांनी आपल्या कर्तृत्वाने आपली आणि अर्थातच एन ओ बी डब्ल्यू... नोबो संघटनांची कार्यकक्षा वाढवत ती बॅंक ऑफ महाराष्ट्र ओलांडून अनेक बॅंका, विविध राज्ये आणि मग देशपातळीवर नेली.
जे करायचे ते भव्य हा त्यांचा अट्टाहास असायचा कारण त्यामागे असलेला त्यांचा विचार... बलाढ्य अशा डाव्या विचारांच्या संघटनेसमोर आपल्याला नेटाने उभे रहायचे आहे या गोष्टीचे त्यांना पूर्ण भान होते. त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रेरित होऊन काम केले पाहिजे म्हणून कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद असे.
त्यांच्या सहवासात १५-२० मिनिटे व्यतित केल्यावर नव्या जोमाने, नव्या जोशाने काम करण्याची प्रेरणा मिळायची.. त्यांच्या भाषणातूनही हा परिणाम साधला जात असे. बलाढ्य संघटनेसमोर उभे ठाकायचे तर मनात न्यूनगंडाचा भाव कणभरही असता काम नये किंबहुना पुरेपूर आत्मविश्वास असला पाहिजे याची त्यांना जाणीव होती हेच यातून स्पष्ट होते.
आजकाल शाईचे पेन कोणी वापरत नाही त्यामुळे टीप कागद काय असतो हे नविन पिढीला ठाऊक नसेल. शाई पेनने लिहिलेले पटकन वाळावे यासाठी अशा टीपकागदाचा वापर पूर्वी करत असत.. मनुष्य प्राण्यांत अशा टीप कागदांचा गुणधर्म असला असता तर श्रीपादरावांच्या नेतृत्वातील विविध गुण किती सहजपणे टीपता आले असते ना ?
मुंग्यांची रांग आपण पाहिली आहे. एका मागोमाग एक त्या चालत असतात. समोरुन येणाऱ्या काही मुंग्या या रांगेतील जवळपास प्रत्येक मुंगीपाशी काही क्षणाचे हितगुज करत असतात. विरुद्ध दिशेने येणाऱ्या या मुंग्या संख्येने कमी असल्या तरी रांगेतील प्रत्येक मुंगीला भेटायचा त्यांचा प्रयत्न असतो ... त्या काय संवाद साधत असतील ...देव जाणे.. कदाचित "प्रवासात आपण स्वतःहून किती जणांना भेटतो ?" हेच सूत्र तर त्यामागे नसेल ?
पण एक मात्र नक्की आहे की....
भेटीतून संवाद, संवादातून संपर्क, संपर्कातून एकता आणि एकतेतून एकात्मिक भावनेने ध्येयाकडे वाटचाल हे सूत्र अशा भेटींमागे असते ! संघटनेमध्ये काम करताना सगळ्या प्रवृत्तीच्या, स्वभावाच्या लोकांना सोबत घेऊन वाटचाल करावी लागत असते.. प्रत्येकाच्या क्षमता पातळीमध्ये फरक असतो....
या पार्श्वभूमीवर एक संस्कृत श्लोक या ठिकाणी नमूद करावासा वाटतो...
असज्जनः सज्जन सङ्गिसङ्गात् करोति दुःसाध्यम् अपीह साध्यम् ।
पुष्पाश्रयात् शम्भु शिरोधिरूढा पिपीलिका चुम्बति चन्द्रबिम्बम् ॥
म्हणजे...
एखादी सामान्य व्यक्ती ही सज्जन व्यक्तीच्या संगतीत राहून असाध्य असे कार्य सहजपणे करु शकते.. जसे एक मुंगी फुलाचा आधार घेत शंकराच्या माथ्यावरील चंद्रापर्यंत पोहोचू शकते..
श्रीपादराव हे आपल्यासारख्यांसाठी असे फुलांचा आधार देणारे होते..
विरुद्ध दिशेने येणाऱ्या प्रत्येक मुंगीच्या मनात जशी विचारांची स्पष्टता असते ... तशी ती श्रीपाद रावांच्या विचारात होती.. शंकराच्या माथ्यावरील चंद्र म्हणजे अर्थातच राष्ट्राला पुनर्वैभव प्राप्त होईपर्यंत कार्यरत रहाणे.. आणि त्यासाठी श्रीपादरावांसारख्या एखाद्या फुलाचा आधार घेत वाटचाल करणे म्हणजे ... आपल्या सगळ्यांचे जीवन हे एकप्रकारे अशा मुंगी सारखेच आहे.
आज २५ व्या स्मृति दिनाच्या दिवशी त्यांना हृदय पूर्वक वंदन !!!
बिंदुमाधव भुरे..







