Monday, June 30, 2025

"बाॅब वारी २०२५"



 

 "बाॅब वारी २०२५" चा कार्यक्रम जाहीर झाला आणि सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येने बघता बघता साठी पार केली. बाॅब वारीच्या दशकपूर्ती नंतर यशस्वी आयोजनातील सातत्याची किर्ती बाॅब निवृत्तांच्या विविध कळपात पोहोचत असल्याची ही पावतीच जणू ! 


श्री. चव्हाण साहेबांनी अनेक वर्षांपासून व्यक्त केलेल्या एका इच्छेची पूर्तता नुकतीच झाली होती आणि बाॅब निवृत्तांच्या अर्धागिनींचा एक समूह छान पैकी आकाराला आला होता. या महिला वर्गाचा सहभाग हे या वारी २०२५ चे वेगळेपण म्हणावे लागेल. खरतर वारीतील‌ सहभाग हा निवृत्त बाॅब परिवारापुरताच मर्यादित हा आपला नियम ! मात्र या वर्षापुरता त्याला अपवाद करत बाॅब निवृत्तांच्या परिचयातील दोन तीन जणांचा समावेश यंदा केला‌ गेला. 


रथाचे चार अश्व आणि त्याचे कुशल नेपथ्य हे समीकरण रथात स्वार असलेल्यांना निश्चिंत बनवते. रविवारी दि २२ जूनला या वारीसाठीचा पाहणी दौरा आम्ही पूर्ण केला. अर्थातच कुशल नेपथ्य प्रकाश जहागीरदार यांचे नेहमीच असते.. जोडीचे चार अश्व अनेकदा बदलते असतात. तसे यावेळी ते मी, नरेंद्र मुजुमदार, अजित नंदर्गीकर आणि रहाळकरजी हे होतो. 


पाहणी दौऱ्यात ठिकठिकाणी थांबणे, न्याहारी तसेच प्रसाधन गृह वगैरेंची नेटकी व्यवस्था आहे की नाही हे पहाणे तसेच प्रवासाचा मार्ग, त्यावरील टप्प्यांची नोंद ठेवणे वगैरे विषय होते. अर्थात, नेमके पायी चालणे किती असेल‌ ? हा महत्वाचा आणि उत्सुकतेचा विषय होता आणि त्यातच वारीचा खरा आनंद मिळणार होता. मात्र या प्रश्नाचे उत्तर वारीच्या दिवशीच मिळणार होते ! साधारण ८-९ तासांचा हा पाहणी दौरा पार पडला आणि मग वारीचा अंतिम आराखडा / कार्यक्रम आकाराला आला.‌


सहभागी वारकरी माऊलींची संख्येने साठी ओलांडल्याचे सुरवातीलाच मी नमूद केल होत. यात सत्तरी पार‌ केलेल्या मंडळींची संख्या लक्षणीय होती. जास्तीत जास्त १५ ते २० किमी चालावे लागेल हे माहिती असूनही यातील एकही जण डगमगला नाही हे विशेष.. "शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती हे या स्थितीत लागू न पडणारे गीत" उगाचच माझ्या मनात तरळून गेले.. 


नेहमीप्रमाणे सुखकर प्रवास व्हावा‌ म्हणून दोन उत्तम बस सकाळी ६.३० वाजता आमच्या हाॅटेल समुद्र अड्ड्यावर तयार होत्या. दोन्ही बसना "बाॅब वारकरी"चे बॅनर अडकले.. सगळ्यांना गंध टिळा लावायचा कार्यक्रम रंगला, गृप फोटोची लगबग आवरती घेतली. वारकऱ्यांना सदिच्छा निरोप द्यायला आलेल्या मंडळींनी प्रवासासाठी सोबत प्रेमाने दिलेल्या तहान लाडू भूक लाडूचा सहर्ष स्वीकार झाला. आणि माऊलींच्या जयजयकाराच्या  उद्घोषात बस नियोजित वेळेत रवाना झाल्या.



