Friday, November 3, 2017

नोटबंदीच्या १ वर्षानंतर मनोगत !

नोटबंदीच्या १ वर्षानंतर मनोगत !

२०१५ साली बेबी नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता.  चित्रपटाच्या मध्यावरचा एक प्रसंग आठवतोय ? देशविघातक व अतिरेकी कारवाया करणाऱ्यांविरोधात लढणारा एक जांबाज अधिकारी अक्षयकुमार व त्याच्यामागे ठामपणे उभा असलेला त्याचा बाॅस डॅनी हे दोघे जण मंत्री महोदयांना भेटायला जातात. बिलाल या अतिरेक्याला पकडण्याचा प्लान मंत्री महोदयांना समजावून सांगतात. बिलाल हाती लागला तर मोठ्या अतिरेकी कारवायांचा छडा लागून देशाला संकटातून वाचविणे शक्य होणार होते. 

सगळे काही ऐकून घेतल्यावर मंत्री महोदय या योजनेत यश मिळण्याची शक्यता किती ?” असा प्रश्न विचारतात. अक्षयकुमार म्हणतो पाच टक्के”. मंत्री महोदय आश्चर्यचकित होतात पण अक्षयकुमार सांगतो मी एक टक्का यशाची शक्यता असेल तरी काम करायला तयार असतो”. बिलाल सौदी अरेबिया मध्ये आहे कळल्यानंतर मा़त्र हा धोका पत्करण्यास मंत्री महोदय ठाम नकार देतात. तेव्हा डॅनी सांगतो कि जर हा म्हणजे अक्षयकुमार या मोहिमेत पकडला गेला तर आम्ही जबाबदारी झटकून याला ओळखत नाही असे सांगू”. हे सगळे अक्षयकुमार समोर घडत असल्यामुळे मंत्री महोदय अस्वस्थ होत डॅनीला खाजगी संभाषणाची विनंती करतातअक्षयकुमार त्याचा रोख ओळखून लगेच बाहेर पडतो. 

मंत्री महोदय डॅनीला विचारतात कि जेव्हा तू याच्या समोर सारखे सांगतोस कि जर ही कामगिरी अयशस्वी झाली व हा पकडला गेला तर आम्ही जबाबदारी झटकून टाकू या तुझ्या बोलण्यात किती तथ्य आहे ?” डॅनी सांगतो कि “हे पूर्णपणे खर आहे”. पुढे तो म्हणतो कि आम्हाला असे काही पागल आणि अडेल अधिकारी फार क्वचित मिळतात. यांच्या डोक्यात फक्त देशभक्ती व देशाचाच विचार सदैव सुरु असतो. हे देशासाठी मरायला नव्हे तर जगायला तयार असतात. कारण यांना शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सुरक्षा करायची असते.” 

दि ८ नोव्हेंबरला नोटबंदीला वर्ष झाले. काळ्या पैशावर आधारित समांतर अर्थव्यवस्थेमुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. चलनात असलेली एकूण रोकड केवळ दहा वर्षात दुप्पट होऊन ती १५.५० लाख कोटी इतकी झाली होती. भारतीय अर्थसंकल्प हा वीस लाख कोटींचा आहे तर बँकिंग व्यवसाय हा १७५ लाख कोटींचा आहे. रोख चलनातील रक्कम जरी केवळ १५.५० लाख कोटी असली तरी या रोख चलनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात किती काळा व बेहिशोबी पैसा निर्माण झाला असेल याचा अंदाज अर्थसंकल्प व बँकिंग व्यवसायाचे महाकाय आकडे पाहिले कि करता येईल. त्यामुळे या रोख चलनरुपी बिलालवर कारवाई करण्याचा धाडसी निर्णय पं मोदींनी घेतला. डॅनी म्हणाला ते वाक्य आठवत मी मनाशी म्हणालो कि असे (अडेलपागल व म्हणूनच) देशभक्ति व देशप्रेमाने भारलेले निडर पंतप्रधान क्वचितच लाभतात.

चित्रपट कथानकात हा बिलाल ठार झाल्यामुळे अतिरेकी कारवाया १००% बंद होतील अशी बिलकुल शक्यता नव्हती परतू या कारवाया करणाऱ्यांना एक जबरदस्त चपराक बसणार होती. या मोहिमेतून अतिरेकी कारवायांचे जाळे व त्यांचा ठावठिकाणा उद्ध्वस्त होण्याची शक्यता अधिक होती. किमान त्याच्या माध्यमातून होणाऱ्या कारवाया व त्यामुळे होणारी हानी काही प्रमाणात टळणार होती. तसेच नोटबंदीमुळे संपूर्ण काळा पैसा उघडकीस येणार होता असे नाही पण या कारवाइमुळे  काळ्या व बेहिशोबी पैशाची निर्मिती ज्या रोख चलनातून होते त्याच्या मुळावर घाव घातला जाणार होता हे नक्की तसेच यात गुंतलेल्या तमाम मंडळींना तो इशाराही होता. 

