Friday, September 28, 2018

बोलके मौन

बोलके मौन

हिऱ्यासारख्या अनेक मौल्यवान खड्यांनी सजविलेल्या असंख्य दागिन्यांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन २०१९ मधे भरणार होते. दागिन्यांची किंमत कित्येक अब्ज डॉलर असावी. अर्थात त्यांच्या सुरक्षिततेची खास व विशेष खबरदारी घेणे ही "भारत इंटरनँशनल्स" या प्रदर्शन आयोजक कंपनीची  मोठी जबाबदारी होती. "एनएम सिक्यूरिटीज" व "आरजी सिक्यूरिटीज" या सगळ्यात मोठ्या दोन स्पर्धक कंपन्यांपैकी "एनएम सिक्यूरिटीज"ची निवड "भारत इंटरनँशनल्स"ने काही निकषाधारे केली अन् "आरजी सिक्यूरिटीज"ला मोठा धक्का बसला. 

दिवसरात्र गस्त घालणारे पाच पन्नास बंदूकधारी पोलिस व त्याजोडीने खडा पहारा अशी ठोकळेबाज चौकटीतील सुरक्षाव्यवस्था पुरेशी नव्हती. त्याच्या जोडीला मोठ्या मॉल्समधे, ज्वेलरी शॉप्समधे, अनेक कार्यालयांमधे, हॉस्पिटल्समधे, सहकारी ग्रुहरचना संस्थांमध्ये असते तशी मात्र अधिक प्रगत,अत्याधुनिक CCTV कँमेरे यंत्रणाही आवश्यक होती. असे कँमेरे ऑनलाईन विकत घेता येतात किंवा एखाद्या वितरकाकडूनही घेता येतात. इनस्टॉलेशन व डेमो दिल्यानंतर त्याचे खरे काम सुरु होते. पण बाजारात किंवा ऑनलाइन मिळणारी यंत्रणा ही कुचकामी ठरण्याची भिती होती कारण त्याचे सुरक्षाविषयक तंत्र वा मेकँनिझम् याचा तपशील शोधता येतो ... गुगलचा जमाना आहे हा !

त्यामुळे "एनएम सिक्यूरिटीज"ने CCTV यंत्रणेमधे तज्ञ असणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय नामवंत कंपन्यांशी संपर्क साधला व "नफाइल" नामक एका फ्रेंच कंपनीची निवड केली. या कंपनीने अन्य देशांमधे पुरविलेल्या अशा प्रकारच्या CCTV कँमेऱ्याची माहिती दिली. "आरजी सिक्यूरिटीज"नेही काही वर्षांपूर्वी जी यंत्रणा पसंत केली होती त्याचीही माहिती घेतली. हीच यंत्रणा सर्वार्थाने योग्य  होती. परंतू, "एनएम सिक्यूरिटीज'ने त्यात असे काही आमुलाग्र बदल घडवण्यास सांगितले कि ज्यामुळे ही यंत्रणा खुपच भक्कम अगदी अभेद्य म्हटले तरी चालेल, अशी झाली.

अर्थात त्याची किंमतही त्यामुळे वाढली होती. "एनएम सिक्यूरिटीज"ला "भारत इंटरनँशनल"ने विश्वासाने सोपविलेल्या जबाबदारीशी प्रामाणिक राहात आपली कर्तव्यपूर्ती करणे महत्वाचे वाटत होते. त्यामुळे त्यांनी CCTV चा व्यवहार हा त्यातील अभेद्य ठरणाऱ्या बदलांची व त्याचेशी निगडीत किंमतीची गुप्तता राखण्याच्या अटींवर  पूर्ण केला. स्पर्धक "आरजी सिक्यूरिटीज"ने मग किमतीच्या मुद्द्यावरुन "भारत इंटरनँशल्स"चे कान भरण्यास सुरवात केली.

किंमतीवरुन वारंवार आरोप करत राहिल्यास एक दिवस "भारत इंटरनँशनल्स"नाही या तथ्य वाटू लागेल असा "आरजी"चा कयास होता. "एनएम"ने मात्र यावर मौन बाळगणे पसंत केले. कारण वाढीव किंमतीचे स्पष्टीकरण द्यायचे म्हणजे नेमक्या कोणत्या सुरक्षाविषयक बदलांसाठी किती पैसा मोजला हे उघड करणे होय. आणि CCTV यंत्रणेमधे सुरक्षाविषयक केलेल्या अभेद्य अशा विशेष तरतूदी "किमतीचे आरोप खोटे आहेत" हे सिद्ध करण्यासाठी जगजाहीर करणे म्हणजे ज्ञात, अज्ञात  हल्लेखोरांना कुठे व काय लपविले आहे ते सांगण्यासारखे होते.

प्रदर्शनाची तारीख अद्याप दूर होती. "आरजी"चे आकांडतांडव करणे, आरोप करणे सुरुच होते. पण "एनएम"चे मौन अधिक बोलके सिद्ध होत होते कारण त्याना माहित होते कि "भारत इंटरनँशनल्स"चा त्यांच्यावर  द्रुढ विश्वास आहे.

© बिंदूमाधव भुरे, पुणे

No comments:

Post a Comment