Tuesday, July 16, 2019

मुद्दल


"मुद्दल"

दिगंबर उर्फ दिग्या .. उभ आयुष्य बँकेत डेबिट क्रेडिट करण्यात गेल. तो एक काळ होता  ... इयर एंड आल कि डिपॉझिट आणण्यासाठी भटकंती करावी लागायची विनवण्या कराव्या लागायच्या. वर्षातून एकदा "बचत सप्ताह", "डिपॉझिट मोबिलायझेशन विक" किंवा "बचत पंधरवडा" यासारखे उपक्रम बँक साजरे करायची. या कालावधीत खाते उघडणाऱ्या खातेदारास कि-चेन, एखाद पेन वगैरे भेट दिल जायच. 


तेव्हा डिपॉझिट वर मिळणारे व्याजाचे दर तेरा / चौदा टक्के म्हणजे अगदी मुद्दलाचाही विसर पडावा इतके आकर्षक होते त्यामुळे मिळणाऱ्या "व्याजाला किंमत" होती आणि म्हणूनच आयुष्यात "व्याजाला महत्व" होते. पासबुक मधल्या नोंदीप्रमाणे घरी व्याजाचा हिशोब करणारा व बँकेने दीड रुपया व्याज कमी दिलय म्हणून भांडणारा ग्राहक दिग्याला आजही लक्षात होता कारण त्याने दिग्याला बँकेत काय झोपा काढायला येता का ?” असे सुनावले होते. पूर्ण सर्विसमध्ये असे अनेक नमुने दिग्याला भेटले होते.


काळ धावत होता, परिस्थिती बदलत होती अन बँकिंगही ! वैयक्तिक आयुष्यात जितके चढ-उतार पाहिले नसतील तितके चढ-उतार व्याज दरात झाल्याच त्याने गेल्या काही वर्षात पाहिले होते. व्याज दर कमी झाले कि चिंतातूर ग्राहक डिपॉझिट काढून दुसऱ्या बँकेत जाणार. दिग्याने त्यांना प्रश्न केला कि तिकडे व्याज दर अर्धा टक्का जास्त आहे हे हमखास ठरलेले उत्तर कानावर पडायच. बऱ्याचशा सहकारी बँकात व्याज दर जास्त मिळत असे पण कराड बँकेसारख एखाद प्रकरण घडायचं अन मग अर्धा टक्का व्याजाच्या मोहापायी गेलेल्या ग्राहकांचे मुद्दलच परत मिळायचे वांदे व्हायचे. 


थोड्या जास्त व्याजासाठी वेगवेगळ्या बँकांचे उंबरठे झिजवणाऱ्या ग्राहकांना समजावतांना दिग्या त्यांना सांगत असे भले आमच्याकडे व्याज कमी मिळत असेल पण मुदतीनंतर तुमचे मुद्दल परत मिळण्याची इथे खात्री आहे. ग्राहकही चिकित्सक ... त्यांचे प्रश्नावर प्रश्न सुरु असायचे. मग दिग्याच भन्नाट लॉजिक काम करुन जायच. अहो, आर्थिक अडचणीत सापडलेला माणूस जास्त व्याज द्यायला तयार असतो ना ? मग बँकाचही तसच आहे समजा. जास्त व्याजाच्या मोहात पडून मुद्दल धोक्यात टाकू नका, इमरजंसीला, अडचणीच्या वेळी मुद्दल मोडून पैसे पटकन मिळायला हवेत ना ?” ही मात्रा बरोबर लागू पडायची.  फक्त व्याज अन् व्याजाचाच विचार करणाऱ्या मंडळींना मुद्दलाबाबदचा असा दृष्टिकोन दिग्यामुळे लक्षात यायचा व मुद्दलाचे महत्व समजायचे. 


