Wednesday, October 31, 2018

असेही एक मनोगत

असेही एक मनोगत !

(१) "आताच आत नेल आहे.  साधारण दोन तास लागतील ऑपरेशनला, तासभर रिकव्हरी रुममधे ! भूल उतरेपर्यंत आणखी एखादा तास ! पण आज शक्यतो कोणाला भेटू देऊ नका म्हणाले आहेत डॉक्टर !"

"नाही, ठीक आहे. कळाल्यावर अगदीच रहावल नाही म्हणून चौकशीला आलो. भेटाव बघाव अस वाटतच असत असे काही समजल्यावर ! पण काही मदत लागली तर हक्काने सांग, काळजी घे, धावपळीत स्वतःच्या तब्येतीकडेही लक्ष दे."

(२) "अजून किती दिवस असे काढायचे ? एक एक दिवस वाढतोय तसा खर्च वाढतोय. तात्यांची पुंजी तर कधीच संपली, वेळेवर निर्णय नाही घेतला तर आपण भिकेला लागू."
 
"अस बोलवत तरी कस तुला ? आईकडे बघ, तिच्या भकास चेहेऱ्यात अजूनही आशावाद दिसतोय रे ! आपण तिच्याशी बोलून ठरवूया न ! 

 "बस, पुरे आता. नका करु त्यांचे आणखी हाल. डॉक्टरांना म्हणाव काढा त्या नळ्या आता. अन् तुम्ही त्यांच्या पुढ्यात उभ राहून एकदा सांगा त्यांना कि "आईची नका काळजी करु, आम्ही आहोत, संभाळू आम्ही तिला." म्हणजे सुटतील ते यातनातून आणि ..... आणि ...... तो कावळा मग वेळेत शिवेल पिंडाला "

 
(३) "काय रे ? काय झाल ? कोण आजारी आहे ? कि भेटायला कोणाला ?" 

"अरे काही नाही. आमच्या हिला अँडमिट केलय काल. टिपिकल गायनिक प्रॉब्लेम. स्कोपी करणार आहेत, काही विशेष नसेल तर सोडतील उद्या. नाहीतर पिशवी काढतील. छोटस ऑपरेशन अन् परवा डिस्चार्ज ! तू कोणासाठी आला आहेस ?"

"अरे एक मित्र आहे, कालच बायपास झाली. घरी दुसरे कोणी नाही. दोन्ही मुले युएसला. एक निघाला आहे यायला. त्याच्या बायकोला मी म्हणालो कि नका एकट्या दगदग करु. मी थांबेन रात्रीला त्याच्याजवळ, तुम्ही घरी जा, थोडी विश्रांती घ्या."

 

(४) “काही नाही रे, नुसते लुटायचा धंदा ! अँडमिट करतानाच विचारणार “इन्शुरन्स आहे का ?” आपण हो म्हटले कि यांचे मीटर सुरु. परवाच फेसबुक वर एक क्लिप पहिली. भांडूप का मुलुंड मधल्या एका हॉस्पिटलची. सुपर स्पेशियालीटी हॉस्पिटल. गरीब दिसत होती फँमिली बिचारी. आधीच विचारले खर्च किती होईल ? त्यांनी अडीच लाख एस्टिमेट दिले. प्रेग्नंट बाई, तिला डेंगू झालेला. पोटातल पोर गेल, आदल्या दिवशी धावपळ करून पस्तीस हजार भरले. दुसरे दिवशी यांची मागणी किती असावी ?”

“ किती ?”

“ अरे, तीन लाख भरा म्हणे अजून, त्याशिवाय डिस्चार्ज देत नाही म्हणाले”

“ मग ? भरले का शेवटी? “

“ छे ! कुठून भरणार ? दोन दिवस पायपीट करत होते नातेवाईक. मग एकाने सुचविले कि भेटा इथल्या नगरसेवकाला ! आली मग त्यांची पाच सात माणसे. जाब विचारला व प्रत्येक बिल न् बिल तपासतो म्हणाले. अडीच लाखाचे साडेसहा लाख कसे झाले ते दाखवा नाहीतर एक पैसा न भरता पेशंट घेऊन जातो, काय करता बघू असा दम भरला “

“मग काय, राडा  झाला असेल नाही ?”

