Saturday, December 7, 2024

क्या से क्या हो गया

क्या से क्या हो गया... 


मौजेवाडी किंवा तत्सम एक गाव, गावाचा पाटील आणि आपल्या सौंदर्याने, नृत्य अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ करणारी तमासगीर !! याभोवती फिरणारे टिपिकल कथानक... जोडीला कधी एखाद गूढ उलगडणारी कथा तर कधी एखादी सूडकथा.. मराठी कृष्णधवल चित्रपटांच्या जमानातल्या या टिपीकल तमाशापटांनी कात टाकली आणि या चौकटी पलिकडे जात व्ही. शांताराम यांचा पिंजरा चित्रपट अवतरला.  


गावाच्या साक्षरतेचा ध्यास घेतलेले गुरुजी...  तत्वनिष्ठ जीवन जगणारा, सामान्य जनांच्या अडचणीत कायम धावून जाणारा, समाजहितासाठी तळमळणारा हा गुरुजी !  आपल्या साक्षरता वर्गातील रोडावलेल्या उपस्थितीमागे गावात आलेला तमाशा आहे हे कारण कळताच चिडतो आणि रागारागाने तमाशाचा तंबू उद्ध्वस्त करतो. संतापलेली तमासगीर सूड उगवण्याची निश्चय करते. "याच तमाशाच्या स्टेजवर एक दिवस या गुरुजीला नाही तुणतुणे धरुन उभा केला तर ... वगैरे !!!"  तिची वाटचाल या निर्धाराने सुरू होते. अखेर गुरुजी तमासगीर बाईच्या "मोहाच्या पिंजऱ्यात" अडकतात आणि त्यांच्या आयुष्याची धूळधाण उडते. "शिकारी खुद यहा शिकार हो गया" यासारखी काहीशी गत होत या सूडनाट्याच्या कथानकात शेवटी तमासगीर बाईपण उध्वस्त होते... 

 
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर "शिवसेना ऊबाठा" आणि "राकाॅ शरद पवार" या दोन्ही पक्षांची अक्षरशः वाताहत झाली आणि मला‌ पिंजरा चित्रपटातील गुरुजी आणि तमासगीर आठवले. आज राजकारणाच्या या तमाशापटात "शिवसेना ऊबाठा"चा गुरुजी झालाय आणि त्याची ही अवस्था करणार दुसर तिसर कोणी नसून ते आहेत "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार" !  (याठिकाणी उदाहरण देताना गुरुजी आणि तमासगीर ही प्रतिके पक्षांसाठी वापरली आहेत व्यक्तींसाठी नाही.)


या दोन्ही पक्षांच्या इतिहासात थोडे डोकावून पाहूया.. 


वीस‌ टक्के राजकारण आणि ऐशी टक्के समाजकारण हे तत्व घेऊन मराठी माणसांच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहिलेली संघटना म्हणजे "शिवसेना" आणि हीच या पक्षाची मूळ पण आता हरवलेली ओळख ! बाबरी पतनानंतर बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट पदवी बहाल झाली. त्याचा पुरेपूर फायदा घेत शिवसेना म्हणजे एक कट्टर, प्रखर, जहाल हिंदुत्ववादी पक्ष असे चित्र उभे करण्यात बाळासाहेबांना यश आले. मराठी माणसाच हित, हिंदुत्वाची जपणूक या तत्वाने "शिवसेना" काम करत होती. वाॅर्ड रचनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा, हिंदू हिताचे रक्षण करणारा शिवसैनिक हे आश्वासक चित्र तेव्हा होते. गुरुजींची गावकऱ्यांप्रती असणारी तत्वनिष्ठता अशीच काहीशी होती ना ? 


दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी काॅंग्रेस पासून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वतंत्र मांडणी केली. पहिल्या प्रयत्नात खूप चांगले यश मिळाले. "सत्ताकेंद्राचा कायम सहवास" हे एकमेव तत्व असल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजवरच्या संपूर्ण वाटचालीत सतत बदलत्या आणि परस्पर विरोधी भूमिका घेत सत्तेभोवती कायम रहायचा प्रयत्न केला. (कधी मौजेवाडी तर कधी आणखी कुठ ! बरकत ओसरायच्या आत तमासगीर बाई नव गाव गाठणार !! कोणा एकाशी इमानदारी दाखवत बसल तर खाणार काय ?) 