ग्राहकांना सांगता सांगता कळत नकळत दिग्याच मनही "मुद्दल जपल पाहिजे, व्याज थोड कमी मिळाल तरी हरकत नाही" या मतावर ठाम होत गेले. आज रिटायर झाल्यावर फंडाचे व अन्य मिळालेली सगळी रक्कम त्याने बँकेत फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवून मुद्दल सुरक्षित केल होत. त्यावर मिळणारे व्याज व पेन्शन यात आपल भागल पाहिजे याकडे त्याचा कटाक्ष असे. शेयर्स अन् म्युचवल फंडाच्या भानगडीत तो कधी फारसा पडला नव्हता. 


सर्विसमध्ये असतांना संसारिक जबाबदाऱ्यांचे ओझे उरावर होत म्हणून बिचाऱ्याने ना कधी मुक्त हस्ते खर्च केला ना कुठली चैन. कुठेही वायफळ खर्च होणार नाही हे त्याने वेळोवेळी पाहिल होत आणि आजही तो कटाक्षाने ते पाळतो. पण आता वाढती महागाई, घसरणारे व्याजदर, तुटपुंजी पेन्शन यातच खर्च भागवण्याची कसरत करणे त्याला दिवसेंदिवस अवघड जात होते. वयोमानानुसार दवाखाना, औषधे, क्लिनिकल टेस्ट तर कधी हॉस्पिटलायझेशन यांचा खर्च आता यादीत डोकावत होता.


बँकेत कस्टमरशी संवाद साधतांना संयम ढळू न देता गोड बोलण्याच्या बदल्यात दिग्याला साखरेचा आजार ... मधुमेह मागे लागला होता. घरच्या आघाडीवर बायको वत्सला उर्फ वसू एकटीच. घर संभाळणे, मुलाचे बघणे अन् दिलेल्या बजेटमधे घरखर्च भागवणे. कायम हसरा चेहेरा ठेवून दुःख, तक्रार यांना कधीही मोकळी वाट करुन न देण्याच्या बदल्यात उच्च रक्तदाब ... हाय-बीपी तिच्या मागे लागल होत. मुलगा शिकण्यासाठी म्हणून यूएसला गेला अन् नंतर तिथेच जॉब लागला होता. वर्षा दोन वर्षातून एकदा भारतात यायचा ते ही कामासाठी. आला कि धावपळीत एखादा दिवस भेटून जायचा. दिग्या आणि वसूसाठी तो दिवस दिवाळीसारखा असायचा. त्यामुळे "उतारवयातली काठी" म्हणून त्याचेकडे त्यांनी कधीच पाहिल नाही. 


शांत झोप लागलेल्या वसूच्या चेहेऱ्याकडे दिग्या एकटक पहात होता. घरात चक्कर येण्याच निमित्त झाल. डॉक्टरने बीपी खूपच हाय झाल सांगितल आणि इसीजी पाहून अँडमिट करण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टर येऊन पाहून गेले होते, सलाईन सुरु होत. दोन तीन कसल्याशा टेस्ट झाल्या कि रिपोर्ट पाहून नंतरची लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवू म्हणाले. "दिग्या, ए दिग्या" अनिलच्या हाकेने दिग्याची तंद्री भंगली. अनिल दिग्याचा बालमित्र आणि बँकेतला सहकारीही होता. ५० वर्षांची दोस्ती .. त्यामुळे अनिल म्हणजे टेंशन डाऊनलोड करुन मन मोकळ करण्याच दिग्याच हक्काच ठिकाण. आठवड्यातून एकदा तरी दोघेही एकमेकांना हमखास भेटायचे. आज वसूला अँडमिट करतांना दिग्याने पहिला फोन अनिललाच केला होता.


