Sunday, January 5, 2020

धुरळा चित्रपटगृहात

*"धुरळा" चित्रपटगृहात !*

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सुरु असलेल निवडणूकीच वातावरण निवळतय. एक अनपेक्षित सत्तापालट होतांना उडालेला राजकीय धुरळा मतदारांनी पाहिला. सत्तास्थापना व त्यादरम्यानच्या मानापमान नाट्यातून राजकारणी मंडळी बाहेर पडून स्थिरावतील का ? जनतेच्या प्रश्नांकडे वळतील का ? या विवंचनेत असलेल्या जनतेसमोर *गावातील सरपंच पदाची निवडणूक व त्यातील राजकारण हा विषय घेऊन *"धुरळा"* हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात झळकला. मराठी चित्रपट विश्वात आपल्या नावाचा ब्रँड प्रेक्षकांच्या मनात रुजविणाऱ्या *"झी स्टुडियोज"*ने नविन वर्षाची धमाकेदार सुरुवात एका मल्टिस्टार भव्य चित्रपटाने मोठ्या दिमाखात केली आहे.*

गावच्या सरपंचाचा रुबाब काही और असतो. वर्षानुवर्षे सरपंच म्हणून मिरवणाऱ्या व्यक्तीच्या बरोबरीनेच त्याच्या कुट़ूंबातील सगळ्या सदस्यांना गावकऱ्यांकडून मान मिळत असतो तर सरपंचपदाच्या प्रत्येक निवडणूकीत त्या खुर्चीचे स्वप्न पहाणारा प्रतिस्पर्धी सदैव पराभवास सामोरा जात असतो. त्यामुळे योग्य संधीची वाट पहात कारवाया करणे, गुप्तपणे डावपेच रचणे हे उद्योग सुरु असतात. वय झालेल्या सरपंचाच्या मृत्यूची बातमी गावात पसरते अन् "हीच ती वेळ" असे मानून हा स्पर्धक आपल्या कारवायांना कशी गती देतो हे पडद्यावर पहाण्यात गंमत आहे. 

तीन मुले दोन सुना अशा परिवाराची जबाबदारी आईवर येऊन पडलेली आहे. कालपर्यंत कौटूंबिक चौकटीत बंदिस्त असलेली ही माय कोणाच्या तरी कारस्थानी भावनिक बोलण्याला भुलून घराचा उंबरा ओलांडत सरपंचाच्या खुर्चीकडे वाटचाल करु पाहतेय ! सरपंचाने पाहिलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करत गावाला पुढे नेण्याचे कर्तव्य आता आपल्याला पूर्ण करायचे ही थोरल्याची भावना आहे. त्यात त्याला त्याच्या सुविद्य व समंजस पत्नीची साथ आहे. मधला भाऊ खुशालचेंडू, शिक्षणात कमी व गावंढळ असला तरी त्याचे दादावर आणि आईवर नितांत प्रेम आहे. त्याची पत्नी मात्र शिक्षित अन् मॉडर्न विचारांची ! तर धाकट्याची चाल वेगळी. डोळ्यात मोठी स्वप्ने पण त्याची पूर्तता कशी करायची या विवंचनेत चाचपडत, अडखळत तो जीवनाची वाटचाल करतोय. 

*"सरपंचपदावर मी का नाही ?"* हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात अत्यंत धूर्तपणे पेरला जातो तसे प्रत्येकाच्या आकांक्षांना धुमारे फुटू लागतात व कौटूंबिक नात्यात असलेल्या घट्ट वीणेचा एक एक टाका ऊसवू लागतो. परस्परातील प्रेम सामंजस्य हळूहळू लुप्त होत त्याची जागा सरपंच पदाची ईर्षा घेते. त्यामुळे आपसी नात्यामधे एक प्रकारची कटूता येऊ लागते. सरपंच पदाने कायम हुलकावणी दिलेला प्रतिस्पर्धी व अन्य मतलबी राजकारणी या कौटूंबिक कलहात तेल ओतून आपला मतलब साधण्याचे काम करतात. या सगळ्याची परिणती एका यादवीत होणार का ? *या प्रश्नाचे ऊत्तर शोधण्याचा प्रवास म्हणजे *"धुरळा" !*

