Saturday, February 4, 2017

मनष्य स्वभाव आणि वागणूक

दोन सेकंदाचा उशीर आणि सिग्नल रेड पडला. झेब्रा क्राॅसिंगच्या अलिकडे थांबलो होतो. तब्बल दोन मिनिट वेळ होता त्यामुळे स्कूटरची किल्ली फिरवत इंजिन बंद केल. इंधनाचा अपव्यय व प्रदुषण दोन्हीचा विचार डोक्यात होताच. तेव्हढ्यात आणखीन दोन चार टू व्हीलरवाले डावी उजवीकडून आले. माझ निरिक्षण सुरु होत.


माझ्या डावीकडून आलेला माझ्यापुढे एक सहा इंच त्याच्या शेजारी नंतर आलेला झेब्रा क्राॅसिंग वर उभे राहिले तर लोक काय म्हणतील अस वाटून लोक लज्जेखातर क्राॅसिंगवर स्कूटरच फक्त पुढचे चाक येइल याची काळजी घेत थांबला व आजूबाजूला नजर टाकत त्याने खात्री केली कि फार कोणी विचित्र नजरेने पाहात नाही ना ? 


नंतर एक बुलेटस्वार ! काळा गाॅगल, लिनन कडक शर्ट वगैरे, गुंठेवारीकिंग असावेत.  हे महाराज थेट झेब्रा क्राॅसिंगवर जाऊन थांबले. आपल्याला कोण काय म्हणणार ? आहे का कोणाची हिंमत ? असे भाव चेहेऱ्यावर ! या महाशयांमुळे मागून येणारे अन्य स्कूटरस्वार व रिक्षाचालक यांना त्याच्यामुळे जणू परवाना मिळाला या थाटात सगळ्यांनी तो झेब्रा क्राॅसिंग दिसेनासा करुन टाकला. 


दोन मिनिटे संपतात अन् पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडण्याकरीता ग्रीन सिग्नल पडतो. नागरिकांसह काही सिनियर सिटिझन्स रस्ता आता कसा, कोठून ओलांडायचा या विवंचनेत जीव मुठीत धरुन रस्ता ओलांडायचा प्रयत्न करतात. त्यातले एक दोन वैतागलेले झेब्रा क्राॅसिंग अडविलेल्या स्कूटरस्वारांना नियम सांगुन मागे गाडी थांबवत जा असा सल्ला त्या धावपळीतही देण्याचा प्रयत्न करतात. 


एकदोघे जण  दोन्ही पाय जमिनीवर रेटत स्कूटर दोन चार इंच मागे घेतल्यासारखे करतात. एक जण "ओ काका, आहे ना पलिकडून जागा" तर दुसऱ्याची गुर्मी बोलून गेली "चले ए चल, नको शिकवू जास्त" वगैरे. अवघ्या दोन मिनिटांचा सिग्नल पण मंडळी किती तरी प्रकारांनी रिअॅक्ट होतांना दिसली.


वाहन चालकांना नियम पाळण्याविषयी कोणी बोलले तर प्रतिक्रिया किती प्रकारच्या असू शकतात याचा अनुभव चौकाचौकात आपण रोज घेत असतो. आपण काही चुक करतो आहोत याबद्दल काहीच न वाटणे, आपली चुक जर कोणी दाखवून दिली तर प्रचंड अपमान झाल्यासारखे वाटणे, पोलिसांनी पकडले तर हुज्जत घालणे,  विनाकारण कर्कश हाॅर्न वाजविला म्हणुन वाद, ओव्हरटेक करायला साईड दिली नाही म्हणुन वाद, राँग साईडने वाहन चालविण्यामुळे होणाऱ्या अपघातातून निर्माण होणारे वाद वगैरे.


हे केवळ वाहतूक, ट्रॅफिक या विषयाशी संबंधित झाल.  दैनंदिन व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवनात रोज अशा अनेक प्रसंगांना आपण नकळत सामोरे जात असतो. तेव्हा आपण कधी प्रेक्षक असतो तर कधी त्या प्रसंगाचा भाग असतो. कुटुंबात, नातेवाईकांत घडणारा प्रसंग असेल, नोकरीच्या ठिकाणी सहकारी किंवा वरिष्ठ यांच्याशी होणारा वाद असेल किंवा दुकान, भाजीवाला, सरकारी कार्यालय, पोस्ट आॅफिस, बँक, विमा कार्यालय येथे घडणारा एखादा प्रसंग असेल. संवादातून सुरु झालेल्या प्रसंगाचे रुपांतर वादात केव्हा परिवर्तित होते हे कळत नाही.


