Sunday, March 22, 2020

चौदा तास आणि ती पाच मिनिटे

*चौदा तास आणि ती पाच मिनिटे*

जीवाचा धोका पत्करुन जनसेवा देणाऱ्यांचे कौतुक करतांना आज सलग पाच मिनिटे चालणाऱ्या थाळीनाद, घंटानाद व टाळ्यांच्या आवाजाने ऊर भरुन आला. काल तिन्हीसांजेला पाखरांची किलबील शांत झाल्यानंतर नीरव शांतता होती. रात्रीतून केव्हातरी येणारा ओला ऊबेर गाड्यांचा आवाज, एखाद्या मोटरसायकलचा हॉर्न किंवा कुत्र्यांचे बेसूर भुंकणे संपून पहाटेची लगबग कधी सुरु झाली ते जाणवल नाही त्यामुळे कि काय सुर्योदया दरम्यान पक्षांची किलबिल प्रकर्षाने जाणवली. 

दिवसभर टीव्हीवर संपूर्ण देशाची हालहवाल दिसत होती. सुनसान रस्ते, सिमेंट काँक्रिटच्या जंगलातून गायब झालेले प्राणी, निर्मनुष्य रस्ते, हायवे, एसटीच्या डेपोत विसावलेल्या बसेस वगैरे. कधीकाळी दूरदर्शनवर रामायण सिरियल सुरु झाली कि रस्ते ओस पडायचे त्याची आठवण झाली. पण आज ही दृष्य पाहतांना मन धास्तावलेल होत. अनामिक भितीची झुळूक मनात स्पर्शून जाई तेव्हा नकळत अंग शहारुन जात होत.   

आज अस दृष्य दिसेल अस अगदी काल परवापर्यंत वाटत नव्हत. पं मोदींनी जनतेशी संवाद साधायच ठरवल आणि चौदा तास "जनता कर्फ्यू" च आवाहन केल. संपूर्ण बहुमत आहे, कायदा बनविण्याचे, राबविण्याचे स्वातंत्र्य आहे, यंत्रणा हातात आहे. मात्र हे सगळे मार्ग हातात असूनही हा माणूस जनतेच्या सहभागाचा मार्ग चोखाळायचे ठरवतो. ज्या रोगावर ईलाज नाही त्याला हरवण्याची शक्ती सामान्य जनतेमधेच आहे याची तो जनतेला जाणीव करुन देतो. 

केवळ ३०-३५ मिनिटांचे आवाहन ! जनतेच्या इच्छाशक्तीला केलेले आवाहन व त्यांंच्यावर व्यक्त केलेला विश्वास यातून आज "जनता कर्फ्यू"चे अविश्वसनीय चित्र निर्माण झाल होत. कोरोनाची दहशत असल्यामुळे लोकांनी घरी रहाणे पसंद केल याचे श्रेय मोदींना का ? असे बुद्धिवादी म्हणतीलही कदाचित् ! पण आजचा थाळीनाद, घंटानाद, टाळ्यांचा गजर हे देशभरातले दृष्य छोट्या पडद्यावर पाहिल्यावर हा परिणाम मोदींच्या आवाहनाचाच आहे हे मनोमन पटते. या पाच मिनिटांनी समस्त भारतीयांची मने सकारात्मक विचारांनी भारली होती. वाहिन्यांच्या पडद्यावर शरद पवारांसह अनेक नेत्यांना टाळ्यांच्या कौतुकसोहळ्यात सामील होतांना पाहून या माणसाच्या संघटन कौशल्य व नेतृत्व गुणांना पुनः एकदा मनोमन सलाम ठोकला. 

जनता कर्फ्यूचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता व कोरोनाच्या संभाव्य संसर्गाच्या व्याप्तीची दहशत लक्षात घेऊन कदाचित हा प्रयोग आणखी काही दिवस राबवला जाण्याचा निर्णय होईल. त्यातूनच या संकटावर मात केल्याचे चित्र भविष्यात दिसेल असा विश्वास बाळगूया. सरकार जे जे आवाहन करेल त्याला प्रतिसाद देऊया. एकजूटीने असाध्य ते साध्य होते हे जगाला दाखवून देऊया.

©श्री बिंदुमाधव भुरे, पुणे
९४२३००७७६१/८६९८७४९९९०
bnbhure@rediffmail.com

No comments:

Post a Comment