Sunday, November 12, 2017

आरोग्य अनारोग्य - समज गैरसमज

फेसबुकवरील मूळ पोस्ट !

*आरोग्याचे मोफत अति ज्ञान !!*

हल्ली सगळीकडे आरोग्यज्ञानाचे मोफत वाटप सुरू असते. कुणी विचारो, वा ना विचारो, व्हाट्सअॅपवर, फेसबुकवर, वर्तमानपत्रांमध्ये रोज काही ना काही लिहून येतच असते आणि कुणाचा कुणाला ताळमेळ नसतो. ह्या आरोग्य सल्ल्यांमुळे माणूस प्रत्येक घास संशयानेच खायला लागलाय!!!

मला लहानपणी अजिबात आठवत नाहीये माझ्या आईबाबांना कार्ब्स, फॅट्स, पाणी किती प्यावं वगैरे चर्चा करताना...  रोज सकाळी फायबर असलेला वगैरे नाश्ता कधीच नसायचा, पण गरम गरम तूपमेतकूटभात किंवा गरम गरम तेल लावून केलेली घडीची पोळी!! पोहे, उपमा म्हणजे रविवारचा नाश्ता!! दुपारी साधेच पण पोळी, भाजी, आमटी, भात असे जेवण, मधल्यावेळी चिवडा, दूधपोहे, दहीपोहे असं काहीतरी आणि रात्री खूपदा फक्त आमटी भात, खिचडी!!  मुख्य म्हणजे हे सगळं कधीही बोअर झालं नाही, की कधी रात्री रोज भात खाऊन काय होईल वगैरे भीतीही वाटली नाही. कदाचित म्हणूनच सगळ्या सणावारांना गोडाच्या पदार्थांवर आम्ही व्यवस्थित ताव मारायचो आणि तरीही खाताना फॅट्स, कार्ब्स हे शब्दही मनात आले नाहीत!! खरं तर घरात ही चर्चाच नसायची कधी!! 

त्यामुळे मनात तो पदार्थ खाताना कोणताही संदेह नसायचा!! आजकाल काय होतंय की पदार्थ समोर आला तरी खाऊ की नको, हे आत्ता खाल्लं तर माझ्या किती कॅलरीज वाढतील... मग किती exercise वाढवावा हे विचार सुरू होतात! मला नेहमी वाटतं की अज्ञानात कधी कधी सुख असतं!!
अति ज्ञानाचा त्रासच होतो!!

"सकाळ पेपर" मधली फॅमिली डॉक्टर ही पुरवणी मी आधी वाचायचे. त्यात काही काही रोगांची लक्षणे दिलेली असतात. खरं तर बऱ्याच जणांना त्यातलं काही ना काही होतंच असतं. पण ते वाचलं आणि कधी चुकून पायाला मुंग्या वगैरे आल्या की त्यातले एकेक रोग आठवू लागतात आणि मानसिकच काय काय व्हायला लागतं. सरळ बंद करून टाकलं ती पुरवणी वाचणं!
फेसबुक आणि व्हाटसअॅपवरच्या आरोग्यपोस्ट म्हणजे खरंच जीव नको करतात अगदी!!  कुणी सांगतं - ओट्स खा, तूप खाऊ नका, केळं खाऊ नका ... हे वाचून  होतंय तोच त्या ऋजुता दिवेकरची पोस्ट वाचायला मिळते की पोहे खा, भात खा, तूप गूळ पोळी खा... झालं ... डोक्यात नुसता गोंधळ!! काय बरोबर नि काय चूक!!

बऱ्याच पोस्टमध्ये अमुक एक केल्याने कॅन्सर होतो असं लिहिलेलं असतं ... परवा एका आयुर्वेदआचार्यांचा लेख वाचायला मिळाला होता. त्यात लिहिलेले होते की, अति पाणी पिऊ नये. त्यामुळे किडनीला त्रास होतो.. त्याचवेळी दिवसातून १०-१२ ग्लास पाणी प्यावं अशी पोस्ट कुठूनतरी येते !!
सध्या शेवग्याच्या शेंगेची पोस्ट फिरतेय...  काही दिवसांनी लाल भोपळ्याच्या फायद्यांची पोस्ट सुरू होईल... पोळीमधल्या ग्लुटेनमुळे त्रास होतो, असं सध्या वाचायला मिळतंय..  रोज भाकऱ्या करणे तर शक्य नाही.. अगदी केल्या तरी मुलांना डब्यात रोज भाकरी आवडत नाही .... मला खरंच कधी कधी असं वाटतं की आरोग्य ह्या विषयाचा अतिरेक होतोय. भूक लागली की, जे समोर असेल ते जेवावं आणि झोप आली की झोपावं, एवढं साधं तत्व पाळलं जायचं पूर्वी ! तेव्हा खरचंच माणसे आरोग्यसंपन्न होती!! आता मात्र भूक लागली की किती कॅलरीज खाव्यात हे मोजत बसलयीत माणसे !!  ह्या आरोग्याच्या लेखांमुळे, अति माहितीमुळे खाण्यातील आनंद हरवून बसणार आहोत आपण !!