विविध व्यक्तिरेखा व त्यांचे भावनिक पदर उलगडून दाखवतांना कथानक कुठेही कंटाळवाणे न होता ते धीम्या गतीने पुढे सरकत ठेवण्याचे कौशल्य दिग्दर्शक व लेखकाने साधलय. महिलांचा राजकारण वापर करणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीवर दिग्दर्शक शेलक्या भाषेत टीका करतांना आजचे राजकीय वास्तव अधोरेखित करतो. सात प्रमुख व्यक्तिरेखांच्या स्वभावात  *वाद आहे, संवाद आहे, विसंवाद आहे, आक्रमकता आहे, अगतिकता आहे, भोळेपणा आहे, चतुरता-धुर्तता आहे. प्रत्येक पात्राचे स्वभाव वैशिष्ठ्य जपत हा सतरंगी धुरळा आपल्यासमोर अवतरतो.*

रफटफ भुमिकांची छाप बसलेला *अंकूश* अगदी त्याच्या लूकपासून वेगळा भासतो. त्याने उभारलेला *दादा* हा वरकरणी शांत वाटणारा आहे पण प्रतिस्पर्ध्याच्या प्रत्येक चालीला प्रत्युत्तर देतांना त्याच्यातील संयमी व विचारी व्यक्तिमत्वाची छटा त्याने प्रभावीपणे दाखविली आहे. *सिद्धार्थने* वरकरणी भोळा, प्रसंगी आक्रमक पण बायकोच्या धाकात असणारा मधला भाऊ छान साकारला आहे. विनोद़ाची पेरणी केलेल्या प्रसंगात तो टाळ्या  हमखास वसूल करतो. *अमेयला* धाकट्या भावाची भूमिका आली आहे ती त्याने कमाल साकारली आहे. *सोनालीचा* या चित्रपटातात वावर तिच्या लुकप्रमाणे सहजसुंदर ! 

*अलका कुबलना* अतिशय वेगळी परंतु खूप वाईड रेंज असलेली भूमिका मिळाली आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी त्या भूमिकेच सोन केलय. *प्रसाद ओक* खलनायकी रुपात हटके ! *ऊमेश कामत* चित्रपटात मोजून पाच मिनिटे असेल पण आपली छाप पाडून जातो. "जुल्मकी दुनियामे" आपला दरारा असणारा एखादा पॉलिश्ड व सुटाबुटातील खलनायक म्हणून भविष्यात त्याला पहायला आवडेल. 

*सई* या चित्रपटाचे सरप्राइज पँकेज आहे. तिची भूमिका नेहमीप्रमाणे अप्रतिम ! बोलका चेहरा व टपोरे डोळे हे तिचे स्ट्रॉँग पॉईंट्स आहेत हे ती पूर्णपणे जाणते व त्याचा प्रभावी वापर नेमकेपणाने करत ती बाजी मारते. चित्रपटगृहातून बाहेर पडतांना तिचा चेहरा दीर्घ काळ लक्षात रहातो. 

राजकारणामधे सत्तास्थानी विराजमान घराण्यातील प्रमुख व्यक्तीच्या निधनानंतर कुटूंबातील नातेसंबंधात निर्माण झालेला तणाव व दुरावा नष्ट होऊन पुनः सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी कारणीभूत ठरणारी घटना प्रेक्षकांनी जरी ओळखलेली असली तरी ती घटना *हा धुरळा कशाप्रकारे शमवते हे पडद्यावर पहाणे रंजक आहे.*  डबलसीट, टाईमप्लीज, आनंदी गोपाळ सारखे उत्तमोत्तम चित्रपट देणारे दिग्दर्शक समिर विद्वंस याचा *हा चित्रपट आवर्जून पहावा, पुनः पुनः पहावा असा नक्कीच बनला आहे.*

©बिंदुमाधव भुरे, पुणे
८६९८७४९९९०/९४२३००७७६१
bnbhure@rediffmail.com

No comments:

Post a Comment