दोन व्यक्तिंमधे वाद होतो तेव्हा कोणीतरी चूक व कोणीतरी बरोबर असणे साहजिकच आहे पण वादाच मूळ कारण दोघांनाही मीच बरोबर व समोरचा चूक वाटणे हे असते. वाद मिटून प्रश्न निकाली निघावा म्हणुन कोणीतरी थांबणे, किंवा बर ठिक आहे, जाऊ द्या अस म्हणुन पडते घेण्याची गरज असते. पण हे करण म्हणजे माझी हार व समोरच्याचा विजय अस दोघांनाही वाटत.  मग अनेकदा प्रकरण विकोपाला जाते. मारामारी, गुंडागर्दी, पोलिस केस अशा चक्रात माणसे फसत जातात. 


या सगळ्यमुळे आपण आयुष्यात काय गमावतो आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही. आयुष्यातील एक मोठा काळ मत्सर, द्वेष, अहंकार, मीपणा यात घालवून आपण खऱ्या सुखापासून वंचित रहातो. माझ्या मनात त्यामुळे एक प्रश्न कायम घोळत असतो कि मिळालेला एक मनुष्यजन्म या अशा वागणूकीने लोक खरोखरच का वाया घालवत असतात ?


मध्यंतरी NASA ने बनविलेली एक शाॅर्ट फिल्म पहाण्यात आली. Tour of galaxy अस काहीतरी नाव असाव. पृथ्वीतलावर उभा असलेल्या एका माणसावरुन कॅमेरा अवकाशात दूर जाऊ लागतो. या अॅनिमेटेड फिल्ममधे कॅमेऱ्याचा प्रवास हा सुमारे एक लाख ऐशी हजार किलोमीटर प्रतिसेकंद या वेगाने सुरु असतो. त्यामुळे या प्रवासात काही सेकंदातच पृथ्वी एका छोट्या टिंबाप्रमाणे दिसायला लागते व क्षणार्धात आपण चंद्रालाही मागे टाकतो. 


त्यानंतर मंगळ, बुध, गुरु या क्रमाने सुर्यमालेतील सगळे ग्रह साधारण दोनच मिनिटात आपण मागे पडतात. कॅमेरा पुढे सरकतो तसे आपल्या संपूर्ण सुर्यमालेचे त्यातील सर्व ग्रह, त्यांचे चंद्र यासह सुंदर दर्शन होते. पुढच्याच क्षणाला ही महाप्रचंड सुर्यमाला लहान होत होत रांगोळीतल्या लहान ठिबक्या एवढी दिसू लागते. कॅमेऱ्याची वेग व गती कायम असल्यामुळे नंतरच्या काही सेकंदात असे असंख्य रांगोळीच्या ठिबक्यांचा समुह लंबवर्तुळाकृती आकारांत पसरलेला दिसतो. अतिशय तेजःपुंज अस हे रुप पाहून वाटते कि जणू अवकाशात पांढरा, दुधाळ रंगाचा सडा शिंपला गेला आहे.


शास्रज्ञांच अस अनुमान आहे कि आपल्या सुर्यमालेसारख्या, त्या किंवा त्याहुनही मोठ्या आकारांच्या सुमारे अकरा हजार सुर्यमाला अवकाशात असाव्यात. यालाच  ब्रम्हांड म्हणत असावेत. अशा या ब्रम्हांडाच हे अतिविशाल स्वरुप पाहिल्यावर एक क्षणभर मनात आल कि या ब्रम्हांडाच्या तुलनेत आपली पृथ्वी सुईच्या टोकाच्या आकाराची तरी असेल का ? मग या तुलनेत भारत केव्हढा असेल ? हिमालय केव्हढा असेल ? आणि सगळ्यात महत्वाचे या ब्रम्हांडाच्या तुलनेत एक साधारण मानव म्हणुन आपल दखल घेण्याइतक तरी अस्तित्व आहे का ? 


