Wednesday, March 25, 2020

शिवरंजनीच्या निमित्ताने

चॅनल सर्फिंग करता करता झी क्लासिकवर येऊन थबकलो, "मेरा नाम जोकर" नुकताच सुरु झाला होता. रिलिज  झाला तेव्हा अपेक्षेइतका चालला नाही, किंबहुना पिक्चर तेव्हा तिकिटबारीवर साॅलिड आपटला होता अस म्हटल तरी चालेल. राजकपूरचा हा खुप महत्वाकांक्षी चित्रपट होता कारण त्याच्या रियल लाईफवर आधारित होता अस म्हणतात. त्यासुमाराला लता बरोबर बिनसलेल होत त्यामुळे या पिक्चरमधे एकही गाणी लताच्या आवाजात नव्हत असही तेव्हा कानावर आल होत. समोर पिक्चरच टायटल सुरु होत आणि मनात क्षणिक आलेले हे सगळे विचार काही सेकंदात जुन्या आठवणींमधे घेऊन गेले त्यामुळे खुप वर्षांनंतर पुनः एकदा हा पिक्चर पहायचा मूड आपोआप बनून गेला. 

या पिक्चरच्या सर्व गाण्यांवर तर फिदा पहिल्यापासुन होतोच. "ए भाय जरा देखके चलो" त्याकाळी खुप गाजल होत तरी माझ्या आवडीची खास म्हणजे आशाच "मोहे अंग लग जा बालमा", आशा व मुकेशच "आग ना लग जाए" आणि मुकेशच "जाने कहा गए वो दिन" ! पिक्चर त्याकाळात का पडला समजल नाही, पण म्हणे इतका पडला कि राजकपूर यापायी प्रचंड कर्जबाजारी झाला. 

राजचा बोलका चेहेरा, निळे डोळे यातून त्याच निरागस आणि "बिच्चारा" अस व्यक्तिमत्व  छान ऊभ रहायच. अगदी आवारा, श्री ४२०, जागते रहो, संगम, अनाड़ी असा कोणताही पिक्चर घ्या, एखादा सिन हा पठ्ठ्या असा देणार कि हमखास डोळ्यातून पाणी यायच. 

त्यामुळे कि काय माहीती नाही पण राजकपूर म्हटल कि मनाच्या कोपऱ्यात एक भोळाभाबडा, निष्पाप अशी विशिष्ट छबी कायम वसलेली असते. व त्यातून या पिक्चरमधे तिन्ही नायिका त्याचा शिडीसारखा वापर करतात अन् राजच त्यांच्यावरील प्रेम हे एकतर्फी होत हे त्याला कळत. 

या बॅगराऊंडवर जेव्हा शंकर जयकिशनने बांधलेली सुरवातीची अप्रतिम व आर्त सुरावट सुरु होते व मुकेशच्या धीरगंभीर अनुनासिक आवाजात "जाने कहा गए वो दिन" चे स्वर येतात, तेव्हा डोळ्यातले अश्रु दिसू नयेत म्हणुन काळा गाॅगल लाऊनही राजचे भरुन आलेले डोळे आपल्याला जाणवतात व नकळत आपणही डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा तेव्हा पुसतो. पिक्चर जेव्हां पहिल्यांदा पाहिला तेव्हा ह्रदयात झालेली कालवाकालव आजही होते इतकी ताकद या गाण्यात आहे, अर्थात चित्रिकरण प्रभावी आहे हे पण तेव्हढेच खर. त्यामुळेच या पिक्चरमधल हे गाण माझे सगळ्यात आवडत बनल. 

शास्त्रीय संगीतातल मला ओ कि ठो कळत नाही पण ह्रदय गलबलवून टाकणाऱ्या या गाण्याची सुरावट कोणत्याही रागाची असावी याचे कुतुहल तेव्हा निर्माण झाल होत. "शिवरंजनी" रागावर आधारित हे गाणी असल्याच माझ्या एका जाणकार दोस्ताने सांगितल. या रागातील सुरावटींनी जर आपल्या ह्रदयाचा कब्जा घेतला असेल तर याच रागातील अन्य गाणी पण साॅलिड असणार म्हणुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. 

