Tuesday, October 29, 2019

हीच ती वेळ

हीच ती वेळ 

काँग्रेसमुक्त भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणायची तर निवडणूकीत त्यांना पराभूत करायला हव. २०१४ ला व त्यानंतरही काही अपवाद वगळता मोठ्या प्रमाणात भाजपने ते साध्य केले अन् काँग्रेसचे अस्तित्व काही राज्यांपुरते मर्यादित राहिले. असे असले तरी या कालावधीत काँग्रेसी नेत्यांचे भाजपमधे पक्षांतर होण्याचे प्रमाण अत्यल्प होते. गेल्या काही महिन्यामधे मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उरला सुरला जनाधार संपविण्यासाठी तिकडच्या तालेवार नेते मंडळींना भाजपात प्रवेश देणे सुरु झाले. या प्रकारावरुन जेव्हा जेव्हा टीका व्हायची तेव्हा आम्हाला काँग्रेस नाही तर काँग्रेसी संस्कृती संपवायची असे स्पष्टीकरण दिल जायच पण त्या संस्कृतीत उभ आयुष्य घालवलेली ही मंडळी .... भाजपात आल्यावर त्यांच्या रोमारोमात भिनलेला (भ्रष्ट) काँग्रेसी विचार, संस्कार नष्ट कसा होईल ? 

एका रेषेशेजारी आणखी एक मोठी रेषा काढली तर आधीची रेष लहान दिसेल. पण आज प्रयत्न झाला तो त्यांची रेषा पुसून आपली मोठी दाखविण्याचा. या प्रयत्नात मूळ व खरी भाजप आहे तेवढीच राहिली मात्र मेगाभरती करुन ही रेषा मोठी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. अशा घाऊक पक्षांतरामुळे भाजपाला भरती आली तर काँग्रेस राष्ट्रवादीला ओहोटी ! कधीकाळी दलबदलूंना स्वार्थी म्हणून हिणवले जाई पण आज त्याला समारंभपूर्वक सन्मानाने पक्षप्रवेश दिला जातोय. अशा कार्यक्रमाला इव्हेंटचे स्वरुप येऊन मेगाभरती हा सन्मानाचा सोहळा बनून गेला. हे कार्यक्रम व त्याच्या बातम्या पहातांना कोणताही आनंद होत नव्हता कारण  कार्यकर्त्यांनी निस्वार्थ भावनेने काम केल्यानंतर आपला उमेदवार निवडून आल्याचा आनंद तो खरा आनंद ! 

या प्रकाराचा अतिरेक होत राहिला आणि त्यालाच विजय मानण्यात मंडळी दंग होती. जनमानसाला मात्र हा प्रकार घ्रुणास्पद वाटत होता. आखाड्यात समोर कोणी पैलवानच नाही ही वस्तुस्थिती असली तरी प्रचारात असे बोलणे यात अहंकाराचा दर्प डोकावू लागला. विरोधी पक्षात आता कोणी मातब्बर नेतेच शिल्लक राहिले नाहीत मग विजय आपलाच, पुनः मीच येणार या आत्मविश्वासातही अहंकार जाणवू लागला. आत्मविश्वास असणे ही कौतुकाची बाब आहे पण जी गोष्ट मतदारांना समजते ती जितं मयाच्या अविर्भावात मांडण्याची गरज नव्हती. आता त्यांच्या २४ तरी सीट येतील का ?  प्रतिस्पर्ध्याला असे हिणवून कमी लेखण्यातला हा मग्रूर भाव माझ्यासारख्या कट्टर भाजप पाठिराख्यांनाही भावला नाही. 