कित्येक कोटी वर्ष वय असलेल्या या ब्रम्हांडाच्या तुलनेत ७०-८० वर्ष वयाचे मानवी आयुष्य म्हणजे त्या ब्रम्हांडाच्या डोळ्याची पापणी लवते त्यापेक्षाही कमी वेळाचे आहे. असे असतांना कशाला ठेवायचा आपल्या वागणुकीत अहंकार, गर्व, मस्ती ? कशाला हव्यात आपसातील ऊच्च-नीचता, श्रेष्ठता-कनिष्ठता ?


या मानवी आयुष्याच्या प्रवासात आपल्याला काही व्यक्ति या आयुष्यभर सोबत करणाऱ्या (पत्नी, नातेवाईक), काही अल्पकाळासाठी (कार्यीलयीन सहकारी, मित्रमंडळी) तर काही सिग्नलला भेटतात तसे क्षणिक भेटणारे असतात. व्यक्तिगत, सामाजिक, राजकीय ... आपल आयुष्य कसेही असु दे, त्यात प्रत्येक वेळी प्रत्येक मुद्द्यावर एकवाक्यता असेलच असे नाही. वेगळा विचार, मतभेद हे असणारच.  

फुल झाडावर शोभून दिसतसे, पुष्पगुच्छातही सुंदर दिसते. पण त्यासाठी त्याला झाडावरुन दूर व्हावे लागते. ज्यानी ते फूल तोडले त्याच्यावर फूल कधीच राग धरत नाही उलट त्याला, पुष्पगुच्छ बनविणाऱ्याला, तो विकत घेणाऱ्याला, मिळणाऱ्याला प्रत्येकाला आनंदी करत जाते. काही क्षण मिळणारे आयुष्य दुसऱ्याला आनंद देण्यात जाणाऱ्या फुलासारखे व्यतीत करायचे असे प्रत्येकाने ठरविले तर ? 


बिंदुमाधव भुरे, पुणे 

25 वर्षांच्या युतिची इतिश्री

"२५ वर्षांच्या युतीमधे आम्ही सडलो" भाषणा दरम्यान ऊद्धवजींच वाक्य ऐकून एक क्षणभर अनेकांना धक्का बसला असेल. वास्तविक ऊद्धवजींच बोलणे अतिशय संयमी, समतोल असते. शब्दांची योग्य निवड करुन सौम्य भाषेत चपखलपणे चिमटे काढत हवा तो संदेश जनतेत पोहोचविण्याची त्यांची खुबी आहे. भाषणात वेळप्रसंगी आक्रमकता आणतांना भाषणाची पातळी क्वचितच केव्हातरी खालावली असेल पण ती हीन दर्जाची होणार नाही याची काळजी ते घेत असतात. त्यामुळेच परवा भाषणातल हे वाक्य अनेकांना खटकले.

जशा निवडणूका जाहिर झाल्या तसे चर्चेच गुऱ्हाळ नेहमीप्रमाणे सुरु झाल. विधानसभेच्यावेळी असणारे तणावपूर्ण व उत्कंठा वाढविणारे वातावरण पुनः एकदा निर्माण होते कि काय अस वाटत होते. पण या चर्चेतून काय निष्पन्न होणार हे तमाम जनतेला माहिती होत. फक्त ते प्रत्यक्षात कसे येणार याचीच उत्सुकता होती. सस्पेंस आहे असे वाटणारा पण प्रत्यक्षात सगळ्यांनाच शेवट माहिती असलेल्या एखाद्या चित्रपटासारख हे चालू होत.

चर्चेसाठी घेतलेले मुद्दे पाहिले दोन्ही पक्षांना युती नकोच होती हे लक्षात येते. त्यामुळे  चर्चेच्या फेऱ्या म्हणजे निव्वळ दिखावा होता आणि हे उद्धवजींच्या भाषणानंतर स्पष्ट झाले. युती संपुष्टात येण्याच्या निमित्ताने काही प्रश्न मनात निर्माण होतात. (१) २५ वर्षांपूर्वी युती करायच मुळात कारण काय होत ? (२) ज्या कारणांसाठी युती केली व ती २५ वर्ष टिकली म्हणजे इतकी वर्ष ते कारण अस्तित्वात होत का ? (३) शिवसेनाप्रमुख व प्रमोदजी महाजन यांच्या पुढाकाराने झालेल्या युतीला मान द्यायचा म्हणुन ती शिवसेनाप्रमुख हयात असे पर्यंतच ती खर्या अर्थाने टिकली का ? (कि टिकवली गेली)