त्याकाळी ना काॅम्पुटर होता ना गुगल.  तेव्हा आमच्या दोस्तांपैकी जे सवाई गंधर्वला जायचे अन् काॅलेजमधे कट्ट्यावर दुसरे दिवशी ज्यांच्या गप्पा रंगायच्या तेथे मूक प्रेक्षक म्हणुन मी कायम हजेरी लावत असे. तेव्हा या माझ्या रागदारी जाणणाऱ्या मित्रांकडून मी संधी साधून माहिती काढण्याचा प्रयत्न नेहमीच करत असे.

एकदा मग मला हवी ती माहिती म्हणजे शिवरंजनी रागावर आधारित गाणी कोणती याची लिस्ट मिळाली. जी माझ्या आठवणीत राहिली ती अशी होती ...

१. ओ मेरे सनम ओ मेरे सनम - लता - संगम
२. दिलके झरोखोंमे तुझको -रफी-ब्रम्हचारी
३. मेरे नैना सावन भादो - किशोर - मेहबूबा
४. बहारों फूल बरसाओ -रफी- सूरज
५. लागे ना मोरा जिया - लता - घूंघट 
६. बनाके क्यों बिगाडारे - लता - जंजीर 

अशी किती तरी छान गाणी या रागावर आधारित असतील. बहुतेक गाणी ही पिक्चरमधे गंभीर दृष्य असतांना चित्रित झालेली दिसतात अपवाद सूरज मधील बहारों फूल बरसाओ गाण्याचा. शंकर जयकिशन जोडीने केलेली गाणी, त्याच आॅरकेस्ट्रेशन हे केवळ अप्रतिम ! जाने कहा गए व दिलके झरोखोंमे या गाण्यांच्या आधीची वाद्यवृंदांची सुरावट आठवून पहा. नतमस्तक कोणाकोणापुढ व्हाव प्रश्नच पडतो, अर्थपूर्ण शब्दरचना करणारा गीतकार कि गाण्याचा भाव अचूक ओळखुन त्याला योग्य न्याय देत ते चालबद्ध करणारा संगीतकार कि आमचे कान तृप्त करणारे गायक ? 

या रागाचा सिनेसंगीतात शंकर जयकिशन इतकाच प्रभावी वापर आरडीनेही केला आहे. जेव्हां जेव्हां मी मेरे नैना सावन भादो हे मेहबूबा मधील किशोरच्या आवाजातल गाण ऐकतो तेव्हा तेव्हा मला हे प्रकर्षाने जाणवत. पाश्चात्य व भारतीय वाद्यांच्या सुरावटींचा मिलाफ या रागात करतांना किशोरकुमारचा लागलेला आवाज (कि जो खास राजेश खन्नासाठीच गायला जायचा, आठवा आराधना व दाग मधील गाणी) ऐकला कि मनोमन आरडीला सॅल्यूट मारला जातोच.

आता काॅम्प्युटरचा जमाना आहे. तुमच्या मनात बसलेल, खुप आवडणार गाण आठवा आणि विचारा गुगलला कि ते कोणत्याही रागावर आधारित आहे ? मग त्या रागात बांधलेल्या असंख्य गाण्यांची यादीच स्क्रीनवर येईल. त्यातली आवडती निवडक गाणी डाऊनलोड करुन ठेवा अन् हेडफोन लावून ऐका, मस्त वाटेल, मूड छान होईल आणि महत्वाचे म्हणजे एकटक कधीच वाटणार नाही !

बिंदुमाधव भुरे, पुणे.
१९ जानेवारी २०१७

No comments:

Post a Comment