Wednesday, January 31, 2024

धनुष्य आणि तीन बाण

 गुलाल उधळला गेला, जेसीबीतून पुष्पवृष्टी झाली आणि जरांगेंचा विराट ताफा आंतरवली सराटीच्या दिशेने रवाना झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिज्ञा पूर्ण झाली. मराठा समाजाची स्वप्नपूर्ती झाली. "आनंदी आनंद गडे असा माहोल चोहीकडे" असे दृष्य याची देही याची डोळा उभ्या महाराष्ट्राला घरबसल्या छोट्या पडद्यावर दिसले. 

हे पहाताना मला बाहुबली २ मधला एक सीन आठवला.‌ राजवाड्यावर हल्ला झालाय आणि राजकुमारी निकराने लढतीये. अचानक मणिबंधम् बहिर्मुखम् अस काहीस बडबडत आपला हिरो अवतरतो.‌ एकाच वेळी धनुष्यातून तीन तीन बाण सोडत शत्रूचा नायनाट करतो. आमचा हिरो खरा तर एका राज्याचा राजकुमार पण आपली ओळख लपवून तो विजय मिळवून देतो... धनुष्य कोणाच ? तीन बाण कोणाला लागले ? विजयी कोण झाल ?

२०१४ ला फडणवीस मुख्यमंत्री झाले. एक ब्राह्मण मुख्यमंत्री ??? अनेकांचा पोटदुखी विकार उफाळून आला. पेशवे छत्रपतींची नेमणूक करतात वगैरे डायलॉग ओठांवर आले. मराठा आरक्षण आणि सुरू झाले लाखांचे मोर्चे.... हा योगायोग की फडणवीसांच्या विरोधातली खेळी ? मात्र काहीही असो.. ही सगळी आंदोलन यशस्वीपणे हाताळली, शांतता टिकवून ठेवली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल शिवाय अनेक सोयी सवलतीही बहाल केल्या. खर तर सरकारी नोकऱ्यांचा दुष्काळ असताना या सवलतीच अधिक आवश्यक होत्या. वरकरणी अनेकांनी नाके मुरडली तरी फडणवीस यांनीच मराठा समाजाला न्याय दिला हे कटू सत्य होते. परिणाम .. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ १०५ झाल... पोटदुखीचे रुग्ण आणखी वाढले. 

स्वबळावरील सत्तेची स्वप्नपूर्ती म्हणजे १४५+ जागा..  सुरुवातीला युती, आघाडी या कुबड्यांचा वापर केला जातो. ज्यापक्षाकडे कार्यकर्त्यांची फळी, राजकीय दूरदृष्टी आणि संयम असतो ते नंतर कुरघोडी करतात. ज्यांच्याकडे कर्तृत्वाचा अभाव असतो मात्र महत्वाकांक्षा प्रबळ असते ते कुबड्या बनतात.  

मराठा, ओबीसी समाजात नेते अनेक, सत्तास्थाने अनेक ! सारा समाज आपल्या विशिष्ट नेत्यांमागे आणि पक्षांमध्ये विभागलेला ! ही मते आपल्यामागे एकवटणे आवश्यक आहे हे भाजपाने ओळखले होते.  मराठा आरक्षण मुद्द्याने चांगला‌ हात दिला‌ होता. पुढील पाच वर्षांच्या कारकिर्दीत या मुद्याच्या आधारे आणखीन चांगले काम करायचा मनसुबा होता.‌ पण २०१९ ला सेनेकडून दगाफटका झाला.  विरोधात बसाव लागल तरी १४५+ म्हणजे संपूर्ण बहुमत हे ध्येय भाजपाचे कायम राहिल.

श्री उद्धव ठाकरे यांच्या महत्वाकांक्षेला नव्याने मित्र बनलेल्या जुन्या शत्रूकडूनच खतपाणी घातल गेल. मविआ सरकार आल मात्र याकाळात कोणतेही आंदोलन अगर मोर्चे यांचा दबाव नसतांना मविआला हे आरक्षण टिकवता आल नाही. फडणवीसांना श्रेय जाईल ही धास्ती होतीच.  मविआत हे श्रेय कोणी उपटायच या वादात .. ना तुला ना मला .... झाल आणि आरक्षण रद्द झाल. 

सेनेने खुपसलेला खंजीर आणि राष्ट्रवादीच्या साहेबांनी त्यासाठी पुरवलेली रसद ! त्यामुळे दोन बाण कोणावर सोडायचे हे ठरलेल... ! सेना आणि दोन्ही काॅंग्रेस यांची आघाडी म्हणजे तेल आणि पाणी ... एकजीव होणे अशक्य ! कतृत्वहीन महत्वाकांक्षा म्हणजे मविआचे मुख्यमंत्री ! ना सरकारकडे लक्ष ना पक्षाकडे ! २०२२ ला राज्यसभा निवडणुकीचे निमित्त आणि सेना दुभंगली ! तीनपैकी एक बाण वर्मी बसला. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळाल. आता कतृत्व सिद्ध करायच होत आणि मराठा आरक्षण हा विषय होता.. पण तो थंड बस्त्यात !! 