वसूला नुकतीच झोप लागली होती त्यामुळे दोघेही रुमच्या बाहेर बसले होते. दिग्या आज म्हणावा तसा मोकळा होत नाहीये हे अनिलच्या लक्षात आल होत. वसूच्या रिपोर्टमधे काय निघेल याच टेंशन असेल कि मुलाला लगेच कळवाव कि रिपोर्टची वाट बघेपर्यंत थांबाव ? अशी त्याची द्विधा मनःस्थिती झाली असेल. अनिल त्याच्या मनाचा अंदाज घेत होता. पैसा अनाठायी खर्च न करणे आणि हातचे राखून खर्च करण्याची सवय असलेल्या दिग्याला पैशाच टेंशन असायच काही कारण नव्हत हे त्याला ठाऊक होत अन् हॉस्पिटल बिलासाठी मेडिक्लेम होताच ! मग दिग्या त्याच मन मोकळ का करत नाहीये याच कोड अनिलला पडल होत. मुद्दलाची काळजी करण्याची सवय अंगी भिनलेल्या दिग्याच्या मनात काय सुरु असेल याचा अंदाज घेत अनिलने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. 


"दिग्या, तुझी थियरी बरोबर आहे. पण आयुष्यभर मुद्दल सुरक्षित ठेऊन व्याजावर जगणे शक्य नसते. लेका, आयुष्याच्या एका टप्प्यानंतर मुद्दलही खर्च करायच असत. जिना चढत चढत शेवटच्या पायरीवर आल्यानंतर काय ? तर एक एक पाऊल पुनः उतरायच असते. सेवानिवृत्तिच्या दिवशी या पायऱ्या उतरायला आपण सुरुवात केली आहे." दिग्या थोडा संभ्रमात पडला होता. त्याला मधेच थांबवत तो म्हणाला, " मला बँकेत केलेल्या एफडी मोडायला लागणार, माझ मुद्दल ...... असल काही तू समजत असशील तर ते साफ चूक आहे रे ! अन्या, अरे वेळ पडली तर आख्खा बँक अकाऊंट रिकामा करेन. पण वसू मला हवी आहे." दिग्याचा स्वर हळवा झाला होता.


अनिल मंद हसला, "दिग्या लेका, मी त्या मुद्दलाबद्द्ल नाही बोलत आहे. आर्थिक प्रॉब्लेम्स कशामुळेही येऊ शकतात. अशा वेळी एफडीवर लोन घ्यायच किंवा ती मोडायची हे का आपल्याला ठाऊक नाही ? पण काळाच्या ओघात हळूहळू त्या मुद्दलाची व्हँल्यू कमी होऊ लागते. इन्फ्लेशनमुळे म्हणा किंवा आणखी कशामुळे ... एक दिवस ते असून नसल्यासारखे होते." दिग्याच्या चेहेऱ्यावर अजून प्रश्नचिन्ह तसेच होते. अनिल बोलत होता .. "दिग्या आपली वाटचाल सत्तरीकडे सुरु झाली आहे, केव्हातरी घंटी वाजणार. मग या मुद्दलाची किती काळजी करशील ? तेही खर्च होत रहाणार अन् एक दिवस संपणार .. बँलन्सशीट मधे डेप्रिसिएशन नावाचा आयटेम असतो ना ? तो आणि इन्फ्लेशन हे दोन्ही फँक्टर्स आपल्यालाही लागू होतात समज. हे जीवनाच वास्तव आहे दिग्या ! हे वास्तव स्वीकारलस तर तुझ सगळ टेंशन संपून जाईल." दिग्यासमोर आज मुद्दलाची वेगळीच बाजू प्रकाशात आली होती. 


डॉक्टर राऊंडवर येतांना दिसले तसे दिग्या ऊठला. "काळजी करु नकोस, सगळ काही ठीक होईल. काही लागल तर सांग .... येतो मी" म्हणून अनिल निघाला. दिग्याच्या मनाची घालमेल थांबली होती, डोक्यातल विचारांचे वादळही निवल होत. मुद्दल शब्दाची वेगळी व्याख्या, वेगळा अर्थ सांगून जाणारा अनिल त्याक्षणी त्याला डॉक्टरांच्या इतकाच देवदूत वाटत होता.


© बिंदूमाधव भुरे, पुणे.
९४२४००७७६१ / ८६९८७४९९९०

6 comments:

  1. Replies
    1. मनापासून धन्यवाद !

      Delete
  2. खूपच छान लेख काही तरी नवीन शिकवून गेला

    ReplyDelete
  3. कळतं पण वळत नाही

    ReplyDelete