Thursday, September 12, 2019

सुशिला

 “सुशिला”

 

बँकेत येणाऱ्या ग्राहकांचे निरीक्षण नोंदविण्याची मला जणू सवयच लागून गेली होती. अशीच एक चाळीशी ओलांडलेली महिला, दिसायला काळी सावळी, पुढचे ३-४ दात वेडेवाकडे ! त्यामुळे कि काय बोलतांना खांद्यावरून येणारा पदर ती डाव्या हाताने ओढून तोंडावर धरत असे. स्वत:हून फार कमी बोलायची, बहुदा मानेनेच हो किवा नाही असे उत्तर द्यायची. दहा बारा तारखेपर्यंत पैसे भरायला व नंतर लागतील तसे घरखर्चासाठी काढायला यायची ! एक दोन वेळा “काय करता तुम्ही ?” असा प्रश्न विचारला होता पण तिने उत्तर दिले नाही. बहुदा मोलकरीण म्हणून काम करत असावी.  पैसे काढतांना लागणारी स्लीप ती कोणाकडून तरी भरून घ्यायची. तिची खाली फक्त सही असायची. “सुशिला” अगदी तीनच अक्षरे. ही तीन अक्षरे लिहायला तिला बराच वेळ लागायचा.  

 

दुपारी दोन ते अडीच, तिची येण्याची वेळ ठरलेली होती ! बहुतेक सगळ्या घरची काम उरकून घरी जातांना येत असावी. त्या दिवशी मात्र ती अगदी बँक बंद होता होता आली, सोबत बहुदा तिची मुलगी असावी. पैसे भरायची स्लीप तिने आत सरकवली. आज स्लीपवरचे अक्षर वळणदार, छान होते. त्या मुलीचे असावे कारण स्लीप भरतांना मी तिला पाहिले होते. “काय आज उशीर झाला ?” मी विचारले. तसे तिने नेहमीप्रमाणे खांद्यावरचा पदर डाव्या हाताने तोंडावर धरला. नुसती हसली असावी असे तिच्या किलकिल्या झालेल्या डोळ्यावरून वाटले. “ही मुलगी वाटत?”  तिच्या शेजारी उभ्या असलेल्या मुलीकडे पहात माझा प्रश्न ! “काय ग, काय करतेस तु ?” “बीकॉम, लास्ट इयरला आहे साहेब” तिने उत्तर दिले. मी कौतकाने हसून म्हटले “व्वा छान” ! आपल्या मुलीचे कौतुक करत आहेत पाहून सुशीलने तोंडावर धरलेला पदर डाव्या हाताने बाजूला करत बोलायला सुरुवात केली. “साहेब, लय हुशार हाय माजी पोरगी. मी लोकांचे धुनी भांडी करते. पण हिला नाय करू द्यायची असले काम ! ब्यांकेची परीक्षा देनार हाय ती. तिला मी नेमी सांगती कि ब्यांकेत कामाला लाग आन तुमच्यावानी काम कर म्हनून. म्या तिला नेमी तुमच हुदारन द्येत असती बगा.”

 

बँकेत काम करणारा एक साधारण माणूस कोणाचे तरी रोल मॉंडेल होऊ शकतो हा नवा शोध मला त्या दिवशी लागला. “अहो सुशीलाबाई, नक्की चांगली मोठी साहेब बनेल ती.”  सुशिला मनापासून हसली तसे तिचे वेडेवाकडे दात चमकले आणि उमगल कि ही तोंडावर पदर का धरते ते ! त्या नंतरही ती अनेकदा बँकेत आली पण पुन: तशी हसली नाही. एक दिवस तिने पैसे काढायची स्लीप आत सरकवली. आकडा वाचून “आज एकदम पंचवीस हजार ?” असे मी विचारताच डाव्या हाताने पदर बाजूला घेत ती हसली अन म्हणाली, “साहेब, लेकीच लगीन ठरलया. थोडा कपडा, भांडी कुंडी खरेदी करायाची हाय”. मी पैसे मोजतांना हसून मान डोलावत दाद दिली व म्हणालो “वाह, छान. अभिनंदन सांगा तिला” आणि पैसे-पासबुक तिला दिले. खर तर विचारायचं होत कि काय करतो मुलगा वगैरे पण आज रांग मोठी होती. पुढच्यावेळी आली कि विचारू असे ठरवले.

 

दिवाळी संपली आणि अचानक नोटाबंदी जाहीर झाली. बँकेत तुडुंब गर्दी होऊ लागली. रोकड टंचाईमुळे पैसे काढण्यावर निर्बंध आले होते. बँक सकाळी दहा वाजता सुरु व्हायची पण रोकड येईपर्यंत दुपारी एक वाजायचा. तोपर्यंत पैसे काढणारे बिचारे बसून असायचे. गेले काही दिवस गर्दीमुळे ग्राहकांशी बोलायलाही वेळ नसायचा. दुपारचे तीन वाजले असतील. समोरच्या कस्टमरने पैसे काढायची स्लीप व एक कार्ड आत सरकवले. लग्नाची पत्रिका होती ती ! मी कार्ड बाजूला ठेवले, स्लीपवरचा आकडा पंचवीस हजार होता. “सुशिला” अशी सही पाहून कार्डवर नजर टाकली. सुशिलाने मुलीच्या लग्नाची पत्रिका दिली होती. काचेतून मी तिचा चिंताक्रांत चेहरा पहिला. “इतके पैसे नाही देऊ शकत” हे वाक्य उच्चारताना माझा आवाज खोल गेला होता. आज डाव्या हाताने तिने पदराने डोळे पुसले तेव्हा मला तिचे दात पुन: दिसले. इतरांना दिले तेव्हडे म्हणजे चार हजार रुपये देतांना तिच्याशी नजर मिळविण्याचे धाडस मला झाले नाही. काहे दिवसांनी ती दुपारी आली व एका प्लास्टिक पिशवीत दोन बुंदीचे लाडू देत म्हणाली “साहेब, लय इचार न्हाय करत बसलो, रजिस्टर लगीन केल बगा !” साधनांची विपुलता असूनही अडचणींच्या अंधारात चाचपडणाऱ्या सुशिक्षित मंडळींच्या तुलनेत ही अडाणी सुशीला त्यामुळे मला कायम लक्षात राहिली.

---------------------------------------------------------------

श्री बिंदुमाधव भुरे (निवृत्त बँक ऑफ बरोडा)

स न २, हिस्सा न १क+२ब/१,

ओमकार कॉलोनी, विठ्ठल मंदिराच्या मागे,

कर्वेनगर, पुणे ४११०५२

९४२३००७७६१ / ८६९८७४९९९०      

3 comments:

  1. कथा छान. व्यक्तिचित्रण सुंदर

    ReplyDelete
  2. कथा छान. व्यक्तिचित्रण सुंदर

    ReplyDelete
  3. कथा छान. व्यक्तिचित्रण सुंदर

    ReplyDelete