युती होण्यापूर्वी अनेक वर्ष राजकीय पटलावर काँग्रेस हा एकमेव बलाढ्य पक्ष होता.
काँग्रेसची मतपेढी हमखास व एकगठ्ठा मतांची तर विरोधकांची विविध राजकीय पक्षात विभागलेली. तेव्हा वेगवेगळे लढण्यामुळे मतविभाजन होते व परिणामी काँग्रेस जिंकते हा निष्कर्ष निकालाची चिरफाड केल्यानंतर नेहमीच निघायचा. एकास एक एक अशी रचना करुन मतविभाजन टाळले तर काँग्रेस पराभूत होते हे आणिबाणीनंतरच्या लोकसभा निवडणुकीत सिद्ध झाले होते, अर्थात तेव्हाच्या निवडणुकीला, प्रचाराला, मतदानाला अन्य कंगोरेही तेव्हढेच महत्वाचे होते.

एखादी संघटना किंवा राजकीय पक्ष जेव्हा कार्यक्रम हाती घेतात व त्यामाध्यमातून संघटन व कार्यकर्ते यांना बांधून ठेवतात ते कधी न कधी सत्ता मिळेल या आशेवर ! अन्यथा सत्तेविना कार्यकर्ते किती काळ सोबत राहु शकतील ? जरी त्यावेळी २०% राजकारण व ८०% समाजकारण हे ब्रीदवाक्य असले तरी एक प्रबळ प्रादेशिक पक्ष म्हणुन नुसत्या आंदोलनात्मक कार्यक्रम घेऊन  किती वर्ष शिवसेना वाटचाल करत रहाणार होती ?  तेव्हा कसेही करुन सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसला हरवायचे हाच एकमेव अजेंडा बनला. पण एकट्याच्या बळावर सत्ताप्राप्ती अशक्य आहे हे स्पष्ट दिसत होते.

त्यामुळे शिवसेनाप्रमुख व प्रमोदजी महाजन यांच्या पुढाकारातून चर्चेतून, विचारातून युतीचा निर्णय झाला व तशी घोषणा झाली. राज्यभर पसरलेले शाखांचे जाळे, कार्यकर्ते व सोबत भाजपाचा जनाधार याबरोबर  सेनाप्रमुख व प्रमोदजींच्या आक्रमक भाषणाची साथ असा आराखडा निश्चित झाला. हिंदुत्ववादी विचारांची एकी अशा आकर्षक वैचारिक कोंदणात या युतीला बसविले गेले. दोन पक्षांच्या युतीमागे कोणाला तरी पराभूत करायच हा उद्देश्य होता ही बाब अधोरेखित करावी लागेल. आपआपला पक्ष स्थापन करतांना त्यात सर्वंकश विकास व समाजकल्याण यासाठी सत्ता मिळविणे,  मराठी माणसाचे हित जोपासणे,  हिंदू हिताचे रक्षण करणे यासारखी उद्दिष्ट्ये काँग्रेसला पराभूत केल्यावर सत्तेच्या माध्यमातून कशी साध्य करायची यावर युती करतांना विचार झालाच नाही.  म्हणजेच आपआपल्या पक्षाची ध्येयधोरणे, उद्दिष्ट्य यांना शीत पेटीत बंदिस्त करून टाकले गेले.


राष्ट्रीय पातळीवर युतीच्या व आघाडीच्या राजकारणाची गेल्या अडीच दशकाची वाटचाल पाहिली की धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सत्तेच्या साठमारीत सगळेच पक्ष आपल्या मूल्यांना, मूळ तत्वांना तिलांजली देतांना दिसत आहेत हेच खर. २५ वर्षापूर्वी व आजही भाजप, काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष होते व आहेत तर जनता दल व त्यांचे विविध तुकडे, सपा, बसपा, अकाली दल, तृणमुल, द्रमुक, अण्णा द्रमुक, असाम गण परिषद, तेलंगणा यासारखे अनेक प्रादेशिक पक्ष होते व आजही आहेत. राष्ट्रीय पातळीवर निवडणूका लढवितांना त्या त्या ठिकाणी प्रादेशिक पक्षांचे उमेदवार जिंकतांना दिसत होते. लोकसभा निवडणुकीत कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी सगळ्यात मोठ्या ठरलेल्या राष्ट्रीय पक्षाला प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबुन रहाणे अपरिहार्य ठरत होते. 