चित्रपटात जेव्हा या धाडसी मोहिमेची सुरुवात सौदीमध्ये गेल्यावर होते तेव्हा या कारवाईत बिलाल मारला जातो. मोहीम फत्ते होत असतांनाअनपेक्षितपणे या कारवायांच्या मागील  मुळ सूत्रधार व म्होरक्या मौलाना या टीमच्या हाती लागतो. नोटबंदी करतांना व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या का हा नोटबंदीवर टीका करणाऱ्यांकडून विचारला जाणारा मजेदार प्रश्न ! या नोटबंदीचा परिणाम म्हणून अचानक आयकर रिटर्न फाईल करणाऱ्यांची संख्या वाढलीडिजिटल पेमेंट पद्धतीमुळे बेहिशोबी व्यवहारांची संख्या घटली. चलनातील ९९% नोटा परत आल्यामुळे सरकारने पुढच्या टप्प्यातली आपली धडक कारवाइ सुरु केली. परिणामी प्राथमिक तपासणीतून सुमारे ३ लाख बोगस कंपन्या उघड झाल्या. यापैकी आजमितीस केवळ ५००० कंपन्यांच्या छाननीतून ४००० कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. आज टीका करणारे म्हणतात... “पण नोटबंदी करतांना ही उद्दिष्टे जाहीर केली नव्हती”. बिलालला मारण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यावर मंत्री महोदय अगर बाॅस डॅनीने अक्षयकुमारला असे काही म्हटल्याचे दिसत नाहे कि “बिलाल संपला ते ठिक आहे पण  मौलानाला पकडण्याबाबद आधी काही ठरले नव्हते व तुम्ही तसे काही बोलला नव्हतात”. 

जरी नोटबंदी करतांना ही उद्दिष्टे सांगितली नसली तरी आज या मौलानारुपी बोगस कंपन्या सापडल्यामुळे त्याच्या छाननीतून आणखी किती आणि कोणती गुपिते बाहेर पडतील व प्राॅपर्टीसोन यासारख्या माध्यमातून दडलेला किती काळा पैसा बाहेर येईल हे येणारा काळच ठरवेल. ९९% रक्कम बँकेत परत आली नसती तर रोख चलनाव्यतिरिक्त अन्य बेहिशोबी व काळे धन बाहेर कधीच आले नसते. म्हणूनच नोटबंदीचा निर्णय जाहीर करतांना “जो हेतू सांगीतला होता तो कोठे साध्य झाला” हा प्रश्न गैरलागू ठरतो. आज एक वर्षानंतर चलनातील रोकड ही पूर्वीच्या तुलनेत ७५% आहे पण वैध व्यवहारांच्या संख्येत मात्र वाढ होतांना दिसते आहे. एक वर्षात अर्थव्यवस्था मुळ पदावर परत येतांना दिसत आहे. ज्या क्षेत्रात उदा. घर बांधणी क्षेत्र, येथे मात्र मंदीची स्थिती आहे कारण या क्षेत्रात अनधिकृत व्यवहार व काळ्या पैशाचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर होता.  

आज व्यापारी वर्गाची नाराजी व ओरड सुरु आहे याचे कारण जीएसटी कायदा. या कायद्यामुळे आर्थिक व्यवहार लपविणे अवघड झाले आहे व रिटर्न भरण्याची प्रक्रिया क्लिष्ट आहे. अर्थात, सरकारने कायदा लागू करताना दर ३ महिन्यांनी पुनरावलोकन करून सुटसुटीतपणा आणण्याची ग्वाही दिली आहे. काळा पैशाविरुद्ध कारवाइ करतांना भले तो रोख चलन स्वरूपात सापडला नसेल पण या रोख चलनाचा वापर करून स्थापन झालेल्या अनेक बोगस कंपन्या सापडल्या, त्याद्वारे भ्रष्टाचार उघडकीस आला व येतोय, वैध व्यवहारांची संख्यावाढतेय तसेच रिटर्न भरणार्यांची संख्या वाढल्यामुळे सरकारी महसूल वाढतोय. जरी ही उद्दिष्ट नोटबंदी जाहीर करतांना सांगितली नसली तरी या नोटबंदी व त्यानंतरच्या कारवाई प्रक्रियेत स्वाभाविकपणे साध्य झालेला तो एक टप्पा होता. बिलाल सापडलाच पण या कारवाइ दरम्यान मौलाना व त्याच्या कारवाया सापडल्या तर आनंद का मानू नये ? चित्रपटात अतिरेक्याविरुद्धच्या कारवाईचा हा प्रकल्प मर्यादित काळासाठी होता म्हणून या प्रकल्पाला “बेबी” नाव दिले होते पण लढा सतत सुरूच राहणार कारण तो देशहितासाठी अत्यावश्यक आहे. तद्वत नोटबंदीची कारवाईही ५० दिवसांची “बेबी” (मर्यादित कालावधी) कारवाई होती व देशहितासाठी काळ्या पैशाविरुद्ध ही मोहीम सदैव सुरूच रहावी. त्यासाठी देशप्रेमाने प्रेरित होऊन निरपेक्षपणे, एकही सुटी न घेता अव्याहतपणे काम करणाऱ्या पंतप्रधान नव्हे प्रधान सेवकास माझ्यासारख्या कोटी कोटी देशवासीयांच्या मनापासून शुभेच्छा !

बिंदुमाधव भुरे, पुणे  

No comments:

Post a Comment