Saturday, April 11, 2020


उप्पीट / उपमा / सांजा 

 साहित्य : 
१।। वाटी जाड रवा, १ कांदा, १ टोमँटो, २ मिरच्या, कोथिंबीर, २ चमचे (२५ मिलि) शेंगदाणा/करडई तेल, मीठ,५ वाट्या पाणी

कृती : 
१. गँसवर एकीकडे बारीक गँसवर कढईत रवा टाकून मंद आचेवर ठेवावा व दुसऱ्या बाजूला ५वाट्या पाणी मंद आचेवर ठेवावे. 
२. दरम्यान कांदा, टोमँटो, कोथिंबीर हे बारीक चिरुन घ्यावे. चिरतांना अधूमधून रवा उलत्न्याने हलवत रहावे. ३. पांढरा स्वच्छ रवा किंचित तांबूस होईपर्यंत भाजावा. नंतर तो एका ताटलीत काढून ठेवावा. 
४. याच कढईत २५ मिलि तेल टाकावे. गँसची आच मध्यम ठेवावी व त्यात दोन बोटांच्या चिमटीत बसेल इतकी मोहरी २ वेळा टाकावी. मोहरी तडतडल्याचा आवाज येताच गँस पुनः मंद ठेवावा. त्यात मग मिरचीचे तुकडे टाकावे, त्यापाठोपाठ चिरलेला कांदा ! हे छान परतावे कांदा किंचित तांबूस झाला कि टोमँटो टाकावा. हे मिश्रण एक मिनिटभर हलवावे. 
५. बाजूला ठेवलेले ५ वाट्या पाणी एव्हाना उकळले असेल. त्यापैकी ४।। वाट्या पाणी आता कढईत ओतावे. ओततांना कढईच्या जवळ पाण्याचे भांडे न्यावे म्हणजे गरम पाणी अंगावर उडणार नाही. 
६. आता गँस मोठा करावा, आपण टाकलेले पाणी गरम असल्यामुळे ते लगेच ऊकळायला लागेल. पाणी उकळायला लागले कि आच पुनः मंद करावी. 
७. आता त्यात मीठ टाकायचे आहे. आपण सूप प्यायला वापरतो तो निम्मा चमचा मीठ त्या पाण्यात टाकावे व दोन चिमूट (मोहरी सारखी) साखर टाकावी. हे पाणी चांगले हलवावे म्हणजे मीठ, साखर विरघळेल. 
८. मीठ योग्य प्रमाणात पडलय ना याची खात्री करण्यासाठी एका छोट्या चमच्यात कढ ईतले ते पाणी घ्यावे. ते कोमट होईपर्यंत हळूवार फुंकावे व पिऊन पहावे.
९. प्रमाण योग्य आहे याची खात्री झाली कि मग भाजलेला रवा हळू हळू पाण्यात सोडावा. गँसची आच मंद आहे याची खात्री करावी अन्यथा अंगावर थेंब उडून भाजण्याची शक्यता !
१०. या पाण्यात रवा मिसळून त्याला घट्टपणा येईपर्यंत हालवत रहावे. घट्टसर झाला कि त्यावर झाकण ठेवून एक मिनिटभर वाफ येऊ द्यावी. 
११. एक मिनिटानंतर पुनः एकदा चांगले हलवून उपमा कढईत वर खाली करावा. आवश्यक वाटल्यास ५ वाट्यांपैकी उरलेले पाणी उपम्याच्या भोवतीने सोडावे. उपमा परत एकदा हलवून त्यावर पुनः वाफ येण्याकरता एक मिनिट झाकण ठेवावे.
१२. एक मिनिटानंतर झाकण काढावे. उपमा एकदा हलवून बाऊलमधे सर्व्ह करावा. त्यावर आवडत असल्यास लिंबू पिळावा, थोडी बारीक शेव व कोथिंबीर टाकावी. 

बायकोला न विचारता, कोणाचीही मदत न घेता ही कृती समोर ठेऊन तुम्ही केलेला ऊपमा ... ही बायकोसाठी जगातील सर्वोत्कृष्ठ डिश असेल.  Just try & share the photos with your experience.  

बिंदुमाधव भुरे.

1 comment:

  1. Wonderful preparation,minute instructions,creative use of lockdown!
    Will definitely try!
    Looking for more such mouthwatering recipies during extended lockdown period.

    ReplyDelete