“ छे छे. अरे ते भरलेले पस्तीस हजारही परत केले अन निमुटपणे डिस्चार्ज दिला”

 

(५) “ हलो ! आत्ताच झाली डिलिवरी ! मुलगी आहे, वजन साडे सहा पौंड आहे. छान गोरी आहे अन जावळ भरपूर आहे. एक नर्स घाईघाईत बाहेर येऊन सांगून गेली. तसा लगेच फोन करतोय तुला.  अजून मी पाहिलेल नाही. आई, तु लगेच ये ना ग ! डबा वगैरेच्या भानगडीत नको पडू, मी खाइन इकडेच काहीतरी.  तू येईपर्यंत मी इथे बसल्या बसल्या काही फोन करतो आणि आपल्या नातेवाइकांच्या ग्रुप वर मेसेजेस टाकतो."

या मजल्यावरच्या कॉरीडॉरमध्ये माझ्या बरोबरीने आणखी चार जण आहेत. अनेक प्रकारची, भिन्न भिन्न स्वभावाची मंडळी येथे येतात, त्यांच्या सुख द:खांचे आम्हीच साक्षीदार ! त्यागाची मूर्तिमंत उदाहरणे पाहिली, जीव ओवाळून टाकावा अशी मित्रताही अनुभवली. कट्टर हेवेदावे, एकमेकांची उणीदुणी काढणारे, गडगंज पैसा बाळगणारे परंतु बीलाचे पैसे भरायची वेळ येताच उफाळून येणारा त्यांच्यातील दरिद्री स्वभावाचे, मनोव्रुत्तीचे वेगळेच रुप पाहिले. समानतेच्या युगात मुलगी झाल्यावर आनंद ओसंडून जातांना पाहिलाय तसेच परत मुलगीच झाल्याचे समजल्यावर दोन दोन दिवस न फिरकणारी उलट्या काळजाची मंडळीही पाहिली !

हॉस्पिटल म्हटले कि दु:खच जास्त. बरा होऊन जाणारा पेशंट असेल तर मंडळी आनंदात पण दिवसभरातून एखादा तरी दगावतो तेव्हा त्यांचा टाहो हृदय हेलावून टाकणारा असतो. रात्रपाळीचे लोक कामावर असतात तेव्हा त्यांच्या खाजगी आयुष्यातील घडामोडी जशा कानावर पडतात तेव्हा बऱ्याचदा कानावर हात ठेवतो तर हॉस्पिटलमध्ये चालणाऱ्या नको त्या गडबडी कळतात तेव्हा कान टवकारुन ऐकतो. खरच काही काही घटना पाहतांना वाटत रहाते कि माझा आतला आवाज, मनाची होणारी घुसमट मांडायची सोय असली असती तर ... ?

असो .... गेली अनेक वर्षे आम्ही इथे आहोत. एका आमदाराची कृपा. स्वत:चे नाव टाकून पेशंटच्या सोयीसाठी म्हणून आम्हाला इथे बसवले आहे. आमदार निधीचा सदुपयोग आणि स्वतःची कार्यसम्राट म्हणून फुकट प्रसिध्दी ! दोन्हीही साधलय बेट्याने. वॉर्डबॉय फरशी पुसतांना रोज दोनदा तरी आमच्या पायांवर फडक मारतो पण कधी आम्हाला नीट पुसावं अस काही वाट नाही त्या बिचाऱ्याला ! आता झाली अनेक वर्षे, आमचीही वय झालीत आता. कधीतरी एक दिवस उजाडेल अन् भंगारात वाट लागलेली असेल आमची ! विचारलच कोणी तर सांगू कि पुढच्या जन्मी एखाद्या बागेत जागा द्या. कधी तरी तरुणाइच्या सान्निध्यात आनंद घेऊ तर कधी वृद्धांचा विसावा बनून त्यांना आनंद देऊ ! आम्हालाही अगदी सगळे नाही तर थोडेसे अच्छे दिन आले तर चालतील !

 
©बिंदुमाधव भुरे, पुणे.

No comments:

Post a Comment