मग मराठा समाजाचे इतकी वर्ष सुरु असणारे नेता विरहित आंदोलन, मोर्चे याला २०२३ मध्ये एक चेहेरा मिळतो. जरांगेंच्या नेतृत्वाचा उदय होतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली समाज एकवटतो. केवळ सहा ते आठ महिन्यांच्या काळात संघर्षाची धार टप्प्या टप्प्याने तीव्र होत जाते. या आंदोलन काळात भाजपा, फडणवीस कधीच फ्रंटवर नसतात. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व, कतृत्व सिद्ध करण्यासाठी सगळे काही जणू प्लॅन होत  असाव.‌ 

आता दुसरा बाण रोखलेला असतो तो सेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेला खतपाणी घालणाऱ्यांच्या दिशेने... पाच वेळा उपमुख्यमंत्री पद मिळाल पण संधी असतांनाही मुख्यमंत्री बनू न दिल्याची सल दादांच्या मनात आहेच. कतृत्व आहे आणि महत्वाकांक्षा पण आहे. पण संधीसाठी काकांची मर्जी किती सांभाळायची ? आणि किती थांबायच ? या प्रश्नाचे उत्तर दादांनीच शोधल आणि आम्हीच खरा पक्ष असे म्हणत दादांच्या गटाने एकनाथ शिंदेंचीच री ओढली. 

येणाऱ्या निवडणुकात महायुती विरुध्द मविआ असा सामना रंगणार. एकाकडे संख्याबळ तर दुसरीकडे उबाठा आणि साहेबांची भावनिक साद !  सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन किती दिवस रडगाणे सुरू ठेवायचं ? गद्दार आणि खोके याच्यापलिकडे जाऊन आता जनता पहाते आहे. एकनाथ शिंदेंचा संयम आणि परिश्रम वाखाणण्याजोगा आहे हे दिसून येत होत. कमी होती ती पारड्यात भरघोस यशाच माप पडायची. मराठा आरक्षण हा तिसरा बाण ! शिंदेंचा उदोउदो होण आणि मराठा समाज त्यांच्यामागे उभा राहण यासाठी मराठा आरक्षणाच्या बाणाने हे लक्ष्य बरोबर साधले. याचा अतिरिक्त लाभ दादांनाही मिळणारच. झाडाची फळे हा थेट लाभ तर सावली हा अतिरिक्त लाभ ! 

लक्षात घ्या या धामधुमीत भाजपाचे संख्याबळ सत्ता नसूनही टिकून राहिले, पक्ष एकसंध राहिला यातच सगळ काही आल. (शिवसेनेच्या) धनुष्यातून योग्य टायमिंग (घड्याळ) साधत सुटलेले तीन बाण ! एकाने शिवसेना तर दुसऱ्याने राष्ट्रवादीचा वेध घेतला आणि तिसऱ्याने मराठा आरक्षणाचे फळ पदरात पडले. अर्थात धनुर्धर कोण होता ? हे वेगळ सांगायची गरज नाही. बाहुबली २ मध्ये तो राजकुमार होता हे सांगाव लागल नाही. आता तराजूचे पारडे महायुतीकडे पूर्ण झुकलय. कार्यकर्त्याच संख्याबळ, संयम आणि राजकीय दूरदृष्टी असलेले भविष्यात १४५+ ला पोहोचतील तर उरलेले कुबड्या बनून रहातील. व्यक्तिकेंद्रित राजकारण कधीच मागे पडतय हे डोळे बंद केलेल्यांना (मग ते युतीत असोत कि आघाडीत) कधी समजणार ? 

© बिंदुमाधव भुरे, पुणे.

10 comments:

  1. नेटके विश्लेषण..

    ReplyDelete
  2. सध्याच्या राजकीय परिस्थितीचे योग्य परीक्षणं

    ReplyDelete
  3. नेमके लिहिलेस

    ReplyDelete
  4. खुप सुंदर लिहिले आहे...अचूक

    ReplyDelete
  5. राजकारणाच्या विविध छ्टा, कंगोरे, मुरब्बी राजकारणी, त्यांची दूरदृष्टी यांचे छान विश्लेषण!

    ReplyDelete
  6. खूप मार्मिक... अचूक लक्ष्य साधणारं.. सुरेख

    ReplyDelete
  7. खूप छान विश्लेषण. 3 बाण कसले, कुठे आणि कसे लागले.

    ReplyDelete
  8. खूपच छान

    ReplyDelete
  9. अचूक शब्दात , तपशीलवार ,वास्तविक सद्य परिस्थितीचे विश्लेषण केले आहे. लेखकाचे राजकीय परिस्थितीचे अवलोकन उत्कृष्ट आहे.

    ReplyDelete
  10. अतिशय सुंदर आणि मुद्देसूद लेख आहे.

    ReplyDelete