--यशश्री मनोज भिडे
(FB वरून साभार पोस्ट.)

*वरील पोस्टचे विश्लेषण करणारा माझा लेख*

*आरोग्य-अनारोग्य समज व गैरसमज*

आरोग्याचे मोफत अतिज्ञान ही यशश्री मनोज भिडे यांची फेसबुक पोस्ट वाचण्यात आली. आरोग्य चांगल रहाणे हे जणू केवळ खाण्यापिण्याशीच संबंधित आहे हा आशय या पोस्ट लिहिण्यामागील असावा असे वाटते.
ही पोस्ट वाचत असतांना पोस्टमधील प्रत्येक वाक्य मनाला भावते व पटतेही कारण कुठेतरी आपण लहानपणीच्या जुन्या आठवणींशी कनेक्ट होतो. आजकाल कॅलरी, कार्ब, पाणी पिण्याचे प्रमाण, फायबर, फॅट्स यासारख्या शब्दांचा भडिमार होतोय हे खरच आहे व संपूर्ण पोस्टमधे त्याचा संदर्भ अतिशय चपखलपणे आलाय.

"काल व आज" याच्या तुलनेत बदलती जीवनशैली, बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयी, अन्नपदार्थातील घटत गेलेल जीवनसत्वाचे प्रमाण इ. इ. यासारख्या गोष्टींचा अभाव या पोस्टमधे आढळल्याने पोस्टमधील मजकूर एककल्ली किंवा एकतर्फी झाल्यासारखा वाटतोय. म्हणून आजच्या बदललेल्या दुनियेत वास्तवातील दुसरी बाजू लक्षात घ्यायला हवी.

पूर्वी शारिरिक हालचाली, श्रम यांचे प्रमाण  भरपूर होते कारण दळणवळणाची साधने कमी होती, मर्यादित होती. माहिती तंत्रज्ञान अतिप्रगतावस्थेत नव्हते. एखाद्याला निरोप द्यायचा म्हटले तरी सायकल किवा पायी जाणे याला पर्याय नव्हता. दरडोई आहार प्रतिवर्ष २०० किलो इतका होता. वर्षातून शेतीमधे एकदा पीक घेेतले जायचे व तेही सेंद्रिय पद्धतीने, त्यामुळे अन्नपदार्थ कसदार होते, त्यात पोषणमुल्ये भरपूर होती. म्हणजे खाणे पौष्टिक असायचे व भरपूर शारिरिक हालचाली असल्यामुळे प्रकृतीस्वास्थ्य उत्तम असायचे !

आज ......... आज ग्लोबलाइजेशन व अतिप्रगत माहिती तंत्रज्ञान यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण बसल्याजागेवरुन संपर्क करु शकतो. परिणामी श्रम, हालचालींवर मर्यादा आल्या आहेत मात्र दरडोई आहारात वाढ होऊन तो ३०० कि प्रतिवर्ष झालाय. शेतीतून वर्षाला दोन तर कधी तीन पिके घेतली जातात. त्यासाठी केमिकल मिश्रित खते यांचा अतिवापर होतोय. गव्हातील घातक ग्लुटेन या घटकाचे नाव आताच का कानावर पडते आहे ? या प्रश्नाच उत्तर वेगळ द्यायची गरज नाही.