शरद पवारांच्या पक्षाचे आव्हान शिवसेनेपुढे असल्याचे बाळासाहेबांनी वेळीच ओळखले होते. तर शिवसेना कमकुवत झाल्याशिवाय आपण महाराष्ट्रातील एकमेव प्रादेशिक पक्ष म्हणून उभे राहू शकणार नाही याची पवारांना जाणीव‌ होती. मात्र बाळासाहेबांच्या आक्रमकतेपुढे त्यांची मात्रा चालायची नाही. 


आपल्या हयातीत बाळासाहेबांनी ठाकरी भाषेत दोन्ही काॅंग्रेस पक्षांची विशेषतः पवारांची यथेच्छ धुलाई केली होती (मात्र मैत्री आणि राजकारण याची सरमिसळ कधी होऊ दिली नाही..) राजकारणात संधी मिळत असते मात्र योग्य वेळ येण्याची वाट पहाण्याचा संयम बाळगता यायला हवा आणि वेळीच राजकीय कुरघोडी करण्याची हातोटी अंगी हवी. शरद पवारांकडे हे दोन्ही गुण उपजतच होते. 


२०१२ ला बाळासाहेबांचे निधन होण्यापूर्वी म्हणजे २००४-०५ च्या दरम्यान शिवसेनेची सुत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आली. २०१४ च्या राजकीय घडामोडीत भाजप सेना युती तुटली आणि मग सगळेच पक्ष विधानसभा निवडणुक स्वतंत्र लढले. शिवसेनेला ६४ जागा मिळाल्या. अर्थात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जेमतेम दीड वर्षात झालेली ती निवडणूक असल्याने एक भावनात्मक मतदान शिवसेनेला झाले. "माझ्या उद्धवला, आदित्यला संभाळून घ्या" हे दसरा मेळाव्यातील शेवटचे शब्द मतदारांच्या स्मृती पटलावरुन तोपर्यंत धूसर झाले नव्हते. अन्यथा उद्धव ठाकरे नामक नेतृत्वाची झाकली मूठ खर तर तेव्हाच उघडी पडली असती..‌


२०१४ ला शरद पवारांनी पहिला डाव टाकला.  शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना अडकवायला पिंजरा तयार केला गेला. निकाल पूर्ण लागायच्या आत भाजपला बिनशर्त पाठिंबा देत त्यांनी शिवसेनेला धोबीपछाड दिला. शिवसेनेला भाजप पासून दूर करणे, ही युती तोडणे आणि शिवसेनेला कमकुवत करणे हे त्यांचे ध्येय होते. इतकी वर्षे संयम बाळगल्याचे फळ मिळण्याची शक्यता दिसताच शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी पवारांनी दवडली नाही. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवापुढे उद्धव ठाकरे म्हणजे बच्चा होते. 


चुरमुऱ्याच पोत पासून अनेक विशेषण वापरत बाळासाहेबांनी केलेला जाहीर अपमान, टीका शरद पवार लक्षात ठेऊन होतेच. त्यामुळे एक ना एक दिवस शिवसेनेला आपल्या दावणीला बांधण्याचा त्यांचा निर्धार होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुक निकालाच्या वेळी बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्याचा पहिला डाव शरद पवार खेळले आणि शिवसेना निमूटपणे भाजप सोबत परत गेली मात्र मनात धुसफूस होतीच. 


