Monday, December 30, 2019

पान उलटूनी ...

पान उलटूनी .... 


स्मार्ट फोनवर सतत बोट फिरवावीत. दर दोन मिनिटांनी काही नविन व्हॉटस अप आलय का बघाव ... नसेल तर फेसबूक इन्स्टाग्रामवर काही नोटिफिकेशन आलय का चेक कराव.... पण सतत तेच ते करुन बोअर झाल की मग वळाव मोठ्या पडद्याकडे अन् हातातल्या रिमोटच बटण दाबाव.... !


न्यूज चँनेलवर त्याच त्या बातम्या नाहीतर रटाळ कर्णकर्कश्श चर्चा .......! फिल्मी चँनल्सवर सतत चालणारे तेच ते सिनेमे नाहीतर साऊथच्या डब केलेल्या देमार फिल्म्स ! त्यामुळे वैतागलेल पब्लिक सतत नवनवीन पर्याय शोधत असतं. मोठ्या पडद्यावरील चँनेल्सच्या तुंबळ गर्दीत अँमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्सने इ. यांनी आपल बस्तान बसवलय अस वाटत असतांना वेब सिरीजच आगमन सांगून गेल कि येणारा जमाना आमचा आहे. 


मल्टिप्लेक्स, नाटक हा ऑप्शन म्हणजे खिशाला पाच सातशे रुपयाला चाट ! वीकेंडला मॉलमधल विंडो शॉपिंग टाईमपास ! पण खर सांगायच तर या सगळ्यातून मिळत काहीच नसतं .... मात्र .... हे अस्थिर मन अधिकच चंचल, अस्वस्थ होत चाललय अस आतून जाणवत ! केव्हातरी हे सगळे बंद करून मला नेमके काय हवय ? आणि मला नेमके काय आवडतय ? या दोन प्रश्नांचा शोध घेण्यासाठी डोळे बंद करून शांतपणे विचार करायला हवा .... हे एक प्रकारच मेडिटेशनच म्हणायच की !


अवती भवती नजर टाकली तर अस चंचल, अस्थिर, अस्वस्थ व अधीर असलेल समाजमन पहायला मिळत. या सगळ्या भाऊ गर्दीत पुस्तके आणि वाचन संस्कृती अडगळीत पडल्याची भावना एखाद्या निवांत क्षणी मनात अधिक दृढ होते. काय वाचाव .... ? ऐतिहासिक, ललित, सस्पेन्स थ्रिलर, अध्यात्मिक, विनोदी, कादंबरी, प्रवासवर्णन, लघुकथा कि नाट्यछटा ? काही ठामपणे सांगता येईल का कि आपल्याला वाचायला नेमक काय आवडतय ते ? 


शेवटच पुस्तक कोणत वाचल होत ? अस विचारल तर आठवणारही नाही. कदाचित पुस्तकाचा विषय अंधूक आठवेल पण नाव आठवणार नाही. पुस्तकाच नाव त्याचा विषय आठवला तर कदाचित लेखकाच नाव आठवणार नाही.... ! हे अस होणही आता अंगवळणी पडत  चाललय. 


नविन वर्षात मनाची चंचलता, अस्वस्थता संपवायची ! हे "पान उलटवून" पुढच्या पानावर नविन सुरवात करायची.... विषय अगदी कोणताही असो ... एक पुस्तक नेटाने वाचून संपवेन असा संकल्प करायचा. आजवर प्रत्येक वर्षी नविन वर्षाचा संकल्प केला असेल. तो पूर्ण झालाय किंवा कस याचा हिशोब नको आता मांडायला, नाहीतर या संकल्पाचही तसच व्हायच. त्यामुळे हा वाचन-संकल्प मात्र जानेवारीतच पूर्ण करायचा !  


संकल्पातला पुढचा भाग महत्वाचा ! वाचलेल्या पुस्तकाचे नाव अन् त्याबद्दल मला काय वाटल ? यावर जमतील तशा दहा बारा ओळी आपल्या शब्दात लिहून आपण सोशल मिडियावर व्यक्त व्हायच. नाहीतरी सोशल मिडियावर फालतूगिरी आपण बऱ्याचदा करतच असतो. मग अतिरेक झाला कि याच सोशल मिडियावर चालणाऱ्या फालतुगिरीला शिव्या घालत बसतो. पण नविन वर्षात याच प्लँटफॉर्मचा अशा पोस्ट टाकून छान वापर करायचा ! 


आपल्या फेसबुक, व्हॉटस् अप ग्रुपवरील दोस्तांना आपली ही पोस्ट वाचून ते पुस्तक वाचाव अस वाटल पाहिजे. आपण सगळ्यांनी अशा पोस्ट टाकायच ठरवल तर फेब्रूवारीत आपल्याला अशा असंख्य वाचनीय पुस्तकांविषयी माहिती मिळावी. त्यातली काही जमतील तशी विकत घ्यावी व वाचून पुनः पुनः व्यक्त होत रहाव .... आपल्या सोशल मिडियावरच्या जगतात आपल्या ग्रुप्सचा साहित्यिक कट्टा आपणच तयार करायचा ! सगळ्यांना सगळी पुस्तक विकत घेण जमेलच अस नाही पण आपसात एक्स्चेंज तर नक्कीच करता येतील ! 


चला तर मग आपल्या सवयींच "पान उलटूया", टीट्वेंटी वर्षात आपल्या सवयीत "बीस-उन्नीस"चा तरी फरक करुया, आपल बुक शेल्फ समृद्ध करुया ! आपण सगळ्यांनी ठरवल तर ते सहज शक्य होईल. मग करताय संकल्प दरमहा एक पुस्तक वाचनाचा ? 

नविन वर्षाच्या खुप साऱ्या शुभेच्छा ! 💐💐


© बिंदुमाधव भुरे, पुणे. 
८६९८७४९९९०/९४२३००७७६१
bnbhure@rediffmail.com


 

1 comment:

  1. Very well written,timely post!Aap ne to mere manki baat chhinli .It is the need of the hour to keep wachan and lekhan sanskruti alive and everyone can contribute to congratulations on highlighting the issue on the eve of the New Year.

    ReplyDelete