आपल्या जावनशैलीवर पाश्चिमात्य जीवनशैलीची नकळत छाप पडायला सुरुवात झाली. कधी काळी क्वचित पहायला मिळणारा कोकाकोला आज डझनभर स्पर्धकांसोबत खेडोपाडी पोहोचलाय. ब्रेड म्हणजे शहरी व उच्चभ्रू मंडळींचे चोचले व गोऱ्यांचा आहार ! त्यामुळे आपली न्याहारी ही पारंपरिक असायची. सकाळी पोटभर न्याहारी करुन तो जिरविण्याइतके श्रम पूर्वी आपोआप व्हायचे. आता न्याहारी तीच आहे मात्र श्रम नाहीत त्यामुळे भरपेट न्याहारीतून मिळणारी उर्जा वापरलीच जात नाही. त्याचे ज्वलन न झाल्याने या उर्जेच फॅट्समधे रुपांतर होतय व परिणामी आज स्थूलता व त्याचे सरासरी प्रमाण यात वाढ झालेली दिसते आहे.

सहज म्हणून किंवा बदल म्हणून या खाण्यापिण्याची सवयी आज आपले दैनंदिन जीवन बनले अन् उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर व ह्रदयरोग माणसांना चाळीशीतच गाठू लागले. मग हे सगळ का घडतय याचा अभ्यास करता लक्षात आल कि हा बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आहे. ज्या खाण्यापिण्याच्या सवयींमळे हे दुष्परिणाम होतायत त्यातल्या घटक पदार्थांचा अभ्यास सुरु झाला. केवळ आहारशास्त्रच नव्हे तर शास्त्राच्या सगळ्याच शाखात सदैव संशोधन हे सुरु असते व नवनविन माहिती दररोज पुढे येत असते. म्हणूनच आज कॅलरीज्, कार्बन, फायबर, फॅट या संकल्पना सर्वमुखी झाल्या आहेत.

आज "इलनेस" ही एक मोठी इंडस्ट्री बनली आहे. याच कारण बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव व खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी. याचाच परिणाम म्हणून "वेलनेस" इंडस्ट्री नावारुपाला आली आहे. शाळेत फक्त चौरस आहार, जीवनसत्वे हे शिकवले पण आज चाळिशीत गाठणाऱ्या विविध आजारपणामुळे या कार्ब, फॅट्स, फायबर वगैरे संकल्पनांचे शास्त्रीय महत्व अभ्यासातून कळायला लागलय. तरुण पिढी "वेलनेस"साठी फिटनेसकडे अधिकाधिक आकर्षित होते आहे. पहाटे, सकाळी वाॅकला किंवा टेकड्यांवर जाणाऱ्यात तरुणाईचे प्रमाण लक्षणीय आहे, जिम्सची वार्षिक सदस्यता घेणारे व पर्सनल ट्रेनर घेणारेही खूप आहेत.

पण हे सगळे फिटनेससाठी करायच व आहारात कोक, पिझ्झा, फास्ट फूड ... हा विरोधाभास दिसतोय. त्यामुळेच हेल्दी असणे व फिट असणे या दोन परस्परांशी संबंधित परंतु स्वतंत्र संकल्पना आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. आदर्श जीवनशैली म्हणजे २०% व्यायाम व ८०% आहार व या आहारात ४०% कार्ब+३०%आवश्यक फॅट्स+३०%प्रथिने असे मिश्रण फलदायी ठरते. हे खऱ्या अर्थाने "वेलनेस" आहे, अर्थात हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

काहीही खाल्ले तर ते पचविण्याची क्षमता बदलत्या जीवनशैलीमुळे नष्ट झाली आहे तसेच आजच्या खाद्य पदार्थातील पोषणमुल्यांचे प्रमाण घटले आहे हे लक्षात घेता आहारशास्त्राने संशोधित केलेल्या कार्ब, प्रोटीन, फायबर, फॅट या संकल्पना हे आपल्या वास्तविक दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनविल्यास हेल्थ व फिटनेस हे दोन्ही साधले जाऊन खऱ्या अर्थाने निरोगी आयुष्य जगता येईल.

तेव्हा आरोग्याचे मोफत अतिज्ञान तपासावे, त्यातील विरोधाभास लक्षात घ्यावा पण त्याकडे दुर्लक्ष करु नये. व्यक्ति तितक्या प्रकृती या उक्तीनुसार आपल्यासाठी योग्य काय याचा निर्णय घ्यावा प्रसंगी न्युट्रीशन तज्ञांचा सल्ला घ्यावा. खाण्यापिण्याता एकच नियम सगळ्यांनाच सरसकट लागू होईल असे नाही मात्र २४ तासातील १ तास स्वतःच्या आरोग्यासाठी, फिटनेससाठी हवा हे सगळ्यांना लागू आहे यात दुमत नसावे.

बिंदुमाधव भुरे, पुणे

No comments:

Post a Comment