आणि मग शिवसेनेची भाजप सोबत आलेल्या वितुष्टाची दरी अधिकाधिक रुंदावत राहील याची खबरदारी शरद पवार यांनी २०१४ नंतर सतत घेतली. २०१९ च्या विधानसभा निवडणुक निकालानंतर शेवटची खेळी प्रत्यक्षात आली. मुख्यमंत्री पदाच्या जाळ्यात एव्हाना तत्वनिष्ठतेचा ऱ्हास झालेल्या शिवसेना पक्षाचा, उद्धवाचा "गुरुजी" करुन या पवारांनी त्याला "सत्तारुपी मोहाच्या पिंजऱ्यात" अडकवले. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री या संवैधानिक पदावर बसवत त्यांची पक्ष संघटना खिळखिळी करण्याची रणनीती कार्यरत झाली. शिवसेना पक्षात अस्वस्थता वाढत होती पण मुख्यमंत्री पदाच्या पिंजऱ्यातील पोपट मात्र सांगेल तशी पोपटपंची निमुटपणे करत होता.‌ 


आठवतेय ना तुम्हाला ... "तुम्ही जरा बाहेर थांबा" अस समोर हात जोडून उभ्या राहिलेल्या उद्धव ठाकरेंना शरद पवार बजावतानांची ती व्हायरल झालेली क्लिप ?  मुख्यमंत्री पदाच तुणतुणे हातात देऊन पवारांनी या उद्धव गुरुजीला होत्याचा नव्हता केला. कट्टर हिंदुत्ववादी असलेला हा माणूस औरंगजेब नावाचं गुणगान करु लागला. धर्मवेड्या मुस्लिमांना हिरवे साप असे जाहीरपणे संबोधणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या रॅलीत हिरवे मुस्लिम झेंडे फडकू लागले. तमाशाचा तंबू उखडून टाकणारे गुरुजी जसे एकदिवस त्याच तमाशाच्या स्टेजवर तुणतुणे धरुन उभे राहिले तसे कट्टर हिंदुत्ववादी उद्धव ठाकरेंना हिंदू शब्दाची ॲलर्जी झाली अन् हा शब्दच भाषणात वापरणे त्यांनी बंद केले. बाळासाहेबांच्या हिंदुहृदयसम्राट या बिरुदावलीचे विस्मरण झाले म्हणून कि काय मुस्लिमांचे लांगुलचालन सुरु केले. 


अर्थात यानंतर "शिवसेना" घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि काही काळानंतर "राष्ट्रवादी" घेऊन अजितदादा पवार ! नंतरचा सगळा इतिहास ताजा आहे. लोकसभा निवडणूक निकालाने निर्माण केलेल्या भ्रमाचा भोपळा फुटला आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालाने "शिवसेना उबाठा" आणि "राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार" या दोन्ही पक्षांना पूर्ण उध्वस्त करुन टाकले. पिंजरा  चित्रपटातील गुरुजी अन् त्याला हवं तसं नाचवणारी तमासगीर हे पण शेवटी असेच उध्वस्त होतात.  


शरद पवार कळायला शंभर जन्म जावे लागतील म्हणणाऱ्यांना ते याच जन्मी विधानसभा निवडणुक निकालानंतर कळाले असतील. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा निवडणूक निकालानंतर एकमेकांशी अद्याप संवाद घडलाच नाही म्हणे... कदाचित दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल काहीसे असे भाव असतील का ? 

तेरे मेरे दिल के बीच अब तो
सदियों के फ़ासले हैं
यक़ीन होगा किसे कि हम तुम
इक राह संग चले हैं
होना है और क्या
बेवफ़ा तेरे प्यार में
क्या से क्या हो गया
बेवफा तेरे प्यार में
(चित्रपट.. गाईड)

आणि ....
तमाशाची सुपारी घेणे, निरोप पोहोचवणे, बोलणी करणे असली कामे नाच्या करत असतो. याही राजकीय फडात दोन्ही पक्षांशी बोलणी करणारा आणि सत्तेसाठी तुणतुणे वाजवीत हो ला हो करणारा एक नाच्या होता. सत्ता समीकरण जुळवतांना अखेर गुरुजी आणि बाई या दोघांचंही वाटोळ करणारा हा नाच्या कोण हे स्पष्ट करायची गरज आहे ?? 

©श्री. बिंदुमाधव भुरे, पुणे.