एकिकडे सत्ताधाऱ्याचे हे चित्र व या तुलनेत विरोधी पक्षात उरलेला एकमेव मान्यवर नेता ! हा काही धुतल्या तांदळासारखा स्वच्छ नाही हे जग जाणून होत. पण तो या वयातहीअस्तित्वाची लढाई एकटा लढतोय ही बाब सामान्य मतदारांसाठी कौतुकाची ठरली, त्या नेत्याला सहानुभूती देऊन गेली. कारण अस्तित्वासाठीची लढाई ही त्वेषानेच लढली जाते, लढावीच लागते. सगळे नेते, सगेसोयरे सोडून गेल्यामुळे गलितगात्र झालेल्या या नेत्यावर त्या स्थितीत वार करण्याची चूक त्याच्या अस्तित्वाच्या लढाईला बळ देणारी ठरली आणि त्याला मिळत असलेली सहानुभूती अधिक ठळक होत तिने आपला परीघ विस्तारला. या नेत्याकडून लोकांच्या दैनंदिन समस्यांना भाषणात हात घालतांना सरकारच्या धोरणातील फोलपणावर आघात करणे सुरु होत. जमिन स्तरावर ही वस्तुस्थिती भाजपच्या लक्षात आली तरी त्यांनी प्रचाराची स्ट्रँटेजी बदलली नाही. 

३७० वर बोलणे तर मलाही खटकत होते. पक्षाच्या जाहिरनाम्यातील एक कलम पूर्ततेचा अभिमान असणे चांगलेच व त्या अर्थाने प्रचारात त्याचा मर्यादित उल्लेख पूरक ठरला असता. पण विकासाची केलेली कामे व त्या अनुषंगाने मांडलेले मुद्दे ३७० च्या प्रचारकी थाटामुळे झाकोळले गेले. पूराच्या तडाख्यात सापडलेल्या कोल्हापूर, सांगली भागातील मतदारांचा रोष मतपेटीतून प्रकटल्याचे दिसले. सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था मदतीला धावून आल्या असल्या तरी अशा प्रसंगात कितीही मदत अपूरी ठरते आणि विरोधक या घटनेचे भांडवल बनवून सरकारवर टीका करु शकले. 

आज निकालानंतर भाजप व सेनेच्या जागात घट झाली व काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या जागा वाढल्या हे वास्तव आहे. पण २२० पार घोषणेने अपेक्षा वाढल्या होत्या त्या पार्श्वभूमिवर हे निकाल पाठ थोपटण्याच्या योग्यतेचे नाही हे मान्य करायला हव. आकडेवारी, टक्केवारी, स्ट्राइक रेट हे सगळ भाजपच्या बाजूने असले तरी विजयी मतांचे मार्जिन कमी झालय व त्याला चुकलेली स्ट्रँटेजी व प्रचारी भाषणात नकळत डोकावणारा अहंकार कारणीभूत आहे अस मला वाटत. राष्ट्रवादीला त्यांनी दिलेल्या एकहाती लढतीच्या तुलनेत चांगले यश मिळतांना ग्रामीण भागात गमावलेला जनाधार पुनः मिळवण्यात काही प्रमाणात त्यांना यश मिळालय.  

यश मेहनतीची सावलीसारखी पाठराखण करते. या नियमाला अपवाद असतो हे काँग्रेसच्या यशाने दिसून आले. कोणताही प्रथितयश नेता नाही, रँली नाही, गाजावाजा नाही तरीही विशेषतः विदर्भात त्यांच्या जागा का वाढल्या ?  अनेक तालेवार नेत्यांच्या पक्षांतरानंतरही काँग्रेसच्या जागांची संख्या टिकून कशी राहिली ? मतदारराजा काय विचार करतो ? या प्रश्नांचा विचार करता भाजपने जिंकायचे तर काँग्रेसमुक्त भारतासाठी नाही तर नव्या भारतासाठी, विकासासाठी ! सबका साथ  सबका विकासला जर सबका विश्वासची जोड द्यायची आहे तर मग त्याचे प्रतिबिंब मतपेटीत उमटायला हव. पण घटणारा जनाधार म्हणजे सरकारप्रती, नेतृत्वाप्रती घटणारा विश्वास अस समीकरण बनायला सुरुवात होण्याआधीच जाग झालेल चांगल ! आणि हीच ती वेळ जाग होण्याची, सावध होण्याची असे आतापुरते म्हणूया.

© बिंदुमाधव भुरे, पुणे
9423007761 / 8698749990
bnbhure@rediffmail.com

No comments:

Post a Comment