Friday, October 19, 2018

परतफेड

श्री लक्ष्मणराव ढोबळे, वय ७०, डॉ समीरना नाव ओळखीचे वाटले. त्यांना बसण्याची खूण केली. पांढरे स्वच्छ धोतर, अंगात काळा कोट, डोक्यावर गांधी टोपी ! ३२ वर्षांपूर्वीचा तोच चेहरा, करारीपणा थोडा मावळला होता, वयोमानापरत्वे चाल मंदावली होती. उजव्या हातात आधारासाठीची काठी, पण ती नाईलाज म्हणून असे चेहरा सांगत असावा कि तोच एकमेव आधार याची सूचक होती ?

डॉ समीरने "कसे आहात ? काय होतंय ?" वगैरे चौकशीआर्जवीपणाने केली. लक्ष्मणरावानी चालताना दम लागणे वगैरे तक्रारी सांगितल्या व काही रिपोर्ट्सच्या आधारे फँमिली डॉ देशमुख यांनी बायपास करावी लागेल असे सांगत त्यांनी तुम्हाला भेटायला सांगितले असे म्हणाले. समीरने रिपोर्ट्स पाहिले होते, डॉ देशमुख यांच्याशी फोनही झाला होता. त्यामुळे ऑपरेशन तातडीने करावे लागेल हे त्याच्या लक्षात आले होते.

“घरी कोण कोण आहे ?” समीरने प्रश्न केला. उजव्या हाताचे बोट उभे दाखवून “एकटाच” असे त्यांनी खुणेने सांगितले. “मग जेवणाचे काय ?” समीरचा एक साहजिक प्रश्न ! एव्हाना लक्ष्मणरावानाही मोकळेपणाने बोलावेसे वाटू लागले होते. “मुलगी व जावई यांच्याकडे राहतो. जावई भला माणूस हो ! खासगी नोकरी आहे, मुलगीही फावल्या वेळात घरगुती व्यवसाय करून संसाराला हातभार लावते. डॉक्टर, मी सत्तरी ओलांडली आहे, आता या वयात बायपासचा इतका मोठा खर्च कशाला ? मुलगी, जावई ओढाताण करुन पैसा उभा करतीलही पण ते मला नको आहे. तुम्ही काहीतरी औषधे द्या जेणे करुन त्रास कमी होईल व तब्येतीला काही दिवस आराम पडेल." 

डॉ समीरने सगळे काही शांतपणे ऐकून केलेले स्मितहास्य लक्ष्मणरावांना दिलासा देउन गेले. त्याने लक्ष्मणरावांकडून मुलीचा व जावयाचा फोन नंबर घेतला. सँपल आलेल्या औषधातून काही गोळ्या देत त्यांना "काळजी करु नका, सगळ काही ठीक होईल, निर्धास्त रहा" असा दिलासा दिला.  सगळे पेशंट तपासून झाले. समीरने घड्याळात पाहिले व श्री देसाईंसरांना फोन केला. श्री लक्ष्मणरावांच्या केसबद्दल कानावर घातले. "पैशाची फिकीर करू नकोस, ऑपरेशनची तयारी कर. गुरुजींच्या तब्येतीची काळजी माझ्याकडे लागली." देसाईंच बोलणे ऐकून समीर हसला व म्हणाला "सर, मी त्यासाठी नाही फोन केला. तुम्हाला कल्पना असावी म्हणून कानावर घातले इतकेच ! त्यांच्या मुलीशी व जावयाशी मी बोलतो आहे. ऑपरेशन झाले कि पुनः फोन करेन" असे म्हणून समीरने फोन ठेवला.

समीरचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटूंबात झाला होता. वडिल गजानन, शिक्षण जेमतेम पदवीपर्यंतचे. शिक्षण पूर्ण करुन लवकरात लवकर नोकरी धरणे ही त्यांच्या घरातील परिस्थितीची मागणी. त्यामुळे एका खाजगी व्यावसायिकाकडे गजाननने नोकरी पत्करली व मोकळ्या वेळेत चौथी पर्यंतच्या मुला मुलींच्या शिकवण्या घेऊन घराचा चरितार्थ चालवला. आई थकलेली ! तिचा सारखा हेका सुरुच "गजा, आता लग्न कर, सुनबाई आण बाबा. माझाच्याने होत नाही आता."

आईच्याच लांबच्या नात्यातली एक मुलगी मामाने सुचविली, गजाने होकार दिला अन् फारसा गाजावाजा न करता अगदी साधेपणाने लग्न पार पडले. सुनबाई - वसुधा, गृहलक्ष्मी घरी आली, घराला घरपण आले. माऊली सुखावली. समीरचे - नातवंडाचे तोंडही तिने  पाहिले होते. आजारपण, अंथरुणाला खिळून रहाणे, सारखा दवाखाना वा हाॅस्पिटल यापायी सगळ्या घराच अर्थकारण न बिघडवता माऊलीने झोपेतच राम म्हणत पैलतीराच्या यात्रेचा प्रारंभ केला. 

ज्या सुखाची, समाधानाची व आनंदाची वाट पाहिली ते पदरी पडले, अनुभवले ! आता कशाल थांबायचे ? मुलाला व सुनेला वाटेल काही काळ कि अकाली गेली म्हातारी ! पण घरादाराला आजारी पाडून जाण्यापेक्षा अशी एक्झिट कितीतरी चांगली अशी स्वतःच्या मनाची व बायकोची गजाने समजूत घातली व दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला.

गजाची खाजगी नोकरी व जोडीला शिकवण्या सुरुच होत्या. समीरमधील बुद्धिमत्ता त्याच्यातल्या शिक्षकाने हेरली होती. शिक्षणाअभावी व परिस्थितिच्या रेट्यामुळे आपली जी आर्थिक स्थिती आहे त्याची सावली समीरवर पडू नये यासाठी त्याची धडपड सुरु होती. स्पर्धेच्या आणि दिखाऊपणाने भरलेल्या जगतात घरगुती शिकवण्या ऐवजी पालकांचा कल मुलांना हायफाय क्लासमधे टाकण्याकडे आता सुरु झाला होता. परिणामी शिकवण्यातून मिळणाऱ्या ऊत्पन्नात घसरण होऊ लागली. वसुधाने हे वेळीच ओळखले व संसाराचा सगळा व्यापक संभाळून छोटासा घरगुती केटरिंग व्यवसाय करु लागली.

समीरचा कल मेडिकलकडे होता. त्याच्या गुरूजनांनी ते कधीच ओळखल होत मग गजाननाच्या नजरेने ते हेरले नाही असे कसे बर म्हणता येइल ? सोंग साऱ्या गोष्टींची आणता येतील पण पैशाच कुठून आणणार ? अंथरुण पाहुन पाय पसरावे ही म्हण बाबा अक्षरशः जगतांना पहात पहात समीर लहानाचा मोठा झाला होता. घराच्या आर्थिक गणिताचा भार पेलण्याइतका नसला तरी ते कळण्याइतका तो मोठा झाला होता. 

रिझल्टचे पेढे गणरायासमोर गजा व वसुधाने ठेवले. समीर बोर्डात आला होता, चहुकडून कौतुकाचा वर्षाव सुरु होता, मिडियाचे कँमेरे व मुलाखती यांना सामोऱ्या जाणाऱ्या लेकाला पाहून त्या दोघांनाही आयुष्याचे सार्थक झाल्याची अनुभूती पदोपदी येत होती.
पेढे घेऊन समीर ढोबळे गुरूजींकडे निघाला होता. जातांना मनात असंख्य विचार घोळत होते.  पेढे देऊन त्याने ढोबळे गुरुजींना वाकून नमस्कार केला. त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांनी प्रश्न केला, "समीर, काय ठरवले आहेस पुढे ?" "सर, एखादा पार्टटाइम जॉब करावा किंवा आईला केटरिंगला मदत तरी करावी. इच्छा तर आहे मेडिकलला जायची पण, ते केवळ अशक्य आहे सर !" गुरुजी समीरची आर्थिक स्थिती जाणून होते पण समीरच्या गुणवत्तेवर त्यांचा कमालीचा विश्वास होता. "आपण बघूया काय करता येईल ते" असे धीराचे बोल व आशीर्वाद ढोबळेगुरुजींनी दिला.

