Saturday, April 4, 2020

नऊ मिनिटाचे आवाहन

 *नऊ मिनिटाचे आवाहन !*

बलाढ्य, कावेबाज, छुपा हल्ला करण्यात तरबेज अशा शत्रूशी दोन हात करतांना गनिमी काव्याचा वापर यशस्वी ठरल्याचे इतिहास सांगतो. गनिमी काव्याच्या वापरात शत्रू आपल्याला पाहू शकत नव्हता मात्र आपण शत्रूला पाहू शकत होतो. सावज टप्प्यात येइपर्यंत दबा धरुन बसण्यात शहाणपणा असायचा. युद्ध जिंकण्यासाठी गनिमी कावा हा युद्धतंत्राचा एक भाग होता. 

एकीकडे साधनसामग्रीची कमतरता पण स्वराज्यासाठी सर्वकाही अर्पण करण्याची प्रबळ भावना तर समोर विपुल शस्त्रसज्जता व सैन्याची प्रचंड मोठी संख्या ! मात्र केवळ "जय भवानी जय शिवाजी", "हर हर महादेव" यांचा उदघोष मनामनात चैतन्य जागृत करायचा, स्वराज्यप्रेमाचे स्फुलिंग प्रज्वलित करायचा, सर्वस्व विसरुन एकजूट निर्माण करायचा ! मावळ्याच्या अंगी या नुसत्या घोषणेने बारा हत्तींचे बळ संचारायच. स्वराज्याप्रती समर्पण भावना जागवली जायची आणि मुबलक शस्त्रसज्जता असलेल्या अफाट संख्येच्या शत्रूला मावळे पराजित करायचे. 

समर्पण भाव, स्वराज्याप्रती त्यागभावना, निष्ठा यांना एका माळेत गुंफले जायचे ! एकजूटीच्या संकल्पासाठी हर महादेवची घोषणा हे एक निमित्त, यामुळे माळेची गुंफण अधिक भक्कम व्हायची ! आज आपल्या पुढ्यात उभे ठाकलेल युद्ध मोठ विचित्र आहे. शत्रूचा गनिमी कावा सुरु आहे. आपण त्याला पाहू शकत नाही मात्र तो आपल्याला पाहू शकतो. तो स्वैर आहे, मोकाट आहे, सध्या त्याच्यावर कोणतेही अस्त्र-शस्त्र परिणाम करु शकत नाही. 

त्याच्याशी रणांगणावर दोन हात करायचे असते तर आपण सगळे जय भवानी, हर हर महादेव घोषणेने युद्धभुमिवर एकवटलो असतो. पण आज आपल्याला गनिमी काव्याचा वेगळाच डाव रचायचा आहे. शत्रूला पळू दे मोकाट ! आम्ही आमच्या चार भिंतीच्या खंदकात दडून राहू. दमछाक होईल आणि तो निघून जाईल ! त्याला चुकवण्यासाठी आम्ही आमच्या घरात किती काळ दडून बसतो ? आजच्या गनिमी काव्याची खरी मेख यातच आहे. This is battle of patience. इथे वेगळ सैन्य नाही आपण सारेच सैनिक ! अशा युद्धाची आपल्याला ना सवय ना सराव ! 

अशा एका निशस्त्र युद्धाच्या चाचपडवणाऱ्या अंधारात एक आश्वासक किरण प्रज्वलित करायचा आहे ! आज युद्धभुमिवर एकीचे बळ देणाऱ्या घोषणेची नव्हे तर घराघरात एकटेपण सोसणाऱ्या समाजमनाला एकत्र बांधणाऱ्या एका सामुहिक कृतीची गरज आहे. त्याकरिता जनसामान्यांच्या आंतरिक शक्तीला, तेजाला साद घालायची ती घराघरात दीप प्रज्वलित करुन ! आपल्याच घरात कोंडलेल्या, एकटेपणाने ग्रासलेल्या आपल्या बांधवांना या संकटाला धैर्याने आणि एकजूटीने सामोरे जाण्याचा दृढसंकल्प पुनः एकदा अधोरेखित करायचा आहे ! या एकजूटीची साद घालण्यासाठी "आज रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे अन् नऊ दिवे" हे माध्यम म्हणजे केवळ एक निमित्त ! 

© बिंदुमाधव भुरे, पुणे
९४२३००७७६१
८६९८७४९९९०
bnbhure@rediffmail.com

1 comment: