Saturday, December 7, 2024
क्या से क्या हो गया
Friday, November 15, 2024
प्रतिडाव भाग २
Monday, November 11, 2024
प्रतिडाव भाग १.
मित्रांनो, एक कट्टर भाजप समर्थक म्हणून हा लेख लिहितो आहे. वाचायचा नसेल तर स्किप किंवा डिलिट करायला सोपे म्हणून आधीच स्पष्ट करतो आहे. भाजप समर्थकांनी वाचलाच पाहिजे आणि विरोधकांनी ??
प्रतिडाव भाग १.
२०१९ विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेकडून झालेल्या दगाफटक्याचा, फसवणूकीचा, विश्वासघाताचा माझ्यासारख्या असंख्य भाजप समर्थकांना मनस्वी राग आला होता, चीड आली होती. वास्तविक भाजप सेना युतीला स्पष्ट बहुमत आणि सरकार स्थापनेचा जनादेश प्राप्त झाला होता. परंतु, "सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला सगळे पर्याय खुले आहेत" असा अचानक पवित्रा शिवसेनेकडून घेतला गेला. या भूमिकेला पूरक ठरतील असे मग उद्धव ठाकरेंनी जे काहीबाही आरोप केले ते सगळे पश्चात बुद्धी... मुळात सरकार स्थापन करायचे यासाठी हा माणूस देवेंद्र फडणवीसांचा एकही फोन घ्यायला तयार नव्हता. एकही फोन न घेता, कोणतीही चर्चा न करता भाजपने फसवणूक केली असा आरोप कसा काय होऊ शकतो ?
सतत मर्द, सैनिक, मावळा, गाडून टाका वगैरे मर्दूमकीची भाषणे ठोकणाऱ्या या माणसाने "आपण जरी युतीत लढलो असलो तरी आता आपल जमणार नाही कारण .... वगैरे वगैरे" अस भाजपला, फडणवीसांना स्पष्टपणे तोंडावर का नाही सुनावले ? मन खात होत का ? कि या मर्दाच्या छातीवर दडपण आल होत ? कि तस काही आश्वासन अमितभाईंनी कधी दिलच नव्हत ? २०१४ ला भाजपाने नाही का बोलणी फिसकटल्यावर युती मोडल्याची घोषणा चक्क पत्रकार परिषद घेऊन केली. तसे धाडस उद्धव ठाकरे यांनी २०१९ ला का नाही दाखवले ?
अमित शहा यांनी शब्द दिला होता या दाव्याबद्दल आता थोडस...
उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितले कि "बंद दाराच्याआड आणि शिवसेना प्रमुखांच्या फोटो समोर अमित शहा यांनी अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पदासाठी शब्द दिला होता." अमित शहा यांचा रोखठोक स्वभाव तर उद्धव ठाकरे यांचा कावेबाज, बेरकी अन् आतल्या गाठीचा स्वभाव लक्षात घेता मला तर उलटे वाटतय. अडीच अडीच वर्षाचा प्रस्ताव अमित शहा यांनी साफ ठोकरून लावला असावा. मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी मग प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे अतिशय धूर्तपणे शांत राहिले, जाणीवपूर्वक मूग गिळून गप्प बसले. प्रचारादरम्यान मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा सतत होणारा उल्लेख यावर उद्धव ठाकरे यांनी कधीच आक्षेप न घेणे म्हणजे अडीच अडीच वर्षं मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारणे त्यांना मान्य आहे असा अर्थ अमित शहा यांनी घेतला असेल तर त्यात चूक ती काय ? उद्धव ठाकरेंचा कावेबाजपणाचा इतिहास हा राज ठाकरे, नारायण राणे वगैरेंनी अनेकदा कथन केला आहे. त्यामुळे अमित शहा यांनी फसवणूक केली हे जे उद्धव ठाकरे सांगतात त्याच्या नेमके उलटे वरील प्रमाणे घडले नसेल कशावरून ? शेवटी बंद दरवाज्याआड झालेल्या गोष्टी आहेत. आपण फक्त कयासच बांधू शकतो. मात्र उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी जो कपटी डाव खेळला त्याला प्रतिडाव टाकून उत्तर हे भाजप कडून मिळणारच होते.
सरकार स्थापनेसाठी उद्धव ठाकरे यांनी पवारांबरोबर गुपचूप चर्चेच गुऱ्हाळ सुरु ठेवल.. तर पवारांनी सोनियांबरोबर ...! याच पवारांनी साळसूद पणाचा आव आणत एकिकडे पत्रकार परिषद घेत सांगितल होत कि "जनतेने आम्हाला (आघाडीला) विरोधात बसण्याचा जनादेश दिलाय...." मग पवार साहेब, तुम्ही उद्धव ठाकरेंना तस पहिल्या फटक्यात स्पष्ट का नाही बजावलत हो ? उलटपक्षी त्यांना सत्तेच गाजर दाखवत झुलवताना दिल्ली वाऱ्या करत काॅंग्रेसला या आघाडीसाठी राजी केलत. म्हणजे उद्धव ठाकरेंनी रचलेला विश्वासघाताचा डाव यशस्वी होण्यासाठी पवार साहेब तुम्ही सर्वात मोठी आणि महत्वाची भूमिका बजावलीत नव्हे तर तुमचीच फूस यामागे होती आणि तुमच्यामुळे भाजप सेना युतीला मिळालेला स्पष्ट जनादेश पायदळी तुडवत जनतेचा कौल नसलेली आघाडी आकाराला आली, सत्तेवर बसली.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा काकणभर जास्त दोष पवार साहेबांचा आहे. अन्यथा, म्हणजे पवारांनी उद्धव ठाकरे यांना "आम्हाला विरोधात बसायचा कौल मतदारांनी दिला आहे" अस ठणकावून सांगितल असत तर पुन्हा एकदा नाईलाजाने का होईना युती धर्माचे पालन उद्धव ठाकरे यांना करावेच लागले असते. त्यामुळे भाजपचा एक समर्थक म्हणून मला पवारांचाही तितकाच किंबहुना उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त राग आणि चीड आहे.
खर तर पवार साहेब हे महाधूर्त आणि आतल्या गाठीचे ! २०१४ ला निकाल लागताच भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यातून दोन गोष्टी साध्य होणार होत्या. सेनेला भाजप पासून दूर करणे आणि सत्तेत बाहेरून पाठिंबा देत सरकार आपल्या तालावर हव तस नाचवतांना फडणवीसांना आपल्या कह्यात आणि कायम दडपणाखाली ठेवणे. पण देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची ही सत्तालोलुप चाल ओळखली. पवारांच्या या खेळीने आपण सत्तेच्या बाहेर फेकले जाऊ या भितीने मग नाईलाजाने का होईना सेना सुतासारखी सरळ आली. मात्र २०१४-१९ या काळात सेनेची सत्तेत राहूनही धुसफूस सुरू होती आणि पवारांनीही ती आग पेटती राहील याची काळजी घेत २०१९ ला सत्तेसाठी उतावीळ झालेल्या, कासावीस झालेल्या उद्धव ठाकरे यांना घोड्यावर बसवत स्वत:ची पोळी भाजून घेतली. पवारांच्या या कुटील डावपेचांना भाजपने प्रतिडाव टाकून उत्तर देण्याची गरज होतीच.
त्यामुळे उद्धव ठाकरेंनी केलेला दगा आणि पवारांनी केलेल कावेबाज राजकारण पाहता, या दोघांच्या पक्षाची झालेली वाताहत म्हणजे त्यांनी जनादेशाचा घोर अपमान केल्याची नियतीने दिलेली जबरदस्त शिक्षा होय असे मी मानतो. करावे तसे भरावे. या फुटी मागे भाजप आहे या समजुतीने माझ्यासारख्या भाजप समर्थक त्यामुळे मनोमन सुखावला होता. असल्या कुटील कारस्थान आणि डावपेचांना प्रत्युत्तर न द्याल तर राजकारणात तुम्ही मागे पडाल किंबहुना तुम्हाला षंढ ठरवले जाईल. त्यामुळे भाजपने जे घडविले ते अतिशय योग्यच होते असे माझे स्पष्ट मत आहे.
मित्रांनो, अनेक भाजप समर्थकांना प्रश्न पडले होते. "अजितदादांना घेण तुम्हाला शोभल का ? एकीकडे मोदी सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि दोन दिवसांनी दादांचा शपथविधी होतो...ही कुठली साधन शुचिता ? ही तत्वांशी प्रतारणा नाही का ?" वगैरे वगैरे पण असले भंपक प्रश्न कट्टर भाजप समर्थक असूनही मला अजिबात पडले नाहीत... ठकास महाठक या न्यायानेच आज राजकारणात वागावेच लागेल.. तत्व, साधन शुचिता वगैरे वगैरे प्रसंगी गुंडाळून ठेवावी लागतील. प्रतिस्पर्धी तलवार घेऊन चालून येत असेल तर अहिंसेच तत्व बाजूला ठेवत मुकाबला करावाच लागेल. तुमचे अस्तित्वच उरले नाही तर तुमची तत्वे काय फ्रेम करुन भिंतीवर टांगायची का ?
सभ्यतेच्या राजकारणाचे दिवस गेले. "अडवानी वाजपेयी युगात असली परिस्थिती निर्माण झाली असती तर ?? वगैरे.." असला बिनबुडाचा प्रतिवाद कोणी करत असेल तर मी सांगेन कि तो काळ वनवास भोगणाऱ्या श्रीरामाचा होता.. मर्यादा पुरुषोत्तमाचा होता.. मर्यादांच्या चौकटीचा सन्मान करण्याचा होता... वाजपेयी यांचे केवळ एका मताने सरकार पडले. ते सहजपणे टिकवता आले असते, तरले असते... मात्र वाजपेयीजी तत्व, निष्ठा याच्याशी प्रामाणिक राहिले. पण ते दिवस आता मागे पडलेत.. आज धर्म रक्षणार्थ कूटनीतीने वागणाऱ्या श्रीकृष्णाचे तत्व आचरणात आणण्याचे दिवस आहेत.... त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना धडा शिकवला गेला ... तो दिलको बडा सुकून मिला अशी माझ्यासारख्या भाजप समर्थकांची अवस्था आहे... भाजप पाठिराख्यांनी, मतदारांनी विशेषत: अजित पवार या विषयावर अजिबात गिल्टी फील होण्याची गरज नाही, नाराज होण्याची गरज नाही. "एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आमचा इमोशनल अलायन्स आहे तर अजित पवार यांच्या बरोबरचा अलायन्स हा स्ट्रॅटेजिक अलायन्स" .. देवेंद्र फडणवीस यांच्या या एका वाक्यात बरच मोठ स्पष्टीकरण दडलय ते आपण समजून घेण्याची गरज आहे.
आपल्या डीएनए मधे प्रभू श्रीराम कायमच आहेत.. अहंकारी शत्रूचा पराभव होणारच.. या अहंकाराला कपट द्वेष आणि कूटनीतीची जोड मिळते तेव्हा भगवद्गीतेची शिकवण आचरणात आणण्याची कलाही आमच्या डीएनए मधे आहे हे आम्ही कायम लक्षात ठेवले तर शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या फूटीत भाजपची कणभरही चूक नाही हे मनोमन पटेल.
मित्रांनो, आपल्या संघटन कौशल्याच्या बळावर भाजप वाढला. कधीकाळी दोन खासदार असलेल्या पक्षाला हे यश प्रबळ संघटन असल्यामुळेच शक्य झाल. सत्ता मिळाल्यावर त्याचा उपयोग लोककल्याणासाठी न करता स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी केला तर पक्ष संघटनेची वाताहत होते. त्याचा परिणाम सत्ता क्षेत्र आक्रसण्यात होतो. मात्र तस झाल्यावर भाजप आम्हाला संपवतोय असा ओरडा केला जातो. भाजप कोणाला संपविण्यासाठी काम करत नाही तर वैभवशाली, सामर्थ्यशाली राष्ट्र बनविण्यासाठी काम करतो. या वाटचालीत जे येतील त्यांना सोबत घेऊन जायचे काम भाजप करतो. पण उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ही सोबत सोडतात आणि त्याचा परिणाम स्वतःच्या पक्षाची वाताहत होण्यात झाल्यास त्यात आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. केवळ सत्तेभोवती फिरणाऱ्या आणि खुर्चीचे राजकारण करणाऱ्या पवारांनी उद्धव ठाकरे भाजप पासून दूर होत आहेत हे लक्षात येताच त्यांना साथ दिली आणि स्वतःच्या पक्षाची शकले करुन घेतली. every action has an opposite & equal reaction हा नियतीचा नियम आहे. तुम्ही डाव टाकाल तर प्रतिस्पर्धी प्रतिडाव टाकणारच.
त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पवार ठाकरे यांचा "भावनांना हात घालण्याच्या खेळाला" आणि काॅंग्रेसच्या 'संविधान अन् जाती जनगणना" खेळीला बळी न पडता खंबीरपणे महायुतीच्या मागे उभे रहायच आहे. स्व. इंदिरा गांधी यांच्या काळात "गरिबी हटाव" घोषणा लोकप्रिय झाली होती. त्या घोषणेला आज "संविधान बचाव" आणि "जाती-जनगणना" या नवीन वेष्टनात गुंडाळून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होतोय.
२०१९ ला निकालानंतर झालेल्या खेळीला कपट, कट कारस्थान, घातपातांना भाजपने प्रतिडाव रचून चोख उत्तर दिले नसते तर मग दुर्योधन शिरजोर झाला असता आणि शकूनी अधिकच कावेबाज..! पण यामुळे "महाराष्ट्राचे नुकसान नाही का झाले ?" असले प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर उघडा डोळे बघा नीट असे म्हणावे लागेल. वर्गात दंगा करणाऱ्या दोन मुलांची कानउघाडणी करतांना इतर मुलांचाही वेळ वाया जातोच. त्यांची भरपाई करण्याची जबाबदारी शिक्षकांची असते....लढाईत नुकसान होतच असते, त्याची झळ जनतेला सोसावी लागते पण... ते नुकसान सत्याचा विजय झाला कि भरून निघत असते अन् त्यासाठी भाजप शीषनेतृत्व समर्थ आहे.
मित्रांनो, विकासाच्या मार्गावर मविआ पेरत असलेले काटे दूर करुन या वाटा निष्कंटक करण्यात २०१९ ते २०२४ मधील काही काळ गेला. मात्र आता येत्या २० तारखेला महायुतीच्या मागे भक्कमपणे उभे रहात मविआला चोख प्रत्युत्तर द्यायचा निर्धार करुया.
© बिंदुमाधव भुरे, पुणे