समीर जाताच गुरुजींनी तडक देसाई इंडस्ट्रीजचे ऑफिस गाठले. श्री अभिजीत देसाई मिटींग संपवून आपल्या केबिनकडे निघाले होते. केबिनबाहेर सोफ्यावर श्री ढोबळेगुरुजींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला व हात धरुन केबिनमधे नेले. पाण्याचा घोट घेत गुरुजी म्हणाले "तुझा जास्त वेळ नाही घेणार अभिजीत ! थेट मुद्द्यालाच हात घालतो" असे म्हणून त्यांनी समीरची केस सांगितली व म्हणाले "अभिजीत, हा मुलगा डॉक्टर व्हायला हवा, याच्यातली गुणवत्ता अशी वाया जाता कामा नये. याच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी तू उचलावीस." गुरुजींच्यामुळेच आज देसाई इंडस्ट्रीज व अभिजीत देसाई यांना एक ओळख होती. "गुरुजी तुम्ही आज्ञा करा, तुमचा तो अधिकार आहे." अभिजीतच्या आश्वासनाने गुरुजींना भरुन पावल्यासारखे झाले.

ज्या ढोबळे गुरुजींमुळे समीर आज प्रख्यात डॉक्टर होता त्या ढोबळे गुरुजींनी अभिजीत देसाईंकडे शब्द टाकला नसता, किंवा देसाईंनी शिक्षणाचा खर्च केला नसता तर ? समीर या दोघांच्याही ऋणात राहू इच्छित होता. आज ढोबळे गुरुजी हे श्री लक्ष्मणराव ढोबळे, एक हार्ट पेशंट म्हणून समीरकडे आले होते. डॉ समीरने ऑपरेशन यशस्वी केल होत. मुलगा व जावई त्यांना हॉस्पिटलमधून घरी न्यायला आले होते. लक्ष्मणरावांनी लेकीला विचारले, "बाळांनो, बिलाचे पैसे कसे उभे केलेत ?" जावयाने त्यांचा हात हातात घेत सांगितले "बाबा, डॉ समीर यांनी फी लावली नाही तर देसाईंनी हॉस्पिटलचा खर्च उचलला. आणि हे दोघेही तुमचे विद्यार्थी आहेत."

डॉ समीर व अभिजीत दोघांनीही गुरुजींना वाकून नमस्कार केला. गुरुजींनी पाणावलेल्या डोळ्यांनी दोघांच्याही पाठीवर मायेने आशीर्वादाचा हात फिरवत प्रश्न केला "अरे, आधी काहीच का बर नाही बोललात दोघेही ?" "गुरुजी, मग तुम्ही ऑपरेशनला नकार दिला असता" डॉ समीरने समजावले. "तुमच्या ऋणात सदैव रहायला आवडेल आम्हाला गुरुजी कारण त्याची परतफेड करावी म्हटले तरी कशानेच होत नसते" अभिजीतच्या बोलण्यावर गुरुजींनी मान डोलावली व त्याच्या गाडीत बसतांना समीरला हात केला. गाडी वळणावर दिसेनाशी झाली अन् समीर हॉस्पिटलच्या केबिनमधे परतला.

© बिंदुमाधव भुरे, पुणे.

 

No comments:

Post a Comment