वाटेत रामकृष्ण मठ, संतोष हाॅल व वडगाव पुल असे थांबे बस घेत होती. येथे प्रतीक्षा करत असलेल्या वारकरी माऊली आम्हाला जाॅइन झाल्या. आणि मग बस मार्गस्थ झाली. वाटेत श्री पोतनीस साहेबांनी दिलेल्या हरिपाठ  पुस्तिकेचे वितरण झाल होतच..त्याच्या लयबद्ध पठणाने भक्तिमय वातावरण तयार झाले. अनेकांनी "वारी २०२५" गृप वर पाठवलेले अभंग, बासरीवादन बसच्या ब्ल्यू टूथ स्पीकर माध्यमातून ऐकवले गेले. 


नियोजित वेळेप्रमाणे ८.४५ ला हाॅटेल आशीर्वाद येथे चहापान, न्याहारीसाठी पहिला थांबा आम्ही घेतला. मस्त ढगाळ वातावरण, प्रदूषण मुक्त मोकळी हिरवा, निसर्गाने विणलेली हिरवाई...‌हा माहोल आणि वाफाळणारे गरमागरम पोहे, उप्पीट मिसळ याचा मनमुराद आनंद वारकरी मंडळींनी लुटला. फोटोसाठी मोबाईल सरसावले नसते तरच नवल ! या क्षणाच्या आठवणी टिपण्यात सगळे मग्न होते.. वेळ कमी पडत होता मात्र घडाळ्याचा काटा आपल्या वेगाने पुढे चालत राहिल्याने बस प्रवास पुढे सुरु करणे भाग पडले.‌ 



आणि हो एक खास उल्लेख कि जो आवर्जून करायलाच हवा... न्याहारीचे बील‌ अदा करायची गडबड करु नकोस असा प्रेमळ दम मला‌ श्री आठल्येंनी भरला आणि सगळ्यांचा न्याहारी खर्च आठल्ये दांपत्यांनी उचलून एक सुखद धक्का सगळ्यांना दिला. 


 

पालखी तरडगाव येथून सकाळीच फलटणच्या दिशेने रवाना झाली‌ होती.‌ रस्त्यांवर किती गर्दी असेल ? तरडगाव पासून आपल्या बस किती अंतर पालखीच्या दिशेने पुढे जाऊ शकतील ? रस्ते बंद तर नसतील ना ? या प्रश्नांची उत्तरे आम्हाला तरडगाव पर्यंत पोहोचल्यानंतरच सापडणार होती. सगळ्या वारकरी माऊलींची मानसिक तयारी १५ किमी चालण्याची होतीच. साधारण ११ वाजता तरडगाव येथे पोहोचलो आणि मग रस्त्यांवर दुतर्फा माऊलींची वाढती वर्दळ रस्त्यावर दिसू लागली. सर्वत्र भगवे ध्वज दिसत होते, कानावर टाळ मृदंगाच्या गजरात अभंग तर कधी माऊलींच्या नावाचा उद्घोष कानांना सुखावत होता.‌ बसचा वेग आता धीमा झाला होता.‌ 



यादरम्यान बस बऱ्यापैकी पुढे आली होती. साधारण ११.३० च्या सुमारास आम्ही मंडळी सुरवडी गावाच्या जवळपास पोहोचलो आणि मग आम्ही थांबायचा निर्णय घेतला. आता  पायी चालण्याचे अंतर १५ किमी वरुन ६ किमी इतके कमी झाले‌ होते. अंतर तर कमी झाले पण आता उन्हाळा असल्यासारखे उन जाणवत होते. चालताना गटागटाने चालावे, दोन गटात फार अंतर पडणार नाही याची काळजी घ्यावी वगैरे सूचना पुन्हा एकदा दिल्या गेल्या आणि माऊलींचा गजर करत वारीत आमच्या पायी चालण्याला आरंभ झाला.. 


वाटेत निरीक्षण करताना भक्तीने भारलेल्या वातावरणात वारकरी माऊलींची विविध रुपे पहाणे, फोटो काढणे असे सुरु होते. काळज गावाच्या जवळ आम्ही जसे आलो तशी वारकऱ्यांची गर्दी दाट होत चालल्याचे लक्षात आले आणि इथेच माऊलींच्या पालखीचा विसावा असल्याचे दिसले. आतपर्यंत जाऊन दर्शन ? छे ! त्या गर्दीत शिरण्याचे धाडस होत नव्हते. मनात विचार आला.. लक्षावधी वारकरी एकादशीला पंढरपूरला पोहोचतात आणि कळसाचे दर्शन घेऊन परततात. शेवटी भक्तीभाव मनात असला कि देव भेटतो.. आम्ही लांबूनच दर्शन घेतले. 

 



वाटेत आमच्या गटाने एक गोल रिंगण करत विठ्ठल विठ्ठल असा सुरात जयघोष सुरु केला.. थोडा पायांना विश्राम आणि नविन उर्जा सामावून घेण्याचा तो भक्तिमय प्रयत्न ! मजल दर मजल करत आम्ही १.३० वाजता वडजल गावात पोहोचलो. येथे मीरा भोजनालय मध्ये सगळ्या वारकरी माऊलींची भोजन व्यवस्था केली होती. इथे पोहोचल्यावर लक्षात आल कि एक गट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने चालत होता. त्यामुळे त्यांना ना माऊलींच्या पालखीचे दर्शन झाले ना मीरा भोजनालयाची पाटी दिसली. ही मंडळी आणखीन पुढे चालत गेली होती.


प्रचंड गर्दीमुळे कोणाचेही फोन लागत नव्हते. शेवटी प्रकाश आणि नरेंद्र या जोडगोळीने त्यांना गाठले आणि मग मीरा भोजनालयला आमचा कोरम फुल झाला. गरमागरम घडीच्या पोळ्या, वांग्याची भाजी, रस्सा, वरण भात, चटणी पापड वगैरे खास मराठमोळा मेनू होता. मंडळी थकली असली तरी अद्यापही पायी वारी चालायची इच्छा होती. जेवणानंतर तेथेच गप्पांचे फड जमले. अचानक बाहेर रस्त्यावर गर्दी वाढली. माऊलींची पालखी पुढे रवाना होत होती. ज्या मंडळींचे दर्शन राहिले होते त्यांना दर्शनाचा खूप छान लाभ झाला.. "याच साठी केला होता अट्टाहास .." आणि मग "वारीला आल्याचे सार्थक झाले" ही समाधानाची भावना मनाला स्पर्श करती झाली. 



माऊलींची पालखी फलटणच्या दिशेने पुढे सरकत होती तशी रस्त्यावरची गर्दी थोडी कमी होत होती. अखेर साडेचारच्या दरम्यान आम्ही परतीच्या प्रवासाला आरंभ केला. येताना पुन्हा सारोळा गावात हाॅटेल आशीर्वादला चहापान झाले. पुन्हा एकदा फोटो सेशन, माऊलींचा गजर झाला. दोन्ही बसमधील वारकरी माऊलींनी इथेच परस्परांचा निरोप घेतला. साडे आठच्या सुमारास म्हणजे अगदी ठरल्या वेळेला आम्ही समुद्र हाॅटेल येथे परतलो. 


माऊलींच्या कृपेने सगळी वारी खूप आनंदात आणि समाधानात पार पडली. पुढचे काही दिवस या आठवणींची आणि फोटोंची उजळणी होत राहील..या वारीला प्रत्यक्ष सहभागी होऊ न शकलेले श्री प्रकाश होनप आणि श्री सुहास पाटील यांनी आर्थिक सहयोग राशी देऊन अप्रत्यक्षपणे वारीत सहभाग नोंदवला. "बाॅब वारकरी" नाव असलेल्या टोप्या, उपवासाचा चिवडा, शेंगदाणा चिक्कीचे बार, लाडू, साटोऱ्या, प्यायच्या पाण्याच्या बाटल्या वगैरे सहाय्य करत अनेकांनी वारीत आपला भक्तिमय सहभाग दिला. या सगळ्यांचा उल्लेख केल्याशिवाय हे "वारी पुराण" अपुरे ठरेल नाही का ? सहयोगाबद्दल‌आणि सहभागाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार ! 


बिंदुमाधव भुरे.