या कालावधीत अटलजींनी असे सरकार (एनडीए) २० हून अधिक पक्षांचा पाठिंबा घेत यशस्वीपणे चालविले. तर नंतर काँग्रेसने (युपीए) ! ज्या प्रादेशिक पक्षांनी भाजपला सहयोग दिला त्या पक्षांचे अस्तित्व (भाजपामुळे) संपुष्टात आले असे विधान उद्धवजींनी भाषणात केले किंबहुना ज्यांनी भाजपची साथ सोडली ते पक्ष अधिक मजबूत झाले असा त्यांचा दावा होता. पण वरकरणी हा मुद्दा पटणारा वाटला तरी बारकाइने विचार केल्यास त्यातील फोलपणा ध्यानात येईल. आजही सगळे प्रादेशिक पक्ष आपले अस्तित्व टिकवून आहेत किंबहुना काही ठिकाणी तर ते अधिक मजबूत होऊन राज्यात सत्तेवरही आले आहेत.
प बंगालमधे तृणमूल काँग्रेस कधीकाळी केंद्रात भाजपला पाठिंबा देतांना दिसत होता व आज सत्तेत आहे तो डाव्यांचा पराभव करुन. ममताने तेथे जवळजवळ एक दशक कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधात केलेला संघर्ष व लाखो कार्यकर्त्यांचे पाठबळ याचा तो विजय होता. बिहारमधे नितिशकुमारांच्या जेडीयुने भाजपपासून फारकत घेतली व सत्ता मिळवली. येथे भाजपच्या विरोधात लालू व नितिश यांनी एकत्र येत निवडणुक जिंकली पण भाजपच्या मतांची टक्केवारी घटली नाही तर टिकून राहिली. या विजयामुळे बिहारमध्ये काँग्रेस मात्र अस्तित्वहीन झाला. तामिळनाडूत द्रमुक व अण्णाद्रमुक यांच्याकडे आलटून पालटून सत्ता राहिली आहे, तेथे भाजपचा दुरान्वयेही संबंध नव्हता. पंजाबात अकाली दल प्रमुख तर भाजप दुय्यम भूमिकेत पण अकालीचे वर्चस्व आजही टिकून आहे. (येत्या निवडणुकीत काय होईल ते सांगता येणार नाही)  

तर मुद्दा हा कि प्रादेशिक पक्षांनी भाजपची संगत सोडली म्हणुन ते मजबूत झाले हे विधान खरे नाही.  पक्ष संघटना व बांधणी तसेच नेत्याचा व्यक्तिगत करिष्मा उदा. ममतांचा व्यक्तिगत करिष्मा व संघटन, नितिश, लालू, जयललिता यांचा व्यक्तिगत करिष्मा यामुळे त्यांच्या राज्यात कमकुवत झालेल्या सत्ताधारी पक्षांना मतदारांनी झिडकारले व प्रादेशिक पक्षांना संधी दिली. महाराष्ट्रात मात्र हे घडू शकले नाही कारण महाराष्ट्रात काँग्रेस वा राष्ट्रवादी दोघांनीही सहकार चळवळीच्या माध्यमातून सत्तेवर अनेक वर्ष मजबूत मंद ठोकली होती. सेनेचा विस्तार हा शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर झाला तर भाजप हा शहरी भागात प्रभाव टिकवून होता. काँग्रेसचे काही प्रमाणात पक्ष संघटन व राष्ट्रवादीमधे शरद पवार यांचा व्यक्तिगत करिष्मा यामुळे हे दोन्ही पक्ष तुल्यबळ ठरले व एक दशक राज्य करते झाले. यांना शह देण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून युती संघर्ष करत होती.

