Tuesday, March 24, 2020

स्ट्रिमिंग

*स्ट्रिमिंग*

तेव्हा *स्ट्रिमिंग* शब्दाचा तांत्रिक अर्थ मला कळत नव्हता. इंटरनेटद्वारे एखादी व्हिडीयो क्लिप पहात असतांना मधेच स्क्रीन स्तब्ध होतो, थांबतो आणि त्यावर एक लहानसे वर्तुळ गोल गोल फिरत असते. मला काही कळायच नाही हे गोल गोल काय फिरतय ते ! 

मग कोणीतरी सांगितल कि इंटरनेटचा स्पीड कमी असला कि स्क्रीनवर अस एक वर्तुळ गोल गोल फिरत रहात. इतका का वेळ लागतोय ? मनात प्रश्नचिन्ह मात्र कायम ! जाणकार सांगायचे काहीतरी तांत्रिक भाषेत पण ते काही डोक्यात घुसायच नाही. मग एकाने सांगितल कि आपण संगणकावर पाहू इच्छित असलेली माहिती हवेत असते व ती खाली उतरुन स्क्रीनवर यायला जो वेळ लागतो ते म्हणजे ते गोल गोल फिरण, त्याला *स्ट्रिमिंग* म्हणतात ! पटल होत लगेच ! 

हळूहळू तांत्रिक सज्ञांचा अर्थ बऱ्यापैकी कळू लागला. त्यातल्या त्यात *रिबूट, सिस्टिम हँग, फॉरमँट, कंट्रोल आल्ट डिलिट आणि रिस्टार्ट* यासारख्या शब्दांचा उच्चार दिवसभरात इतक्यावेळा व्हायचा कि कदाचित पुणेकरांच्या जिभेवर आयला शब्दपण इतक्यांदा येत नसेल.

कालांतराने हे गोलगोल फिरण बंद झाल. ८-१० मिनिटांची व्हिडीयो क्लिप सलग पाहता येऊ लागली. पण खर सांगू पूर्वी त्या *स्क्रीनवर गोल गोल फिरणाऱ्या वर्तुळाकडे पहातांना मनात उत्सुकता* असायची. आता जर अस काही स्ट्रिमिंग क्षणभरासाठी जरी झाल तर *सैरभैर व्हायला होत. आमचा पेशंस कमी होत चाललाय, मनाची अस्वस्थता वाढत चालली आहे. आम्हाला थांबायला वेळ नाही.* 

 स्पर्धेच युग सुरु झाले त्याला काळ लोटला. या स्पर्धेने नंतर वेग पकडला आणि *आज या वेगाचीच स्पर्धा सुरु झाली आहे.* व्यापारी उदारीकरण व इंटरनेटमुळे अवघ जग मुठीत सामावल गेलय. अगदी सगळ्यात वेगवान इंटरनेट आमचच सांगणारी जाहिरातही नको तेवढा वेळ दिसत असते. खरच इतका वेग मानवाला हवा आहे ? आजच्या युगात *एखाद्या देशाचा मानबिंदू हा वेग बनलाय व त्याची प्रगती मोजण्याचे एक परिमाणही !* 

उत्क्रांतीच्या वाटचालीत अनेक शोध मानवाने लावले. अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टींचे निदान व आकडेमोड करुन अचूक निष्कर्ष देणारा संगणक त्याने शोधला. या शोधप्रक्रियेत निसर्ग नियमांचे कळत न कळत उल्लंघन करणाऱ्या मानवाला कधी त्सुनामी तर कधी अतिवृष्टी यासारख्या घटनांच्या रुपांनी वठणीवर आणण्याचा प्रयत्न *"त्याच्याकडून"* झाला. काही काळासाठी *"त्याने"* सिस्टीम हँग केली म्हणूया आपण ! ज्या ज्या वेळी आपल्याला शक्तीचा गर्व झाला त्या त्या वेळी *"त्याने"* आपल्याला आपली जागा दाखविली आहे. 

आज सुइच्या टोकावर लाखोच्या संख्येने मावतील असा सूक्ष्म विषाणू अवतरला आहे. संपूर्ण जगावर या विषाणूने जणू डोळे वटारले आहेत. स्वैर भरकटलेल्या, प्रगतीचे वारु चौखूर उधळलेल्या मानवाने नियमांच्या चौकटीत रहावे यासाठी त्याला घराच्या चार भिंतीत *"त्याने"* बंदिस्त केलय. सगळ स्तब्ध झालेल जग पाहून मला उगाचच वाटून गेल कि हे *"त्याचे" स्ट्रिमिंगच* सुरु आहे. पडद्यावर पुढचे चित्र येइपर्यंत सगळ काही *स्तब्ध झालय.* 

हे गोल गोल फिरण थांबून पुनः स्क्रीन चालू होईल ? कि नियमांच्या चौकटी ओलांडल्या गेल्या तर *"तो"* सिस्टीम रिबूट करेल ? सध्या तरी *"त्याने"* जागतिक व्यवस्था हँग केली आहे. अँटीव्हायरस प्रोग्राम रन करतो तेव्हा अनेक फाईल्स *क्वारंटाईन* होतातच ना ? *संगणकाच्या सुरक्षिततेसाठी जे उपाय आपण शोधल ते आपल्यावरच लागू करायला काय हरकत आहे ?* आपण सगळेच क्वारंटाईन होऊया म्हणजे स्ट्रिमिंग संपल्यावर पुनः एकदा सुखद चलचित्राची अनुभूती मिळेल ! अगदी गोल फिरणाऱ्या वर्तुळ असल तरी चालेल !

गुढी पाडवा व नववर्षाच्या शुभेच्छा !

*©श्री बिंदुमाधव भुरे, पुणे*
*९४२३००७७६१*
*८६९८७४९९९०*
*bnbhure@rediffmail.com*

1 comment:

  1. You have uncanny knack for finding similies and flair for writing,keep it up!
    We really don't know at this stage how the world will look after the virus is gone.Hope the world learns its lessons well and amend the ways
    Really thought provoking article.

    ReplyDelete