मराठी भाषिक ते हिंदुत्व या प्रवासात काँग्रेसवर प्रहार करतांना सेनेची काही धोरणे अनाकलनीय ठरत होती. उदा. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रतिभाताई पाटील यांना दिलेला पाठिंबा. मराठी व महाराष्ट्रीयन म्हणुन पाठिंबा असा तात्विक मुलामा या धोरणाला जरी दिला तरी शेवटीं तो पाठिंबा काँग्रेसलाच मिळाला. “शिवसेनाप्रमुखांची शिवसेना” व “शिवसेना पक्षप्रमुखांची शिवसेना” यातील फरक, अंतर कार्यकर्त्यांना समजुन घ्यायला, कळायला व स्वीकारायला बराच काळ गेला. याच दरम्यान सेनेतून बाहेर पडून झालेल्या नव्या पक्षाच्या स्थापनेमुळे नव्या नेतृत्वाच्या शिवसेनेची ताकद विभाजित झाली. 

या कालावधीत एक राष्ट्रीय पक्ष म्हणुन भाजपा देशभर आपली ताकद वाढवत होता तर राष्ट्रीय पक्ष म्हणुन काँग्रेसची ताकद प्रभावी व दमदार नेतृत्वाअभावी क्षीण होत चालली होती. सुमारे दीड दशक आघाडीच्या राजकारणातील तीन पायांची शर्यत जनतेने अनुभवली होती. याच दरम्यान मतदारांची तरुण पिढीही पुढे आली होती. या तरुणाईच्या अपेक्षा वेगळ्या असल्याचे भान राजकीय पक्षांनी ठेवणे गरजेचे होते. तरुण नेतृत्व व कणखर नेतृत्व यातील निवड करतांना जनमानसाने कणखर नेतृत्वाला पसंती दिली. संघटन व क्रियाशील कार्यकर्ते यांच्या बळावर देशभर असलेल्या अनुकूल वातावरणाचा लाभ भाजप मिळवत गेला. 

हे बदलते वातावरण समजून घेण्यात व आपला पक्ष, आपली ताकद कशी वाढवायची याविषयीचे धोरण आखण्यात कोठेतरी सेना नेतृत्व कमी पडले. भाजप महाराष्ट्रात वाढला व शिवसेनेपेक्षा मोठा झाला तो काँग्रेस व राष्ट्रवादी यांना पराभूत करुन. शिवसेनेची मतपेढी बव्हंशी शाबूत होती हे विधानसभा निवडणुकीत दिसून आले होते. मराठी माणूस, हिंदुत्व हाच पाया दोन्ही पक्षांचा आहे. काल पर्यंत युती असल्यामुळे मतदार संभ्रमित नव्हता पण आज जेव्हा दोन्हीपैकी एकाची निवड करण्याची वेळ आली तेव्हा मतदार काय विचार करेल हा खरा प्रश्न आहे.

मराठी माणसाच्या व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती झाली ती काँग्रेसला हरवून सत्ता मिळवायची म्हणुन ! पण आज सत्ता मिळाली व ज्याला हरवायचे ती काँग्रेस अस्तित्वासाठी झगड़ते आहे त्यामुळे मराठीचा, हिंदुत्वाचा खरा वारसदार, रक्षणकर्ता मीच यासाठी या दोन पक्षांची रस्सीखेच सुरु आहे. भाजपच्या उधळलेल्या बैलाला वेसण घालण्याचे आव्हान सैनिकांना करतांना भाजपला बैलाची उपमा दिली म्हणुन भाजपप्रेमींनी नाक मुरडली असली तरी हा बैल उधळला आहे हे सेनेने मान्य केले आहे हे लक्षात घ्यावे लागेल. भगवा फडकविण्याचे भावनिक आव्हान करुन सैनिकांमधे नवचेतना निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमी होतच असतो पण आज गरज आहे त्या भावनिक आव्हानाला नाविन्याची व विकासात्मक आर्थिक कार्यक्रमाची जोड देण्याची ! मतदारात मोठी संख्या तरुणाईची आहे व तरुणाई हवेवर भाळणारी नाही तर हवेचा प्रवाह अचूक ओळखणारी आहे हे लक्षात घ्यावे लागेल.

बिंदुमाघव भुरे, पुणे.